तारीख : 30-06-2025श्रेणी :राजकारण
तारीख : 01-07-2025श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव भेगडे हे मावळ तालुक्यातलं, पुणे जिल्ह्यातलं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं होतं. त्यांच्या निधनानं शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेलं, मावळच्या, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं आहे, अशा भावनिक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला.
दोनच आठवड्यापूर्वी १७ जून रोजी पवना हॉस्पिटलमध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांना बोलताना त्रास होत होता, परंतु ते बोटांच्या खुणांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. ती आमची शेवटची भेट ठरेल, असं कधीच वाटलं नाही. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला.
भेगडे यांच्या आठवणींना उजाळा देत पवार म्हणाले, कृष्णराव भेगडे साहेब सुरुवातीच्या काळात मावळचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर मावळचे नगराध्यक्ष झाले. १९७२ ला जनसंघाच्या तिकिटावर पहिल्यांदा मावळचे आमदार झाले. १९७७ ला काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर १९७८ ला पून्हा आमदार झाले. विधान परिषदेवरही दोन टर्म निवडून गेले.
नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, इंद्रायणी विद्या मंदिरसारख्या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्याचं काम त्यांनी केलं. पुण्याच्या औद्योगिक, आर्थिक विकासात महत्वाचं योगदान देणाऱ्या तळेगाव एमआयडीसीच्या उभारणीत त्यांचं महत्वाचं योगदान होतं. मावळभूषण, शिक्षणमहर्षींसारख्या अनेक पदव्या, पुरस्कारांनी सन्मानित कृष्णराव भेगडे यांचं संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी समर्पित होतं. त्यांचं निधन ही मावळ तालुक्याची, पुणे जिल्ह्याची, महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या चळवळीची मोठी हानी आहे.
तारीख : 25-06-2025श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : तळेगाव दाभाडे येथे भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर व इंदोरी गण मंडलाच्या वतीने आयोजित "संकल्प से सिद्धी तक" या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी देशाचा विकास, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर आधारित असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यशस्वीपणे ११ वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे, याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन केले.
या काळात सरकारने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आणि गोरगरीब, वंचित, शेतकरी, महिला अशा प्रत्येक घटकाच्या दारी या योजनांचा लाभ पोहोचवण्याचे कार्य सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने हाती घ्यावे, हा संकल्प यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, रविंद्र नाना दाभाडे, तळेगाव दाभाडे शहर भाजपा अध्यक्ष चिराग खांडगे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक संदीप काशिद यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तारीख : 23-06-2025श्रेणी :राजकारण
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : “मी आमदार आहे, कारण तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात. आज निर्णय घ्यायचे असतील, तर तोही तुमच्या सल्ल्यानेच घ्यायचा,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आमदार सुनील शेळके यांनी पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका मांडली.
वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष संघटनेच्या सुदृढ बांधणीसाठी नवे संकेत दिले गेले. आमदार सुनील शेळके यांच्या सडेतोड भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. पक्षातील निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, २० सदस्यीय समितीचा निर्णायक हस्तक्षेप, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन यामुळे हा मेळावा यशस्वी ठरला.
मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेश आप्पा ढोरे, सुरेश चौधरी, विठ्ठल आण्णा शिंदे, महादू कालेकर, काळूराम मालपोटे, दीपक हुलावळे, कृष्णा कारके, नारायण पाळेकर, तुकाराम आसवले, भरत येवले, सुहास गरुड, लक्ष्मण बालगुडे, नामदेव ठुले, प्रवीण झेंडे, विलास बडेकर, सुरेश धोत्रे, अशोक भेगडे, दर्शन खांडगे, साहेबराव कारके, संदीप आंद्रे, भरत भोते, जीवन गायकवाड, किशोर सातकर, रुपेश घोजगे, मारुती देशमुख, पंढरीनाथ ढोरे, बाबूलाल नालबंद, प्रकाश हगवणे, कांतीलाल काळोखे, भरत लिम्हण, सुवर्णताई राऊत शोभाताई कदम, पूजाताई दिवटे, कल्याणीताई काजळे,शबनम खान, तेजस्विनी गरुड, सुनीता कुडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनात्मक आढावा व नियोजन
या बैठकीत आतापर्यंतच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मैदानी पातळीवर कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर ठोस उपाय सुचविण्यात आले. संघटनात्मक बळकटी, कार्यपद्धतीतील सुधारणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे नियोजन या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणासाठी एकजुटीने अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शेळके यांचे ठाम विधान – “नेतृत्व नव्हे, निर्णय आता कार्यकर्त्यांचे”
आमदार शेळके यांनी पक्षातील महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेसाठी २० जणांची समिती नियुक्त केली असून, "या समितीचा निर्णय मला देखील बंधनकारक असेल," अशी ऐतिहासिक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केले की गाव अध्यक्ष, उमेदवार निवड, निधी मंजुरी यासारख्या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांचा आवाज निर्णायक असेल.
