तारीख : 30-06-2025श्रेणी :महाराष्ट्र
तारीख : 30-06-2025श्रेणी :महाराष्ट्र
प्रजावार्ता : राज्यात सध्या काही भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाट परिसरात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला असला तरी ठराविक भाग वगळता इतर भागात मुसळधार पाऊस झालेला नाही. राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे काही भागात तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. तर, कोकण, घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज रत्नागिरीबरोबरच पुणे आणि सातारा घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली , जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस आधीच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे.
कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता
पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मोसमी वाऱ्यांचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूर, सोनीपत, आयोध्या, गया, पुरुलिया, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरील कमी दाबाचे केंद्र ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांपासून कमी दाब क्षेत्रापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
मुंबईत हलक्या सरींचा अंदाज
मुंबईत आज हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मुसळधार पाऊस शक्यतो पडणार नाही असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पावसाचा अंदाज कुठे
▪️ अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
रत्नागिरी, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर
▪️ मुसळधार पावसाचा अंदाज सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट)
रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, नागपूर, भंडारा, नांदेड, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली
▪️ वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज (येलो अलर्ट)
जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड,अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा
तारीख : 30-06-2025श्रेणी :महाराष्ट्र
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : मावळ तालुक्याच्या पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वतंत्र आणि सर्वसमावेशक अशा ‘मावळ तालुका मराठी पत्रकार संघा’ची स्थापना करण्यात आली आहे. या नव्या संघटनेच्या अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्षपदी विशाल विकारी, तर सचिवपदी रामदास वाडेकर यांची एकमताने निवड झाली आहे. या संघाची स्थापना व पदग्रहण सोहळा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत वडगाव येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी, सचिव शिबू नायर, पुणे शहराध्यक्ष पंकज बिबवे, लोकमतचे उपसंपादक योगेश माडगूळकर, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, बबनराव भसे, ज्ञानेश्वर वाघमारे, विलास भेगडे, निखिल कवीश्वर, अतुल पवार, रेश्मा फडतरे, विशाल पाडळे, चेतन वाघमारे यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
या नव्याने स्थापन झालेल्या संघात लोणावळा, कामशेत, मावळ ग्रामीण, तळेगाव, तळेगाव प्रेस फाउंडेशन व देहूरोड पत्रकार संघाचे सर्व सदस्य समाविष्ट करण्यात आले आहेत. मावळ तालुक्याच्या इतिहासात प्रथमच तालुका पातळीवर सर्वव्यापी अशी संघटना उभी राहत असून पत्रकारांच्या विविध मागण्या व समस्यांबाबत सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
राज्य अध्यक्ष किरण जोशी यांनी संघाची उद्दिष्टे, उपक्रम यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा संघ पुणे-मुंबई शहराच्या धरतीवर कार्यरत राहणार असून पत्रकारांसाठी निवास, आरोग्य सेवा, शैक्षणिक उपक्रम यांचा देखील समावेश केला जाणार आहे.
नवीन संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी पत्रकार संघाला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. उपसंपादक योगेश माडगूळकर यांनी मावळातील सकारात्मक पत्रकारितेचे कौतुक केले. ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, निखिल कवीश्वर यांनी पत्रकार संघाच्या गरजांवर भाष्य केले. ही संघटना मावळ तालुक्यातील पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देईल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे स्वागत विशाल विकारी यांनी केले. प्रास्ताविक गणेश विनोदे यांनी तर सूत्रसंचालन रामदास वाडेकर यांनी केले. अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
सल्लागार : सोनबा गोपाळे, बबनराव भसे, विलास भेगडे, ज्ञानेश्वर वाघमारे, निखिल कवीश्वर
मुख्य पदाधिकारी
अध्यक्ष : सुदेश गिरमे
कार्याध्यक्ष : विशाल विकारी
उपाध्यक्ष : अमीन आफताब खान व भारत काळे
सचिव : रामदास वाडेकर
खजिनदार : संकेत जगताप
प्रकल्प प्रमुख : गणेश विनोदे
कायदेशीर सल्लागार : ॲड. किशोर ढोरे
सदस्य : सचिन शिंदे, चैत्राली राजापुरकर, सचिन ठाकर, मुकुंद परंडवाल.
पदसिद्ध सदस्य
विशाल पाडाळे (अध्यक्ष लोणावळा)
अतुल पवार (अध्यक्ष तळेगाव)
रेश्मा फडतरे (अध्यक्ष तळेगाव प्रेस)
चेतन वाघमारे (अध्यक्ष कामशेत)
तारीख : 30-06-2025श्रेणी :महाराष्ट्र
कार्ला (Karla) : आग्री-कोळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या कार्ला येथील श्री एकविरा देवी मंदिरात (Ekvira Devi Temple Karla) येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड (Dress Code) लागू करण्यात आला आहे. मंदिराच्या पवित्र वातावरणात शिस्त व पारंपारिकतेचे जतन व्हावे, यासाठी मंदिर प्रशासनाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ७ जुलै २०२५ पासून या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टने दिली.
