तारीख : 30-06-2025श्रेणी :महाराष्ट्र
तारीख : 30-07-2025श्रेणी :महाराष्ट्र
पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड शहराच्या न्यायिक विकासाच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) अशा दोन स्वतंत्र न्यायालयांच्या स्थापनेला अखेर मान्यता मिळाली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे शहरातील नागरिकांना आता न्यायासाठी पुण्याला धावपळ करावी लागणार नाही, तर स्थानिक पातळीवरच न्यायाची सोय उपलब्ध होणार आहे.
भाजपा आमदार महेश लांडगे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याच्या फलश्रुतीस्वरूप राज्य सरकारने या न्यायालयांसाठी आवश्यक पदांनाही अधिकृत मान्यता दिली आहे. पक्षकार, वकील, आणि सामान्य नागरिक यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.
१६ एकर जागेत न्यायालय संकुल उभारणीची तयारी
पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रातील मोशी येथील सेक्टर १४ मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीत सुमारे १६ एकर क्षेत्र आरक्षित करण्यात आले आहे. या ठिकाणी नवीन न्यायालय संकुल उभारण्यात येणार आहे. इमारतीच्या प्रतीक्षेत असलेले न्यायालय आता अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक स्वरूपात कार्यरत होणार आहे.
न्यायप्रक्रियेला गती, नागरिकांना दिलासा
या न्यायालयांच्या स्थापनेमुळे आता पक्षकारांची गैरसोय दूर होणार असून, स्थानिक वकिलांना अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. न्यायप्रक्रियेचा वेळ कमी होईल आणि प्रलंबित प्रकरणांवर अधिक प्रभावीपणे कार्यवाही होणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा न्यायिक दर्जा आणि गरिमा मोठ्या प्रमाणात उंचावणार आहे.
“हा निर्णय म्हणजे पिंपरी-चिंचवडकरांच्या न्यायहक्काचा विजय आहे. हे न्यायालय फक्त एक इमारत नाही, तर न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो नागरिकांसाठी आशेचं केंद्र ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे यासाठी मनःपूर्वक आभार!”
- महेश लांडगे (आमदार, भोसरी विधानसभा)
तारीख : 26-07-2025श्रेणी :महाराष्ट्र
पवनानगर (Pawananagar) : पवन मावळ परिसरात गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण क्षेत्रात जलसाठा झपाट्याने वाढत आहे. धरण सध्या ८६.३४ टक्के भरले आहे. परिणामी, धरण प्रशासनाने शनिवारी (२६ जुलै) सकाळी ९ वाजता ७,४१० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू केला असून, याचा मोठा परिणाम परिसरातील वाहतुकीवर झाला आहे.
धरणात जलस्तर वाढल्यामुळे विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पवना धरणातून पवना नदीत सुरू असलेल्या जलप्रवाहामुळे कोथुर्णे येथील पूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा संपर्क पवनानगर बाजारपेठेशी तुटला आहे. या गावांतील नागरिकांना आता शिवली–ब्राम्हणोली किंवा कडधे मार्गे कामशेत व पवनानगरकडे प्रवास करावा लागत आहे.
विसर्गामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम; शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व दूध व्यावसायिकांचे हाल!
विसर्गामुळे सामान्य जीवनमानावर मोठा परिणाम झाला आहे. शाळा जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लांबच्या फेऱ्याने प्रवास करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे बाजारात येणं कठीण झालं आहे. दूध व्यावसायिकांचे वितरण थांबले आहे. यासह येथील वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
पूर नियंत्रण कक्षाची सूचना
पुणे जिल्हा पुर नियंत्रण कक्षाने पिंपरी-चिंचवड, पवनानगर आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे की, पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू आहे, त्यामुळे विसर्ग कधीही वाढवावा लागू शकतो.
पाऊस अजूनही सुरू
दरम्यान, पवना धरण परिसरात अतिमुसळधार पावसाचा जोर कायम आहे. धरण प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, जलसाठ्याच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी पावसाच्या माहितीवर लक्ष ठेवावं.
तारीख : 21-07-2025श्रेणी :महाराष्ट्र
देहूगाव (Dehugaon) : तब्बल १७ वर्षांच्या नंतर आळंदीत एक दिवसाच्या मुक्कामा नंतर श्री संत ज्ञानेश्वर महारांजांची भेट घेऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा ३५ दिवसांचा प्रवास करून सोमवारी (ता. २१) देवभूमी देहूनगरीत सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुख्यप्रवेशद्वार कमानीत आली.
