तारीख : 06-08-2025श्रेणी :गुन्हेगारी
तारीख : 08-08-2025श्रेणी :गुन्हेगारी
पिंपरी (Pimpri) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढत्या औद्योगिक, व्यापारी आणि रहिवासी वसाहतींसह वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालला आहे. चाकण, भोसरी, महाळुंगे, तळेगाव ही औद्योगिक केंद्रे आणि हिंजवडी-तळवडे आयटी पार्क परिसरात मोठ्या संख्येने जड अवजड वाहने, खाजगी गाड्या आणि मालवाहतूक वाहने रस्त्यावर वाढल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
त्यात बेदरकार, हयगयीने वाहन चालवणारे चालक आणि रस्त्याच्या कडेला अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांमुळे वाहतूक विस्कळीत होत असून नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण होत आहे. या धोकादायक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष मोहिम राबवली.
तीन दिवसांचा सर्जिकल स्ट्राइक
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, पोलीस सहआयुक्त डॉ. शशीकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, वाहतूक शाखेने ५ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर धडक कारवाई केली.
या मोहिमेत चाकण, भोसरी, महाळुंगे, तळेगाव ही औद्योगिक केंद्रे आणि हिंजवडी-तळवडे आयटी पार्क परिसरात भारतीय न्याय संहिता कलम २८१ (धोकादायक वाहनचालक) आणि कलम २८५ (सार्वजनिक वाहतुकीस अडथळा) अंतर्गत कारवाई करण्यात आली. कलम २८१ अंतर्गत ३६ गुन्हे नोंद, ४१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर कलम २८५ अंतर्गत ५४ गुन्हे नोंद, ७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. म्हणजेच, अवघ्या तीन दिवसांत एकूण ९० गुन्हे नोंदवून ११२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
वाहनचालकांना पोलिसांचा इशारा
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास केवळ दंडच नाही, तर न्यायालयीन कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते, असा इशारा वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील यांनी दिला आहे.
नागरिकांची अपेक्षा — मोहिम कायमस्वरूपी व्हावी
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या मोहिमेचे स्वागत केले असून, अशा कारवाया फक्त काही दिवस मर्यादित न ठेवता सातत्याने राबविण्याची मागणी केली आहे.
तारीख : 07-08-2025श्रेणी :गुन्हेगारी
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : गेल्या काही वर्षांपासून मावळात जमीन व्यवहारात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे सातत्याने वाढत आहेत. त्यात आता दुसऱ्याच्या नावाची बनावट कागदपत्रे बनवून दुसऱ्याच्याच जमिनीत वारस नोंदणी करून ती जमीन विकण्याचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. १ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील जमिनीबाबत ही घटना घडली. याबाबत बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर दशरथ काजळे (रा. चिखलसे, ता. मावळ), देवानंद मंगल उपाध्याय (रा. पुनावळे ता. हवेली), एक अनोळखी महीला व एक अनोळखी पुरुष अशा या चौघांवर तळेगाव दाभाडे पोळीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनोळखी महिला व पुरुष यांनी फिर्यादीचे खोटे नाव वर्षा सुनिल पुराणिक व फिर्यादीच्या भावाचे आशुतोष विवेक क्षिरसागर असे खोटे नाव धारण करून बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार केले. ते तलाठी कार्यालय येथे सादर केले आणि फिर्यादीच्या तळेगाव दाभाडे येथील सर्वे नं. ४६/२/ब/१/अ यासी क्षेत्र १ हेक्टर ५२ आर. मध्ये वारस नोंदणी करुन सदरची जमिन आरोपी काजळे आणि उपाध्याय यांना विक्री करून फिर्यादीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास टाळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.
तारीख : 27-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : पर्यटकांची सदैव गर्दी असलेल्या आणि थंड हवेचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात एका तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (दि. २५ जुलै) रात्री तुंगार्ली परिसरात तिघा अज्ञात व्यक्तींनी पादचारी तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली असून, लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पीडित तरुणी तुंगार्ली परिसरातून एकटीच पायी जात असताना, अचानक एक चारचाकी गाडी तिच्यासमोर थांबली. गाडीतून उतरलेल्या तिघांनी तिला धमकावून गाडीत बसवले. तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि हातपाय बांधून तिला गाडीतून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून अत्याचार केला, अशी माहिती पीडितेने दिली आहे.