शुक्रवारी (दि. २७ जून) झालेल्या मंदिर ट्रस्टच्या बैठकीत सर्व सदस्यांनी एकमताने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी पारंपरिक भारतीय वेशभूषा परिधान करावी, असे स्पष्टपणे यावेळी सांगण्यात आले आहे.
नवीन ड्रेस कोडचे नियम पुढीलप्रमाणे
महिलांसाठी :
साडी, सलवार-कुर्ता किंवा पारंपरिक भारतीय पोशाख
कपडे पूर्ण अंग झाकणारे असावेत
पुरुषांसाठी :
धोतर, कुर्ता, पायजमा, पँट-शर्ट, टी-शर्ट चालतील
कोणताही कपडा अंग झाकणारा असावा
प्रतिबंधित कपडे :
शॉर्ट स्कर्ट, मिनी स्कर्ट
फाटकी जीन्स, वेस्टर्न आउटफिट्स
आक्षेपार्ह आणि आकर्षण निर्माण करणारी वेशभूषा
परंपरा आणि श्रद्धेचे संवर्धन
श्री एकविरा देवी ही कोळी समाजाची कुलदेवता असून दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. देवीच्या दर्शनावेळी पारंपारिकता आणि शिस्त टिकवावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी सांगितले.
प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश उर्फ (बाळ्या मामा) म्हात्रे म्हणाले, "देवस्थानाच्या पावित्र्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. भाविकांनी नवीन नियमांचे पालन करून सहकार्य करावे."
तारीख : 25-06-2025श्रेणी :महाराष्ट्र
कार्ला (Karla) : लोणावळा (Lonavala) शहराजवळील कार्ला एकविरा देवी मंदिर (Ekvira Devi Temple Karla) परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून यामुळे येथील मळवली-देवले रस्ता पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवली. रस्त्याच्या बाजूने पाणी जाण्यासाठी येथे आवश्यकता असतानाही गटर बांधले नाही. त्यामुळे रस्ता पाण्याखाली गेला व याचा नागरिकांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
मळवली देवले (Malavali-Devale) भागात रेल्वेची कामे सुरु असून अनेक ठिकाणी राडारोडा पडला आहे. रस्ते पाण्याखाली जात आहेत. नागरिकांच्या घरांमध्येही या पाण्याचा शिरकाव होत आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील रहिवासी नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. रात्र जागून काढावी लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत व महाविद्यालयात जाताना अडचण येत असून अनेकवेळा सुट्ट्या माराव्या लागत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तसेच या रस्त्याने प्रवास करणारे दुग्ध व्यवसायिक, कामगार, मोल मजुरी करणारे नागरिक यांना याचा मोठा फटका बसत आहे. तरी प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन पाणी जाण्यासाठी रस्ता काढून द्यावा अशी मागणी देवले ग्रामस्थ करत आहे. (Devale-Malavali road under water)
तारीख : 24-06-2025श्रेणी :महाराष्ट्र
पवनानगर (Pawananagar) : पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीसह बहुतांश मावळ परिसराचे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असलेले पवना धरण हे पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. धरण परिसरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज (मंगळवार दि. २४ जून) रोजी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार धरणाचा पाणीसाठा हा ४७.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात धरण पाणलोट क्षेत्रात १०२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पावसाचे ठळक आकडे
पवना धरणातील पाणीसाठा हा ४७.६४ टक्के असून गेल्या २४ तासात धरण पाणलोट क्षेत्रात १०२ मिमी तर यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ६४७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरणातील पाणीसाठा हा १८.३८ टक्के तर आजच्या दिवशीचे पर्जन्यमान १८० मिमी होते. त्यानुसार यावर्षी २९.२६ टक्के पाणीसाठा जास्त झालेला आहे. गतवर्षीपेक्षा पावसाळा लवकर सुरु झाल्याने व पावसाचे प्रमाणही अधिक असल्याने हा परिणाम दिसून येत आहे.
धरणातील जलसाठ्याची स्थिती
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात वेगाने पाणीसाठा होत आहे. धरणाचा जलसाठा निरंतर वाढत आहे. त्यानुसार बंदिस्त बॅकवॉटरच्या सततच्या वाढीसोबतच, जलसाठा लवकरच ५०% ओलांडू शकतो, असा अंदाज धरण प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.