तारीख : 07-10-2024श्रेणी :महाराष्ट्र
तारीख : 06-05-2025श्रेणी :महाराष्ट्र
पुणे (Pune) : जिल्ह्यात अतिक्रमित व बंद असलेले पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्यासाठी जानेवारी २०२५ पासून मोहीम हाती घेण्यात असून माहे एप्रिल २०२५ अखेर एकूण ७०४ कि.मी. लांबीचे ५३८ रस्ते वापरास खुले करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्ह्यातील गाव नकाशेप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले पाणंद, शिव रस्ते खुले करुन घेण्याकरीता नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे ३१ मे पर्यंत अर्ज करावे, अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २५ एप्रिल रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणंद, शिव रस्ते लवकरात लवकर अतिक्रमण मुक्त व बंद असल्यास ते वापरास खुले करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यानुसार पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. तहसिलदारांकडे यापूर्वी रस्ते खुले करण्याबाबत प्राप्त अर्जानुसार रस्ते खुले करण्याची कार्यवाही करावी.
भुमीअभिलेख विभागाकडून ग्राम महसूल अधिकारी यांनी ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग याबाबत गाव नकाशे ८ मे अखेर प्राप्त करून घ्यावेत. ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या गाव नकाशात दर्शविल्याप्रमाणे गाडी मार्ग, पायमार्गाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अतिक्रमित व बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करुन त्याप्रमाणे संबंधित भोगवटाधारकांची यादी ९ ते १५ मे या कालावधीत तयार करावी. संबंधित भोगवटाधारक, सहधारक व सरपंच यांची एकत्रित बैठक घेऊन रस्ता खुला करण्याबाबत १३ ते २३ मे या कालावधीत प्रयत्न करावे.
या पद्धतीने कार्यवाही करुनही रस्ता खुला झाला नसल्यास तहसिलदारांनी प्राधान्यक्रमाने रस्ता खुला करण्याबाबतची यादी दिनांक २२ ते ३० मे या कालवधीत तयार करावी. या यादीनुसार भुमीअभिलेख विभागामार्फत महिन्याच्या प्रत्येक बुधवारी प्राधान्यक्रमाने मोजणी करुन घ्यावी. शेवटी रस्ता खुला करण्याबाबत भुमीअभिलेख व पोलीस विभागाच्यामदतीने रस्ता खुला करावा.
तहसीलदारांकडून प्राप्त होणाऱ्या यादीप्रमाणे रस्त्यांची मोजणी ही संबंधित उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी मोफत करावी. याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पुणे यांना सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते खुले करतांना कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलीस बंदोबस्त आवश्यक पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षकामार्फत मोफत पोलीस बंदोबस्त पुरवावा. रस्ते वापरास खुले केल्यानंतर त्यांच्या मजबुतीकरणासाठी गटविकास अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना डुडी यांनी दिल्या आहेत.
तारीख : 28-04-2025श्रेणी :महाराष्ट्र
पवनानगर (Pawnanagar) : काश्मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बैसरन घाटी परिसरात मंगळवारी (दि. २८) रोजी दहशतवाद्यांनी हिंदू धर्मीय पुरुषांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात २६ निष्पाप भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या अमानुष घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पवनानगर (ता. मावळ) येथील बाजारपेठेमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने एकत्र येत जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक संदेश भेगडे, सुनिल महाराज वरघडे, रमेश आडकर, गणेश सावंत, चंद्रकांत येवले, किशोर शिर्के, खंडू वाघमारे, उद्योजक प्रशांत ठाकर, सुनिल बेनगुडे, अजिंक्य कालेकर तसेच पवन मावळ परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी शहीद पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी "दहशतवाद्यांचा निषेध असो", "भारत माता की जय", "काश्मीर हमारा है" अशा घोषणा देत वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले होते. तसेच हिंदू एकजुटीच्याही घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी उपस्थितांनी केंद्र सरकारने कठोर कारवाई करून काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करावी अशी मागणी केली. तसेच दहशतवाद्यांविरुद्ध निर्णायक पाऊले उचलण्यात यावीत, अशी जोरदार मागणीही करण्यात आली.