यानंतर आरोपींनी तरुणीला नांगरगाव परिसरात सोडून दिले आणि घटनास्थळावरून फरार झाले. घाबरलेली आणि हादरलेली तरुणी काही वेळ तिथेच थांबली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला जवळच्या मंदिरात नेण्यात आले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली गेली.
पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, तिघा अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.
तारीख : 27-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळील खंडाळा घाटात शनिवारी (दि. २६ जुलै) दुपारी एक भीषण अपघात घडला. ब्रेक फेल झालेल्या एका भरधाव कंटेनरने एका मागोमाग तब्बल २५ वाहनांना धडक दिली. या भीषण साखळी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत.
मृत महिला अनिता सहदेव एखंडे (वय ५५, रा. पाडोळी, धाराशिव) अशी ओळख पटली आहे. ही धक्कादायक घटना नवीन खोपोली बोगद्याजवळील फूड मॉलच्या परिसरात घडली. या अपघातामुळे काही वेळासाठी महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.
कसा घडला अपघात?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खंडाळा घाट परिसरातील रस्ते ओले आणि धोकादायक बनले आहेत. शनिवारी दुपारी सुमारे २ वाजता एक कंटेनर घाटातून उतरत असताना त्याचे ब्रेक अचानक निकामी झाले. कंटेनरचा वेग वाढत गेला आणि एका मिनिटाच्या आत त्याने समोरील गाड्यांवर जोरदार धडक दिली.
या धक्क्यांमध्ये एका मिनीबससह अनेक कार, आणि ट्रेलर आणि कंटेनर सारख्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. कंटेनरच्या जोरदार धडकेत मिनीबसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले. सुदैवाने बचावकार्य तत्काळ सुरू झाल्याने अनेक जीव वाचवले गेले.
जखमींवर तातडीने उपचार
अपघातानंतर खोपोली पोलीस, महामार्ग पोलिस, हेल्प फाउंडेशन, आयआरबी, डेल्टा फोर्स यांच्यासह आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकांनी जखमींना वेळीच गाड्यांमधून बाहेर काढून खोपोली व नवी मुंबईतील रुग्णालयांमध्ये दाखल केले. काहींची प्रकृती चिंताजनक असून, डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत.
वाहतूक पुन्हा सुरळीत
अपघातग्रस्त वाहनांची साफसफाई आणि मार्गमुक्तीच्या कामासाठी महामार्ग पोलिसांनी मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी केली होती. सुमारे दोन तासांनी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. या घटनेनंतर घाटमाथ्यावरून वाहने सावधगिरीने चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी घ्यावी काळजी
खंडाळा घाट परिसरात मुसळधार पावसाचे प्रमाण वाढत असून, अशा हवामानात वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे, योग्य ब्रेक चाचणी करूनच प्रवास करणे, आणि घाटातून जाताना विशेष सतर्क राहणे आवश्यक असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.
तारीख : 26-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : लोणावळा बाजारपेठेत एका किरकोळ वादातून घडलेली हिंसक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका पान टपरी चालकाने तरुणाला मारहाण करत सुपारी कापायच्या अडकित्याने त्याचं बोट कापल्याची गंभीर घटना बुधवारी (दि. २३ जुलै) घडली.
या प्रकरणी रामेश्वर विश्वकर्मा (वय २४, रा. मावळ) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार रझा कमरुद्दीन शेख (वय २०, रा. लोणावळा) या पान टपरी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामेश्वर यांच्या वस्तू असलेली एक साहित्याची बॅग आरोपीच्या टपरीवर राहिली होती. ती बॅग मागण्यासाठी ते टपरीवर गेले असता आरोपी रझा शेख याने बॅग देण्यास साफ नकार दिला. वाद विकोपाला जाऊन आरोपीने फिर्यादीला ढकलून दिलं आणि त्याच्याजवळ असलेल्या सुपारीच्या अडकित्याने करंगळी जवळील बोटाचा टोकाचा भाग कापून टाकला. एवढ्यावरच न थांबता त्याने शिवीगाळ करत बॅग न देण्याचा इशारा दिला. घटनेनंतर लोणावळा शहर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून, भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांअंतर्गत आरोपीविरोधात कारवाई सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
बाजारपेठेसारख्या वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी याबाबत अधिक सतर्क राहून गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.