तारीख : 13-08-2023श्रेणी :आरोग्य
तारीख : 06-12-2023श्रेणी :आरोग्य
पुणे (Pune) : राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून याबाबत आढावा घेण्याकरीता आलेल्या केंद्र शासनाच्या क्षयरोग पथकाने मावळ, खेड व दौंड तालुक्यातील खासगी रुग्णालये, खासगी प्रयोगशाळा, खासगी औषधविक्रेते यांना भेटी देवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनीदेखील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक यांच्यासोबत बैठक घेतली. खासगी क्षेत्रातील क्षयरुग्ण नोंदी वाढविणे, खासगी व्यवसायीकांना कामकाजाबाबत पत्र देवून अनुदान वेळेत वितरित करावे, राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत संबंधितांनी रिक्त पदे तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी आदी सूचना त्यांनी दिल्या.
राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रम सर्व शासकीय आरोग्य संस्थेमार्फत राबवला जातो. याअंतर्गत जास्तीत जास्त क्षयरुग्णांची नोंदणी करून तपासणी व नोंदणी केली जाते. रुग्ण काही वेळेस उपचार घेण्यास टाळाटाळ करतात व उपचार पूर्ण न केल्यास क्षय रुग्णाला धोकादायक स्थितीला सामोरे जावे लागते. परिणामी महागडी औषधे घ्यावी लागतात व त्यानंतर तो नियमित औषधोपचारांना दाद देत नाही. हे लक्षात घेता अभियानास बळकटी येण्याकरीता खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स, खासगी प्रयोगशाळा, खासगी औषधविक्रेते यांचा सहभाग घेण्यात येत आहे.
तारीख : 16-11-2023श्रेणी :आरोग्य
पुणे (Pune) : पुणेकरांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात झिका आजाराचा यंदा पहिला रुग्ण आढळला आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमात हजेरी लावलेल्या ६४ वर्षीय महिलेला झिकाची बाधा झाली आहे. त्यामुळे या संसर्गाचे पिंपरी चिंचवड कनेक्शन तर नाही ना? हा तपास सुरू आहे. दरम्यान, पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात परिसरात या बातमीने खळबळ माजवली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळतय. त्यानुसार आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील सुरू केल्या आहेत.
येरवडा परिसरातील प्रतीकनगर येथे ही महिला राहत होती. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाला तिने हजेरी लावली. मात्र यापूर्वी १५ ऑक्टोबर रोजी ती केरळला गेली होती. पिंपरी-चिंचवड मधील कार्यक्रम संपल्यानंतर ५ नोव्हेंबरला तिला ताप आला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तिला पुण्यातील खासगी रुणालयात दाखल करण्यात आले. रक्ताचा नमुना १० नोव्हेंबर ला NIV ला पाठवला होता. ११ नोव्हेंबर रोजी तिचा झिका पॉझिटीव्ह अहवाल आला.
दरम्यान, पिंपरी- चिंचवडमधील सांस्कृतिक कार्यक्रमाला केरळमधील अनेक जण उपस्थित होते. त्यातील एखाद्या बाधित व्यक्तीकडून या महिलेला संसर्ग झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी प्रतिक नगर येरवडा येथे प्रत्यक्ष रुग्णाची भेट घेतली. रुग्णाची विचारपूस करून तब्येतीची काळजी घेण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या कर्मचा-यांना झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे आदेश देण्यात आले.
तारीख : 08-09-2023श्रेणी :आरोग्य
टाकवे बुद्रुक (Takwe Budruk) : टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात नर्सिंग कोर्सच्या बॅचचे उद्घाटन करण्यात आले. कान्हे (ता. मावळ) येथील महिंद्रा कंपनीच्या सीएसआर फंडातून माफोई फाऊंडेशन चेन्नई व अथर्व विजय येवले सोशल फाऊंडेशन मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिला व युवतींसाठी जनरल ड्युटी असिस्टंट (नर्सिग) हा कोर्स उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मावळातील १०५ महिला व मुलींना या कोर्सचा लाभ होणार असून ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण व कौशल्य विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कोर्समूळे रोजगार उपलब्ध होईल व सर्वांचेच आरोग्य जोपासण्यात मोठी मदत होईल. ग्रामीण भागातील महिलांचे कौशल्य विकसित होऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सदर उद्घाटन कार्यक्रमात शिवाजी झणझणे, सुरेन्द्र नेवासकर, रोहित तिकोणे, उपसरपंच प्रतिक्षा जाधव, माजी उपसरपंच अविनाश असवले, नितिन भांगरे यांसह ग्रामस्थ, युवती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महिंद्रा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. व्यंकटेश राव माफोई फाऊंडेशन यांनी सदर प्रशिक्षणाचे महत्व पटवून दिले. प्रशिक्षक मावळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. माया येवले, अथर्व विजय येवले सोशल फाऊंडेशन यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वाचे आभार मानले.
दरम्यान, टाकवे येथील बॅचमध्ये आंदर मावळ परिसरातील ४५ महिलांनी नाव नोंदनी केली आहे. सदर प्रशिक्षण संपूर्ण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांना सीमा शिंदे व सुभाष मावळे यांच्याकडून प्रशिक्षण मिळणार आहे. हा कोर्स तीन महिने सुरू राहील व दीड महिना प्रॅक्टिकल राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. आभार प्रदर्शन वंदना कदम यांनी केले.