तारीख : 13-04-2025श्रेणी :महाराष्ट्र
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे येथील रविवारच्या आठवडे बाजारात विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विजांच्या कडकडाटासह अवकाळी बरसू लागल्याने विविध भागातून शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अवकाळीने भाज्या भिजल्यामुळे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचा मात्र नाहक बळी गेल्याचे दिसून आले.
मावळ तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या तळेगाव दाभाडे शहराचा आठवडे बाजार दर रविवारी भरतो. या आठवडे बाजारामध्ये लगतच्या पंचकृषीतील नागरिक, तसेच औद्योगिक वसाहतीतील कामगार वर्ग, मजूर व हातावर पोट भरणारे अनेकजण ताजी भाजी, फळे, तसेच जीवनावश्यक वस्तू या आठवडे बाजारात सवलतीच्या दरात मिळत असल्याने येथे नेहमीच गर्दी करत असतात.
सकाळपासून आकाश निरभ्र होते, मात्र दुपारनंतर ढग दाटून यायला सुरुवात झाली. तशी विक्रेते व खरेदीदारांची धांदल उडाली. आज अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आठवडे बाजारातील तात्पुरत्या स्वरूपात उभी केलेली सर्व दुकाने भक्षस्थानी गेली. रस्त्यावर ठेवलेला भाजीपाला हा धो- धो वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात भिजून खराब झाला. तसेच विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या या पावसामुळे आठवडे बाजाराकडे नागरिकांनी पूर्ण पाठ फिरवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला.
मागील दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून सुभाष मार्किट येथे होऊ घातलेल्या भाजी मंडईचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्यामुळे शेतकऱ्यांना भाजी विक्रीसाठी रस्त्यावरच बसावे लागते. परंतु जर हे काम वेळेत पूर्ण झाले असते तर आज लाखो रुपयांचा माल वाया गेला नसता.
दरम्यान, मागील आठवड्यातच नगरपरिषद, पोलिस प्रशासन आणि व्यापारी यांनी यासंदर्भात संयुक्त बैठक घेऊन आठवडे बाजार स्थलांतरित करण्याचे व वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठीचे पर्याय अवलंबण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी आगामी दीड महिन्यातच मान्सूनला सुरुवात होत असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असून आज झालेल्या नुकसानीतून प्रशासन काय शिकणार? हे पाहणे महत्वाचे ठरत आहे.
तारीख : 10-04-2025श्रेणी :महाराष्ट्र
प्रजावार्ता : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. कधी अवकाळीचा मारा (unseasonal weather) तर कधी उष्णतेचा पारा (Heat) चढताना दिसत आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (१० एप्रिल) रोजी देशाच्या विविध राज्यांमध्ये हवामानाची वेगवेगळी स्थिती पाहायला मिळेल.
राज्यात दक्षिणेकडे भागात कमी दाबाचा पट्टा आणि तीव्र वाऱ्याचे क्षेत्र तयार होत असतानाच राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट (Heat) अधिक तीव्र होताना दिसेल. येत्या २४ तासांमध्ये दक्षिण भारतामध्ये पावसाचा इशारा जारी केला असून, मध्य आणि उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढताना (Heat) दिसेल. महाराष्ट्रात उष्णतेमुळे होणारी नागरिकांनी होरपळ अद्याप थांबलेली नाही.
विदर्भात सूर्य नारायाणाचा पारा सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे नजीकच्या भागांमध्येही उष्णतेच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे करण्यात आली असून, येथे तापमानाचा पारा ४४.१ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आला आहे. राज्यात एकिकडे उष्णता रौद्र रूप धारण करत असतानाच दुसरीकडे मात्र बाष्पीभवन प्रक्रियेला वेग येत आहे. त्यामुळे वादळी पावसाला आवश्यक अशी वातावरणनिर्मिती तयार होताना दिसत आहे. त्यामुळे विदर्भात येत्या २४ तासांसाठी अवकाळी पावसाचा (unseasonal rain) अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
मळणी केलेल्या रब्बी ज्वारी व गहू पिकाच्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या हळद पिकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.
