तारीख : 26-07-2024श्रेणी :महाराष्ट्र
तारीख : 14-05-2025श्रेणी :महाराष्ट्र
पवनानगर (Pawnanagar) : येथील पवना विद्या मंदिर विद्यालयाच्या दहावीच्या निकालात पुन्हा मुलींनीच बाजी मारली असून शाळेची विद्यार्थिनी कु. पूर्वा शशिकांत घरदाळे ९२.२० टक्के गुण मिळवून पवना केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला.
मंगळवारी (दि. १३ मे) रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये पवनानगर केंद्रावर वेगवेगळ्या शाळांतून प्रथम येण्याचा मान मुलींनीच मिळविला. तर पवना विद्या मंदिर शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. पवना शाळा ही परिसरातील ४० गावे व वाड्यावस्त्यांसाठीची मुख्य केंद्र शाळा म्हणून परिचित आहे. या शाळेत बालवाडी पासून ते उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे या शाळेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.
निकाल व टक्केवारी पुढीलप्रमाणे
१) कु. घरदाळे पूर्वा शशिकांत - ९२.२० टक्के
२) कु. डोंगरे पायल जितेंद्र - ९०.२० टक्के
३) कु. सावंत वेदांतिका विवेक - ९० टक्के
परिसरातून यशस्वी विद्यार्थी, पालक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्याध्यापक भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, शहाजी लाखे, वर्गशिक्षिका सुमन जाधव, वैशाली वराडे तसेच सर्व शिक्षकांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, सचिव संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के तसेच संस्थेचे सर्व संचालकांनी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. तसेच परिसरातून सर्वांचे अभिनंदन होत आहे.
तारीख : 13-05-2025श्रेणी :महाराष्ट्र
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तसेच मावळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने मोरया स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून वडगाव शहरात घेण्यात आलेल्या ४५ किलो वजनी कबड्डी स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग घेतला होता. या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके आणि मोरया प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या शुभहस्ते झाला.
याप्रसंगी मावळ असोसिएशनचे उपाध्यक्ष मा. नगराध्यक्ष मयुर ढोरे तसेच असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक यांनी उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ नेते मंगेश ढोरे, माजी सरपंच अर्चना भोकरे, श्रीधर ढोरे, अरुण निकम, नंदकुमार भसे, अबोली ढोरे, कातवी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुवर्णा चव्हाण, नगरसेविका पूनम जाधव, वैभव पिंपळे तसेच छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळ, मोरया महिला प्रतिष्ठान संचालिका, स्थानिक नागरिक आणि प्रशिक्षक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत वडगाव घेणंद येथील भैरवनाथ कबड्डी संघाने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांक आमदार महेश दादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी, तृतीय क्रमांक आमदार सुनील आण्णा शेळके कब्बडी संघ वडगाव, चतुर्थ क्रमांक डॉ. पतंगराव कदम कब्बडी संघ पुणे हे संघ विजयी झाले. विजयी झालेल्या संघांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
मोरया महिला प्रतिष्ठानचे अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. कबड्डी हा एक पारंपरिक आणि लोकप्रिय खेळ आहे आणि मुलींमध्ये या खेळाची आवड वाढत आहे. शरीर सुदृढ व निरोगी राहण्यास तसेच निर्णय क्षमतेत वाढ होते.
कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतील खेळ असल्याने सर्व शाळांमधून हा खेळ खेळला जातो. कबड्डीला एक प्रकारचं झळाळतं रूप व प्रसिद्धीचं वलय लाभल्यामुळे देशी खेळांना पुन्हा सुगीचे दिवस येतील आणि कबड्डीला व कबड्डी खेळाडूंना चांगले सादरीकरण करता येतील. यासाठी पुढील कालावधीत आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून वडगावमध्ये भव्य क्रीडांगण करण्यासाठी प्रयत्न करून मँट वरील भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानस अबोली ढोरे यांनी व्यक्त केला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक अमोल गुडेकर आणि छत्रपती संभाजी नगर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रमोद जंगम यांनी सूत्रसंचालन तर यशवंत शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.
तारीख : 12-05-2025श्रेणी :महाराष्ट्र
टाकवे बुद्रुक (Takwe Budruk) : आंदर मावळ येथील कल्हाट येथे यंदा मोठ्या जल्लोषात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यंदा कल्हाट गावात प्रथमच थायलंड या देशातून आणलेल्या गौतम बुद्धांच्या मुर्तीची बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्रतिष्ठापना करण्यात येत आहे.
