तारीख : 27-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
तारीख : 06-08-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : मावळ तालुक्यात एक गंभीर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. एकाच जमिनीवर दुसऱ्यांचे बनावट हक्क सांगून, खोटी कागदपत्रे तयार करून जमीन बेकायदेशीरपणे खरेदी करण्याचा बनाव करण्यात आला आहे. १४ ऑक्टोबर २०२४ ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत पवन मावळ परिसरातील अजिवली येथे ही घटना घडली.
याप्रकरणी सुनील दिनदयाल गुप्ता (वय ५२, रा. भांगरवाडी, लोणावळा) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार रविंद्र धोंडू केंडे, दिपक धोंडू केंडे, सोमनाथ धोंडू केंडे आणि गणपत धोंडू केंडे,प्रकाश गंगाराम ठोंबरे, सुनिता गणपत शिवेकर, सुजाता दिनेश शिंदे, मंगेश गोविंद ठोंबरे, गणेश गोविंद ठोंबरे, लता अनंत फाटक व संगीता बंडू येवले यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुप्ता यांच्या मालकीची गट क्रमांक ८८ व ४५२ मधील एकूण ४२.२२ आर क्षेत्रफळाची जमीन त्यांनी कायदेशीर खरेदीखताद्वारे विकत घेतली होती. मात्र, आरोपी रविंद्र, दीपक, सोमनाथ आणि गणपत केंडे या चौघांनी आधीच ही जमीन विकली असल्याचे माहिती असूनही, इतर सहआरोपींना हाताशी धरून बनावट कागदपत्रांची रचना केली.
प्रकाश ठोंबरे, सुनिता शिवेकर, सुजाता शिंदे, मंगेश ठोंबरे, गणेश ठोंबरे, लता फाटक आणि संगीता येवले या व्यक्तींच्या मदतीने ही बनावट कागदपत्रे तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केली. तसेच बनावट दस्ताऐवजांच्या आधारे गुप्ता यांच्या मालकीची जमीन इतरांच्या नावे दाखवून ती विकल्याचे भासवण्यात आले. हे कृत्य केवळ आर्थिक फसवणूक नसून, जमिनीच्या बेकायदेशीर ताब्यासाठी एक संगनमताने रचलेले षड्यंत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
तारीख : 27-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : पर्यटकांची सदैव गर्दी असलेल्या आणि थंड हवेचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात एका तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (दि. २५ जुलै) रात्री तुंगार्ली परिसरात तिघा अज्ञात व्यक्तींनी पादचारी तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली असून, लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पीडित तरुणी तुंगार्ली परिसरातून एकटीच पायी जात असताना, अचानक एक चारचाकी गाडी तिच्यासमोर थांबली. गाडीतून उतरलेल्या तिघांनी तिला धमकावून गाडीत बसवले. तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि हातपाय बांधून तिला गाडीतून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून अत्याचार केला, अशी माहिती पीडितेने दिली आहे.
यानंतर आरोपींनी तरुणीला नांगरगाव परिसरात सोडून दिले आणि घटनास्थळावरून फरार झाले. घाबरलेली आणि हादरलेली तरुणी काही वेळ तिथेच थांबली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला जवळच्या मंदिरात नेण्यात आले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली गेली.
पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, तिघा अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.
तारीख : 26-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : लोणावळा बाजारपेठेत एका किरकोळ वादातून घडलेली हिंसक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका पान टपरी चालकाने तरुणाला मारहाण करत सुपारी कापायच्या अडकित्याने त्याचं बोट कापल्याची गंभीर घटना बुधवारी (दि. २३ जुलै) घडली.
या प्रकरणी रामेश्वर विश्वकर्मा (वय २४, रा. मावळ) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार रझा कमरुद्दीन शेख (वय २०, रा. लोणावळा) या पान टपरी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामेश्वर यांच्या वस्तू असलेली एक साहित्याची बॅग आरोपीच्या टपरीवर राहिली होती. ती बॅग मागण्यासाठी ते टपरीवर गेले असता आरोपी रझा शेख याने बॅग देण्यास साफ नकार दिला. वाद विकोपाला जाऊन आरोपीने फिर्यादीला ढकलून दिलं आणि त्याच्याजवळ असलेल्या सुपारीच्या अडकित्याने करंगळी जवळील बोटाचा टोकाचा भाग कापून टाकला. एवढ्यावरच न थांबता त्याने शिवीगाळ करत बॅग न देण्याचा इशारा दिला. घटनेनंतर लोणावळा शहर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून, भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांअंतर्गत आरोपीविरोधात कारवाई सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
बाजारपेठेसारख्या वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी याबाबत अधिक सतर्क राहून गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तारीख : 22-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
पुणे (Pune) : पुणे ग्रामीण भागात घरमालकांनी भाडेकरू ठेवण्याआधी त्यांची सविस्तर माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात सादर करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. हे आदेश पुण्याचे अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले असून, पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहणार आहेत.
कोणती माहिती द्यावी लागणार?
घरमालकांनी भाडेकरूंविषयी खालील माहिती पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे:
• भाडेकरूचे पूर्ण नाव
• सध्याचा व कायमचा (मूळ) पत्ता
• दोन पासपोर्ट साईज छायाचित्रे
• भाडेकरूला ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता
• भाडे करारनाम्याची प्रत
• आधार कार्ड/पॅन कार्डसारखे ओळखपत्र
नियम मोडल्यास काय होईल?
जर घरमालकांनी ही माहिती पोलीस ठाण्यात दिली नाही, तर त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार दंडनीय कारवाई होऊ शकते.
या आदेशामागील कारण
पुणे ग्रामीण जिल्ह्यात औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे येथे अनेक परप्रांतीय नागरिक कामासाठी येतात. काही वेळा या परिस्थितीचा गैरफायदा घेत गुन्हेगारी व दहशतवादी कारवाया घडू शकतात. त्यामुळे पोलिसांकडे भाडेकरूंची अचूक माहिती असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तारीख : 19-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिकोना (ता. मावळ) परिसरात असलेल्या एका बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. कंपाऊंड वॉलमधील जाळी तोडून प्रवेश करत टीव्ही व रोख रक्कम असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. ७ मार्च २०२५ ते १८ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या कालावधीत घडली.
याप्रकरणी मोहमद मुजीब खान (वय ५५, रा. अदिल पॅलेस, संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली असून ते मोहमद अजहर उद्दीन यांचे पी.ए. आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी बंगल्याच्या मागील भिंतीवरील जाळी तोडून, पहिल्या मजल्यावरील गॅलरीत प्रवेश केला. गॅलरीच्या उत्तर बाजूला असलेली खिडकी उचकटून ते घरात शिरले आणि टीव्ही व ५० हजार रुपये रोख असा एकूण ५७ हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच बंगल्यातील इतर वस्तूंची तोडफोडही करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एस. बोकड हे करत आहेत.