तारीख : 16-03-2025श्रेणी :महाराष्ट्र
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : विसापूर गडाच्या पायथ्याशी, मालेवाडीशेजारी झाडाझुडपात विखूरलेल्या बजरंगबलीच्या प्राचीन मंदिराला "सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान" कडून पुनर्जीवन मिळून अखेर नूतन मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला.
शुक्रवारी (ता. ७) रोजी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. शनिवारी (ता. ८) रोजी मशाल महोत्सव, शिवपूजा जलाभिषेक, सामुदायिक हरिजागर, रविवारी (ता. ९) रोजी सत्यनारायण महापूजा होऊन पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर येथील स्थानिक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि बजरंग बलीच्या मूर्तीची नेहमी पूजा करणारे बबन बैकर यांच्या हस्ते मंदिराचे उदघाट्न करण्यात आले.
त्यानंतर हरिजागार होऊन इतिहास संशोधक प्रमोद बोऱ्हाडे यांनी विसापूर म्हणजेच संबळगडाच्या इतिहासाची तंतोतंत माहिती अतिशय उत्तमप्रकारे दिली. उपस्थित असंख्य नागरिक विसापूर गडाचा इतिहास ऐकण्यात हरवून गेले होते. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. शेवटी भोजनाची व्यवस्था असल्याने कार्यक्रमाला उपस्थिती दाखवलेल्या नागरिकांना एकप्रकारे वनभोजनाचा आनंद घेता आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील शेळके उपस्थित होते. त्याबरोबरच सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिन शेडगे, इतिहास अभ्यासक प्रमोद बोऱ्हाडे, वन्यजीव रक्षक निलेश गराडे, अनिल आंद्रे, रामनिवास गुप्ता, विनायकराव जाधव, अनिल काकडे, अमोल थोरवे, किरण हुलावळे, राम केदारी, अनिल साबळे, सोमनाथ शिंदे, विश्वनाथ पुट्टूल, ललित धुमाळ उपस्थित होते.
यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले, "विसापूर किल्ल्याच्या संवर्धनासाठी तसेच मावळातील इतर प्रत्येक किल्ल्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध आहे. मंदिराच्या आवारात सोलर दिवे व मंदिरासमोर दीपमाळ लावून देण्यात येईल. अतिशय खडतर परिस्थितीत व दोन वर्षांच्या अविरत मेहनतीने संबळगडाच्या पायथ्याला बजरंग बलीचे मंदीर साकाराल्याने त्यांनी 'सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान'च्या मावळ्यांचे कौतुक केले. पुढे दुर्गसंवर्धनाच्या कार्यात मी निधी उपलब्ध करुन देणार आहोत आणि सर्वोत्तम काम करुन घ्यायची जबाबदारी तुमची असेल असेल" असे त्यांनी मत व्यक्त केले.
नूतन मंदिराला फुलांचा साज
पूर्वी एक बजरंग बलीची मूर्ती व आजूबाजूला प्राचीन मंदिराचा झाडाझुडपातील भग्नावस्थेतील चौथरा अशी स्थिती त्याठिकाणी होती. "सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान" ने दोन वर्षे केलेल्या मेहनतीमुळे अखेर मंदिराचे रूप पालटले आहे. दगडांचे बांधकाम त्यात मंदिराला विशिष्ट प्रकारचा रंग देण्यात आला आहे. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी मंदिर सजविण्यात आले होते. मंदिरासमोर बजरंगबलीची सुंदर प्रकारची रांगोळी भाविकांचे तसेच उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यामुळे विसापूर गडाच्या भोवतीच्या गर्द झाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले होते.
The ancient Bajrang Bali temple, which was scattered in the forest at the foot of Visapur Fort, has been revived