जयंती निमित्ताने पहिल्या दिवशी सोमवार (दि. १२) रोजी सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत तथागत भगवान गौतम बुध्दांच्या मुर्तीची भव्य मिरवणूक, नऊ ते दहा वाजेपर्यंत पंचशील ध्वजारोहण व महापुरुषांना पुष्पहार अर्पण, दहा ते बारा वाजेपर्यंत बुद्धवंदना सुत्तपठन (भंते अनिरुध्य) परशांती बुध्दविहार मळवली, दुपारी बारा ते तीन -लहान मुला-मुलींसाठी वकृत्व स्पर्धा, चार ते पाच नुतन बुध्दविहाराचे अनावरन, पाच ते सहा व्याख्यान (आयुधाकानी अभंग गुरुजी), आठ ते नऊ जाहीर सभा, नऊ ते दहा स्नेह भोजन, दहानंतर भिमबुद्ध गीतांचा व प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तर दुसऱ्या दिवशी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत लहान मुला-मुलीसाठी वकृत्य स्पर्धा, सायंकाळी पाच ते आठ तथागत गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक, रात्री नऊ ते दहा स्नेह भोजन, रात्री दहानंतर भिमबुद्ध गीतांचा व मनोरंनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या जयंतीचे आयोजन जागृती मित्र मंडळ व रमाई महिला मंडळ जागृतीनगर कल्हाट (ता. मावळ) यांच्या वतीने करण्यात आले असून पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
तारीख : 06-05-2025श्रेणी :महाराष्ट्र
पुणे (Pune) : जिल्ह्यात अतिक्रमित व बंद असलेले पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्यासाठी जानेवारी २०२५ पासून मोहीम हाती घेण्यात असून माहे एप्रिल २०२५ अखेर एकूण ७०४ कि.मी. लांबीचे ५३८ रस्ते वापरास खुले करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्ह्यातील गाव नकाशेप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले पाणंद, शिव रस्ते खुले करुन घेण्याकरीता नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे ३१ मे पर्यंत अर्ज करावे, अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २५ एप्रिल रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणंद, शिव रस्ते लवकरात लवकर अतिक्रमण मुक्त व बंद असल्यास ते वापरास खुले करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यानुसार पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. तहसिलदारांकडे यापूर्वी रस्ते खुले करण्याबाबत प्राप्त अर्जानुसार रस्ते खुले करण्याची कार्यवाही करावी.
भुमीअभिलेख विभागाकडून ग्राम महसूल अधिकारी यांनी ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग याबाबत गाव नकाशे ८ मे अखेर प्राप्त करून घ्यावेत. ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या गाव नकाशात दर्शविल्याप्रमाणे गाडी मार्ग, पायमार्गाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अतिक्रमित व बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करुन त्याप्रमाणे संबंधित भोगवटाधारकांची यादी ९ ते १५ मे या कालावधीत तयार करावी. संबंधित भोगवटाधारक, सहधारक व सरपंच यांची एकत्रित बैठक घेऊन रस्ता खुला करण्याबाबत १३ ते २३ मे या कालावधीत प्रयत्न करावे.
या पद्धतीने कार्यवाही करुनही रस्ता खुला झाला नसल्यास तहसिलदारांनी प्राधान्यक्रमाने रस्ता खुला करण्याबाबतची यादी दिनांक २२ ते ३० मे या कालवधीत तयार करावी. या यादीनुसार भुमीअभिलेख विभागामार्फत महिन्याच्या प्रत्येक बुधवारी प्राधान्यक्रमाने मोजणी करुन घ्यावी. शेवटी रस्ता खुला करण्याबाबत भुमीअभिलेख व पोलीस विभागाच्यामदतीने रस्ता खुला करावा.
तहसीलदारांकडून प्राप्त होणाऱ्या यादीप्रमाणे रस्त्यांची मोजणी ही संबंधित उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी मोफत करावी. याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पुणे यांना सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते खुले करतांना कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलीस बंदोबस्त आवश्यक पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षकामार्फत मोफत पोलीस बंदोबस्त पुरवावा. रस्ते वापरास खुले केल्यानंतर त्यांच्या मजबुतीकरणासाठी गटविकास अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना डुडी यांनी दिल्या आहेत.
तारीख : 28-04-2025श्रेणी :महाराष्ट्र
पवनानगर (Pawnanagar) : काश्मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बैसरन घाटी परिसरात मंगळवारी (दि. २८) रोजी दहशतवाद्यांनी हिंदू धर्मीय पुरुषांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात २६ निष्पाप भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या अमानुष घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पवनानगर (ता. मावळ) येथील बाजारपेठेमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने एकत्र येत जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक संदेश भेगडे, सुनिल महाराज वरघडे, रमेश आडकर, गणेश सावंत, चंद्रकांत येवले, किशोर शिर्के, खंडू वाघमारे, उद्योजक प्रशांत ठाकर, सुनिल बेनगुडे, अजिंक्य कालेकर तसेच पवन मावळ परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी शहीद पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी "दहशतवाद्यांचा निषेध असो", "भारत माता की जय", "काश्मीर हमारा है" अशा घोषणा देत वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले होते. तसेच हिंदू एकजुटीच्याही घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी उपस्थितांनी केंद्र सरकारने कठोर कारवाई करून काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करावी अशी मागणी केली. तसेच दहशतवाद्यांविरुद्ध निर्णायक पाऊले उचलण्यात यावीत, अशी जोरदार मागणीही करण्यात आली.