तारीख : 12-12-2023श्रेणी :शेती
तारीख : 13-02-2024श्रेणी :शेती
पुणे (Pune) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांना होण्यासाठी गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय पिंपरी (ता. मावळ) येथे सकाळी ११ वा. जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) राज्यात कार्यान्वित झाली असून या योजनेअंतर्गत महिला, युवक-युवती, सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, ज्येष्ठ नागरीक, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागास वर्ग, स्वातंत्र्य सैनिक, स्वंयसेवी संस्था, महिला बचत गट, स्वयंसहाय्यता युवा गट, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, पारंपारिक कारागीर आदी समाजातील सर्वच घटकांना मध योजनेचा लाभ देण्यात येतो. मध योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना विनाशुल्क निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात येते.
याशिवाय मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना आदी योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य तसेच अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
या शिबीरामध्ये कृषी विभाग, वन विभाग, पंचायत समिती आदी कार्यालयांचा सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, २४ ब, जुना पुणे मुंबई रस्ता, शासकीय दूध डेअरी समोर, पुणे-३ (दु.क्र ०२०-२५८११८५९) येथे संपर्क साधावा.
शिबीरात निःशुल्क प्रवेश असून अधिकाधिक नागरिकांनी नाव नोंदणी करावी तसेच शिबीरात सहभागी होऊन मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
तारीख : 12-02-2024श्रेणी :शेती
पुणे (Pune) : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.
या मोहिमेंतर्गत ईकेवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी.एम.किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. (Special campaign for inclusion in Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana)
पी. एम. किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचा लाभ या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करण्यात येणार आहे. या मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधिन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी. या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
यापूर्वी राबविण्यात आलेल्या ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या ४५ दिवसांच्या मोहिमेदरम्यान १ लाख ४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच ३ लाख १ हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे.
तारीख : 07-02-2024श्रेणी :शेती
प्रजावार्ता : गेल्या काही दिवसांपासून 'भारत राईस'ची जोरदार चर्चा होती. सर्वसामान्यांना महागाईत दिलासा देण्यासाठी आज हा तांदूळ सरकारने लॉन्च केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या तांदळाची प्रतिक्षा आता संपलेली आहे. दिल्लीतील कर्तव्य पथावर आज (दि. ६) हा 'भारत तांदूळ' (Bharat Rice) लाँच करण्यात आला आहे. पीआयबीने याबाबतची एक्स पोस्ट करुन या नव्या तांदळाच्या किंमतीबाबत माहिती दिली आहे.
केंद्रीय अन्न मंत्री पियुष गोयल यांनी या नव्या तांदळाबाबत माहिती दिलेली होती. आज हा तांदुळ लॉन्च करुन याच्या उपलब्धेबाबत आणि किमतीबाबत माहिती पीआयबीने एक्स पोस्टद्वारे दिली आहे. या स्वस्त भारत तांदळाची विक्री सुरू करण्यात आली असून ५ किलो आणि १० किलो पॅकिंगमध्ये हा तांदुळ उपलब्ध असणार आहे. तसेच २९ रुपये किलो असा याचा दर असणार आहे. अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
पीआयबीने केलेल्या पोस्टवर लिहीले आहे की, 'भारत तांदूळ' केंद्रीय भंडार, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या भौतिक आणि मोबाईल आउटलेटवर उपलब्ध असेल. नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) यांच्याद्वारे संयुक्तरित्या ही स्वस्त तांदूळ देण्याची मोहिम राबवण्यात येणार आहे.
तारीख : 29-11-2023श्रेणी :शेती
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : मावळ तालुक्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये उभ्या शेतातील भातपीके तसेच जनावरांचा पेंडा देखील पावसाने भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मावळ तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून हवालदिल झालेल्या शेतकरी व इतर व्यावसायिकांना योग्य ती मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना ज्येष्ठ नेते भारतदादा ठाकूर, तालुका संघटक मदन शेडगे, यशवंत तूर्डे, उप तालुकाप्रमूख सोमनाथ कोंडे, उमेश गावडे, गणेश लष्करी, बाळासाहेब शिंदे, अरुण गायकवाड, नारायण कारके, दत्तात्रय लोंढे, बाजीराव शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.
तारीख : 22-11-2023श्रेणी :शेती
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांच्या खात्यावर सरकारने जाहीर केलेली ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदत त्वरित जमा करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मावळ तालुका भाजप किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला.
या संदर्भात भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुभाष धामणकर, कार्याध्यक्ष विकास शेलार, उपाध्यक्ष शांताराम दरेकर, विकास सोसायटीचे अध्यक्ष गुलाबराव घारे, गणेश भांगरे, धनंजय टिळे, विलास दळवी, सोमनाथ काळे, हरिभाऊ दळवी, शंकरराव पगडे, मारुती वाळुंजकर, विशाल राक्षे आदींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून मावळ तालुका व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०१९ मध्ये घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड मार्च २०२० मध्ये बँकेच्या व संस्थेच्या नियमानुसार केली होती. नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर मदत देण्याचे सरकारने जाहीर केले होते. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही ही मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे, कर्जाची परतफेड नियमित व वेळेवर करून चूक तर केली नाही ना, अशी संभ्रमावस्था शेतकरी वर्गामध्ये निर्माण झालेली आहे.
२८६५ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर मदत जमा
तालुक्यामध्ये नियमित व वेळेवर कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ७ हजार ११० असून, त्यापैकी २ हजार ८६५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सरकारने प्रोत्साहनपर मदत जमा केलेली आहे. परंतु, उर्वरित शेतकरी सभासदांना प्रोत्साहनपर मदत मिळणे बाकी आहे. मदत जमा नझाल्याने शेतकरी द्विधा मनः स्थितीत असून त्याचा विविध कार्यकारी सोसायट्यांच्या कर्जवसुलीच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तालुकाध्यक्ष सुभाष धामणकर यांनी सांगितले.