पहाटे आळंदीतून पालखी निघाल्यानंतर आळंदी ते देहू दरम्यानच्या डुडुळगाव, मोशी, टाळगाव चिखली, तळवडे व विठ्ठलनगरच्या ग्रामस्थांनी ठिकठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घालून स्थानिक गावकऱ्यांनी पालखीचे स्वागत केले व पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. देहूकरांनसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मात्र पालखी सोहळ्याचे पारंपारिक पध्दतीने भक्तीमय आणि आनंदमयी वातावरणात ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहाने स्वागत केले.
देहूतील मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे दुपारी साडेचारच्या सुमारास आगमन झाले. दरम्यान आभाळ दाटून आले होते व मेघराजानी जलधारांचा हलका शिडकाव करण्यास सुरवात केली होती.
पालखीच्या मार्गात यंदा बदल झाल्याने ग्रामस्थ मोठ्या संख्येने पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित होते. पहाटे नित्यपूजे नंतर तीर्थक्षेत्र आळंदीहून वारकरी दिंडेकरी आणि भाविकांसह पालखी सोहळा तीर्थक्षेत्र देहूकडे मार्गस्थ झाला. पालखी मार्गावरील डुडुळगाव, मोशी ,कुदळवाडी, टाळगाव चिखली, तळवडे, विठ्ठलनगर येथील ग्रामस्थांनी पादुकांचे दर्शन घेतले.
देहूच्या विठ्ठलनगर येथील श्री संत तुकाराम महाराज पादुका स्थान मंदिर येथे आल्यानंतर ट्रस्टच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. तेथे अभंग आरती घेण्यात आली. वाटेत उपस्थित ग्रामस्थांकडून पालखीचे मोठया उत्साहाने भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. महिलांची मोठी गर्दी होती. सुवासिनींनी वारी पूर्ण केलेल्या वारकऱ्यासंह पालखी रथाच्या बैलजोडीला औक्षण केले. रामचंद्र तुपे कुटूबियांकडून मुख्य प्रवेशद्वाराजवळ भक्तीभावाने दही भाताचे नैवद्य दाखविण्यात आला.
संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे यांसह संस्थानचे माजी अध्यक्ष,विश्वस्त, महाराजांचे वंशज, भाविक, ग्रामस्थ यावेळी उपस्थीत होते.
छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात पालखी रथ आल्यानंतर रथातून पालखी खांदेकऱ्यानी खांदयावर घेतले. चौकातील हनुमान मंदीरा समोर अभंग झाले. पालखी मार्गाने सोहळा मुख्य मंदिराकडे निघाली. पालखीचे महाराजांच्या जन्मस्थाना समोर आरती झाली. पालखी सोहळा मुख्य मंदिरात आल्यावर चांदीची अब्दागिरी, गरूड टक्के, सावलीते रेशमी छत्र, पालखी खांद्यावर घेऊन देऊळवाड्यात प्रदक्षिणा करण्यात आली.
प्रदक्षिणानंतर पालखी मंदिरातील भजनी मंडपात आल्यावर श्री विठ्ठल-रुख्मीणीच्या मंदिरात आरती झाली. आरती नंतर उपस्थित वारकऱ्यांनी '' पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम '' नामाचा जयघोष करीत पताका उंचवून तुतारी, शंख, नगारा व ताशाच्या गजर नाद केला. यावेळी मंदिराच्या परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
भजनी मंडपात पालखीचे सेवेकरी, मानकऱ्यांसह सर्व दिंडीचालकांना संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. पालखी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी सोहळ्यातील सहभागी झालेल्यांचे संस्थानच्या वतीने आभार मानण्यात आले.पालखी सोहळयाचे आनंदाच्या व भक्तीमय वातावरणात सांगता झाली. यंदा गतवर्षी पेक्षा पालखीच्या परतीच्या प्रवासात आळंदी ते देहूगाव दरम्याने भाविकांची व वारकऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.
तारीख : 21-07-2025श्रेणी :महाराष्ट्र
देहूगाव (Dehugaon) : श्री क्षेत्र देहूगावातील जलउपसा केंद्रावर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण गावात पाणीपुरवठा ठप्प आहे. परिणामी, स्थानिक रहिवाशांसह वारकऱ्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, नागरिकांना टँकरद्वारे पाणी खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ₹९०० ते १००० पर्यंत खर्च करावा लागत आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या परतीच्या दिवशीच पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने अनेक वारकऱ्यांनाही पिण्याच्या पाण्याचा अभाव भासला. यामुळे देहू नगरपंचायतीच्या नियोजनशून्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन मोटारी जळाल्यामुळे ठप्प जलउपसा
बोडकेवाडी येथील जलउपसा केंद्रावर १२० HP क्षमतेच्या दोन मोटारींचा वापर करून देहू शहराला पाणी पुरवले जाते. मात्र, शुक्रवारी रात्री एक मोटार जळाली आणि काही वेळातच दुसरी मोटारही बंद पडली. त्यामुळे संपूर्ण पाणीउपसा यंत्रणा ठप्प झाली.