भाजपवर टीका करत ते म्हणाले, “पूर्वी म्हणायचे – तुम लढो, हम कपडे संभालेंगे, आता म्हणतात – तुम लढो, हम कॉन्ट्रॅक्ट संभालेंगे… ही भूमिका आता सहन केली जाणार नाही.” त्यांनी भाजपमधील आपल्या ३० वर्षांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत, “भारतीय जनता पक्षात सामान्य कार्यकर्ता संपला आहे, पण राष्ट्रवादीत तो केंद्रस्थानी आहे,” अशी ठाम मांडणी केली.
नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व संघटनात्मक विस्तार
या मेळाव्यात खालील पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली –
सुवर्णा राऊत – महिला अध्यक्ष, मावळ तालुका
वर्षा नवघणे – ग्रामीण महिला अध्यक्ष
सुरेश धोत्रे – तळेगाव शहर अध्यक्ष
सुशांत बालगुडे – विद्यार्थी आघाडी अध्यक्ष
रवी पवार – सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष
कुणाल आगळे – सामाजिक न्याय विभाग, तळेगाव शहर
निलेश टाक – सामाजिक न्याय विभाग, देहूरोड शहर
हरिश्चंद्र बगाड – आदिवासी सेल अध्यक्ष, मावळ तालुका
संघर्षाला न्याय, संघटनेला बळ
शेवटी आमदार शेळके म्हणाले, “माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही माझ्यासोबत होतात, आता मी तुमच्या मागे उभा आहे. कोणाला सरपंच करायचं, कोणाला नगरसेवक करायचं, हे सर्व निर्णय आता कार्यकर्त्यांच्या हाती आहेत. संघर्ष कमी करा, पण न्याय सर्वांना मिळालाच पाहिजे.”
या मेळाव्याने मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीचे व राजकीय एकजुटीचे दर्शन घडवले.
तारीख : 18-06-2025श्रेणी :राजकारण
पुणे (Pune) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले.
यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.
दर्शनानंतर संस्थानच्यावतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, 'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
तारीख : 18-06-2025श्रेणी :राजकारण
पुणे (Pune) : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे साकव पूल पडून झालेल्या दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन घेतली. या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर तातडीने सुरुवात करून लवकरात लवकर उभारणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकारी तसेच स्थानिकांकडून घटनेबाबत तसेच बचाव कार्याबाबत माहिती घेतली. तातडीने धाव घेऊन बचावकार्य केलेल्या स्थानिक नागरिकांना त्यांनी शाबासकी दिली.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना पवार म्हणाले, मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बचाव कार्यासाठी अत्याधुनिक वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल.
घटनेची चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आदींसह निवासी उपजिल्हाधिकारी यांची समिती नेमली आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
अपघातग्रस्त पुलाचा उर्वरित सर्व भाग पाडण्यात येणार आहे. याशिवाय आयुष्य संपलेले तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर्स यांनी वापरण्यास धोकादायक असा शेरा दिलेले इतरही सर्व धोकादायक पूल पाडण्यात येतील, असेही पवार म्हणाले.
नवीन पूल दर्शक गॅलरीसह बांधण्यात येणार
या ठिकाणी साडेसात मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार असून त्याच्या दोन्ही बाजूला ८ फुटाचे दोन पदपथ करण्यात येणार आहे. तसेच हे पर्यटन स्थळ असल्याने दोन दर्शक गॅलरी (व्यूविंग गॅलरी) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पावसानंतर तातडीने पुलाच्या कामाला सुरुवात करावी, असे निर्देश यावेळी संबंधित बांधकाम कंत्राटदाराला दिले.
उपमुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयात जखमींची विचारपूस
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवना रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतील जखमी रुग्णांची भेट घेतली. तसेच जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार होतील याची काळजी घ्यावी असे डॉक्टरांना निर्देश दिले. या कामात समन्वयाची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर राहील, असेही ते म्हणाले.