तारीख : 13-08-2023श्रेणी :आरोग्य
प्रजावार्ता : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (दि. २८ डिसेंबर २०१५) च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १५ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील गरीब, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना नि:शुल्क उपचार मिळणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ नुसार प्रत्येक नागरिकास जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून प्रदान करण्यात आलेला आहे. प्रत्येक नागरीकास चांगल्या आरोग्यासाठी उपचार मिळाले पाहिजेत. राज्यातील प्रत्येक नागरिकास नि:शुल्क, दर्जेदार, सहज व विनाविलंब वैद्यकीय सेवा देण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयातून नि:शुल्क उपचाराचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य हक्क राज्यातील नागरिकांना उत्तमरित्या देण्याकरीता आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमध्ये संसाधने, साधन – सामुग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ, औषधांची उपलब्धता, आरोग्य विषयक जनजागृती, लसीकरण, औषधोपचार असे अनेक घटक असून रूग्णशुल्काचा यामध्ये समावेश होतो. सद्यस्थितीत आरोग्य संस्थामधील औषधे व उपचारावरील रुग्ण शुल्क नि:शुल्क होणार असल्यामुळे सर्व वंचित, दुर्बल घटकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

शासनाकडून जनतेसाठी आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेतंर्गत ५ लाख रूपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी शासनाने यापूर्वीच घेतली आहे. या योजनांमधून राज्यातील सर्व नागरीकांना आरोग्य खर्चाचे कवच शासनाने उपलबध करून दिले आहे. राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त व रक्त घटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे सेवा शुल्क वगळून शासकीय रूग्णालयांमधून करण्यात येणाऱ्या तपासण्या व उपचार, तसेच सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील वैद्यकीय सेवा नि:शुल्क करण्यात येणार आहेत.
प्रजावार्ता न्यूज नेटवर्क : उत्तम ठाकर (८४२११८७११०)
तारीख : 03-08-2023श्रेणी :आरोग्य
पुणे (Pune) : जिल्ह्यातील गरजू रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार करण्यासाठी आणि त्यांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालय मैदानावर ६ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात महाआरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिबिराचे समन्वयक रामेश्वर नाईक, मनपा उपायुक्त महेश पाटील, विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी कदम म्हणाल्या, रुग्णसेवेसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याने अधिकाऱ्यांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा. शिबिराच्या ठिकाणी स्वच्छता व पाण्याची सुविधा करण्यात यावी. लोकसहभागातून शिबिराचे आयोजन होत असल्याने सर्व यंत्रणांनी आयोजनात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नाईक यांनी महाआरोग्य शिबिराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून लोकसहभागाद्वारे अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिरात निदान झालेल्या गंभीर आजारावर जागतिक किर्तीच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिरात औषधाची गरज असणाऱ्यांना ती मोफत देण्यात येतील. गरजू रुग्णांना वैद्यकीय साधने आणि सुविधा देण्यात येतील आणि आवश्यक असल्यास विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० तज्ज्ञ डॉक्टर आणि विविध संस्थांशी सहकार्याबाबत चर्चा केली आहे. या सर्वांच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. हे सेवाकार्य असल्याने सर्व विभागांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
महाआरोग्य शिबिरासाठी २२ जुलै पासून आत्तापर्यंत सुमारे ५८ हजार नागरिकांची पूर्व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात रक्त, लघवी तपासणी व एक्सरे आदी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता शिबिराचे उदघाटन करण्यात येणार आहे. महाआरोग्य शिबीरात सर्व पॅथींचा समावेश असणार आहे. डॉ. वाकणकर, डॉ. गौतम भंसाळी, डॉ. रमाकांत देशपांडे, डॉ. के.एच. संचेती, डॉ. विकास महात्मे, डॉ. यशराज पाटील, डॉ. ललवाणी, डॉ. चंदनवाले, डॉ. तांबे, डॉ. जगन्नाथ दिक्षीत, डॉ. अमित मायदेव, डॉ. अजय चौरसिया असे तज्ज्ञ डॉक्टर्स शिबिरास उपस्थित राहणार आहेत.
शिबिरात एकूण ८० बाह्यरुग्ण कक्षांचा समावेश असणार आहे. बाह्यरुग्ण कक्षांत आयुष, नेत्रचिकीत्सा, दंतचिकीत्सा, कान, नाक, घसा, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, हृदयरोग, श्वसनविकार, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, अनुवंशिक विकार, कर्करोग, लठ्ठपणा, वृद्धांची सामान्य तपासणी, मतीमंद रुग्ण तपासणी, मनोविकार, मेंदुरोग इत्यादी आजांरावर विनामुल्य औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या आवश्यक रक्त व लघवी चाचणी नमुने संकलन, तसेच इ.सी.जी, मॅमोग्राफी, पी.एफ.टी., बी.एम.डी. तपासणी करण्यात येईल.
गरजू रुग्णांना कृत्रिम अवयव, चष्मे, वृद्ध काठी, अंधकाठी, दिव्यांग साहित्य, कर्णयंत्र, दातांच्या कवळ्या यांचे नोंदणीनुसार वाटप करण्यात येईल. सर्व रुग्ण व रुग्णनातेवाईक यांना मोफत नाश्ता व भोजनाची सोय करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.