या मोटारी दुरुस्त करण्यासाठी नगरपंचायतीकडून खासगी ठेकेदाराला लाखो रुपयांचे काम देण्यात आले असले, तरी तीव्र असंतोष आहे की, इतक्या मोठ्या खर्चानंतरही वेळेत मोटारी दुरुस्त करून मिळत नाहीत.
सुट्टीच्या काळात प्रशासन ठप्प – नागरिक त्रस्त
शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांमुळे नगरपंचायतीचा पाणीपुरवठा विभाग पूर्णपणे ठप्प झाला होता. या काळात “आंधळ दळतंय आणि कुत्र पिठ खातंय” अशी टीका ग्रामस्थांनी केली आहे. सोमवारीही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने पलखी परतीच्या दिवशी देखील भाविकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागला.
तारीख : 21-07-2025श्रेणी :महाराष्ट्र
पवनानगर (Pawananagar) : मावळ तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पत्रकारांना एकसंध नेतृत्व आणि प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र रह्या संलग्न पवन मावळ मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. पवनानगर येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा झाली असून, रवी ठाकर यांची अध्यक्षपदी, अभिषेक बोडके यांची उपाध्यक्षपदी, तर विकास वाजे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
संघटनेचा उद्देश आणि पार्श्वभूमी
मावळ तालुक्यात पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या अनेकांनी दीर्घकाळापासून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली होती. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाशी संलग्न मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या अंतर्गत, पवन मावळ परिसरातील पत्रकारांसाठी स्वतंत्र आणि सक्रिय संघटनेची गरज होती. या पार्श्वभूमीवर पवन मावळ मराठी पत्रकार संघाची निर्मिती झाली आहे.
ही संघटना पत्रकारांच्या हक्कांचं संरक्षण, व्यावसायिक पातळीवर मार्गदर्शन, व प्रशिक्षण यासाठी काम करणार आहे. ग्रामीण पत्रकारांना संस्थात्मक पाठबळ मिळवून देणे आणि त्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे शासनपातळीवर पोहोचवणे, हा मुख्य हेतू आहे.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -
• रवी ठाकर – अध्यक्ष
• विकास वाजे – कार्याध्यक्ष
• अभिषेक बोडके – उपाध्यक्ष
• राहुल सोनवणे – सचिव
• बाबुराव काळे – प्रसिद्धी प्रमुख
• उत्तम ठाकर – खजिनदार
• प्राची केदारी – प्रकल्प प्रमुख
• ज्ञानेश्वर ठाकर – सल्लागार
इतर कार्यकारिणी सदस्य:
भारत काळे, सचिन शिंदे, बद्रीनारायण पाटील, विशाल कुंभार, रेखा भेगडे, योगेश घोडके, सुभाष भोते, नामदेव घरदाळे, प्रफुल्ल ओव्हाळ, संतोष थिटे, रमेश फडतरे, निलेश ठाकर.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली, ज्यामध्ये मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भारत काळे यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. यानंतर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर ठाकर यांनी संघटनेच्या स्थापनेमागचा इतिहास, उद्देश आणि भविष्यातील दृष्टीकोन स्पष्ट केला.
कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये मावळ तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुदेश गिरमे, ज्येष्ठ पत्रकार व सल्लागार सोनबा गोपाळे गुरुजी, बबनराव भसे, सचिव रामदास वाडेकर, तळेगाव पत्रकार संघाच्या अध्यक्षा रेश्मा फडतरे, कामशेत पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन वाघमारे यांचा विशेष सहभाग होता.
मार्गदर्शकांचे विचार
प्रमुख मार्गदर्शकांनी संघटनेच्या कामकाजात पारदर्शकता, एकता, आणि व्यावसायिक पद्धती यांचा आग्रह धरला. बबनराव भसे सरांनी संघटनेने आपले स्वतंत्र अस्तित्व राखून मावळ तालुका पत्रकार संघाशी सहकार्याने काम करावे, असे स्पष्ट मत मांडले.
सोनबा गोपाळे गुरुजींनी पत्रकार भवनाच्या संकल्पनेबद्दल माहिती दिली व तालुक्यात स्थायी स्वरूपातील कार्यालय लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा केली.
पुढील दिशा आणि कार्ययोजना
संघटनेचा उद्देश केवळ प्रतिष्ठेच्या निवडीपुरता मर्यादित नसून, पत्रकारांच्या हक्क, प्रशिक्षण, आणि सामाजिक जबाबदाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश यामध्ये असेल.
रवी ठाकर यांनी अध्यक्षपद स्वीकारताना सांगितले की, “सर्व पत्रकार बांधवांना सोबत घेऊन संघटनेचा विकास करणार असून, निष्पक्ष व निडर पत्रकारितेसाठी आम्ही सदैव सज्ज आहोत.”