तारीख : 13-06-2024श्रेणी :गुन्हेगारी
तारीख : 25-08-2025श्रेणी :गुन्हेगारी
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. रविवारी (दि. २४ ऑगस्ट) सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह मध्यरात्री रेल्वे स्टेशन शेजारील तलावातून सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू असून, मृत्यूचे कारण अपघात की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव साक्षी कांतीकुमार भावर (वय २२, रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे, मूळगाव – बऊर) असे आहे. सायंकाळी घरी न परतल्याने व मोबाईलवर संपर्क होत नसल्याने तिच्या नातेवाइकांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
तक्रार मिळताच पोलिस निरीक्षक प्रविण कांबळे व उपनिरीक्षक भरत वारे यांनी मोबाईल लोकेशन तपासले असता ते तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनलगतच्या तलाव परिसरात असल्याचे आढळले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान तलावाच्या काठावर साक्षीची बॅग व मोबाईल सापडले. त्याचवेळी पाण्यात तरंगणारे बूट दिसल्याने संशय बळावला. पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी दाखल होऊन शोधकार्य सुरू केले.
टीममधील सदस्य राजेंद्र बंडगे व गणेश गायकवाड यांनी पाण्यात तपास केला असता साक्षीचा मृतदेह सापडला. तिच्या भावाच्या उपस्थितीत मृतदेहाची ओळख पटली. घटनास्थळीच CPR देऊन तिला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो निष्फळ ठरला. नंतर रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या शोध मोहिमेत निलेश गराडे, शुभम काकडे, गणेश गायकवाड, राजेंद्र बंडगे, राजू सय्यद व अनिश गराडे यांनी सहकार्य केले.
साक्षीने परिधान केलेल्या टी-शर्टवरून ती रिलायन्स डिजिटल कंपनीत काम करत असावी, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांकडून मृत्यूचे कारण अपघात की आत्महत्या याची चौकशी सुरू आहे. अवघ्या काही तासांत बेपत्ता तक्रारीपासून मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तारीख : 25-08-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala): मावळातील पर्यटननगरी लोणावळ्यात १९ ऑगस्ट रोजी दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घरांवर धाड टाकली. या घरफोडींमध्ये तब्बल ५ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना १९ ऑगस्टच्या संध्याकाळी ते २० ऑगस्टच्या सकाळपर्यंत घडल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.
पहिली चोरी – सुजल पार्क सोसायटीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम
भांगरवाडी येथील सुजल पार्क सोसायटीत राहणारे योगेश कोठावदे हे आपल्या कुटुंबासह १९ ऑगस्ट रोजी कल्याण येथे गेले होते. त्यावेळी घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून त्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ५ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दुसरी चोरी – गोखले पार्कमध्ये १० हजारांचा ऐवज गायब
त्याच कालावधीत भांगरवाडीतील गोखले पार्कमध्ये भरत मेंगडे यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केला. त्यांच्या घरातून रोख रक्कम व चांदीच्या पट्ट्या असा १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद लोणावळा शहर पोलिसांत झाली आहे.
पोलिस तपास सुरू
पावसामुळे रस्त्यावर वर्दळ कमी असताना चोरट्यांनी या घरफोड्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तारीख : 24-08-2025श्रेणी :गुन्हेगारी
शिरगाव (Shirgaon) : शिरगाव–कासारसाई रस्त्यावर मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणाला अवैध पिस्तुलासह पकडण्यात आले. बुधवारी (दि. २० ऑगस्ट) रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास गोडुंब्रे फाटा येथे हि कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
सचिन रमेश बंदीछोडे (वय २४, रा. म्हाळसकरवाडी, वडगाव, ता. मावळ) असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकरणी प्रशांत नारायण पवार (पोहवा ७९४, गुन्हे शाखा युनिट-५, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय) यांनी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास गोडुंब्रे फाटा येथील जय मल्हार ड्रायक्लीनर दुकानासमोर संशयित युवक दिसून आला. चौकशीदरम्यान त्याच्याकडे सुमारे ४० हजार रुपयांचे गावठी पिस्तुल आणि १ हजार रुपयांचे जिवंत काडतूस आढळून आले. आरोपीकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याने पोलिसांनी त्याला त्वरित ताब्यात घेतले. पुढील तपास शिरगाव-परंदवडी पोलीस करत आहेत.
तारीख : 23-08-2025श्रेणी :गुन्हेगारी
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : `CRPF मध्ये नोकरी करतो’ सांगून जुनं घरगुती साहित्य देण्याच्या आमिषाने एका रिक्षाचालकाला ४५ हजारांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार २७ जुलै २०२५ रोजी अल्टीनो कॉलनी, तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे घडला. याबाबत गुरुवारी (दि. २१ ऑगस्ट) रोजी तक्रार दाखल करण्यात आली.
याप्रकरणी रिक्षाचालक युवराज उत्तम पाटील (वय ४७, रा. कात्रज, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. रविंद्र वायकर नावाचे फेसबुक खाते चालवणारी अनोळखी व्यक्ती आणि संतोष कुमार यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष कुमार याने फिर्यादीला फोन करून स्वतःला CRPF मध्ये सरकारी नोकरी करत असल्याचे खोटं भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जुनं घरगुती साहित्य – टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन इत्यादी वस्तू फक्त ४५ हजारमध्ये विकण्याचे आमिष दाखवले. यासाठी फिर्यादीकडून PhonePe स्कॅनरद्वारे ४५ हजार रुपये स्वीकारले, मात्र त्यानंतर वस्तू न देता आरोपी फरार झाले. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
तारीख : 23-08-2025श्रेणी :गुन्हेगारी
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : तळेगाव दाभाडे परिसरात जुना मुंबई–पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मिक्सर व्हालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे बुधवारी (दि. २० ऑगस्ट) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
याप्रकरणी हर्षल वंसत ओसवाल (वय २५, रा. बाजारपेठ, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवेशकुमार रामफल साकेत (वय २३, तळेगाव MIDC रोड, कातवी, मूळ रा. मध्यप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा चुलत भाऊ वैभव इंदरमल ओसवाल (वय २५) हा आपल्या दुचाकी क्रमांक MH-14-JT-2312 वरून बाणेरवरून तळेगावकडे येत होता. रात्री आठ वाजता तो जुना मुंबई–पुणे महामार्गावरील मयुर हॉटेलसमोर आला असता, मागून येणाऱ्या मिक्सर गाडी क्रमांक MH-11-AL-7335 ने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की वैभव ओसवाल यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाने भरधाव वेग, हयगय, निष्काळजीपणा आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी सपोनि यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली जात आहे.