तारीख : 20-04-2025श्रेणी :राजकारण
तारीख : 22-04-2025श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात सोमवारी (दि. २१) रोजी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समस्यांच्या भडीमाराने तालुकास्तरीय लोकशाही दिन 'वादळी' झाला. गेल्या पाच-सात वर्षांपासून विवादात असलेले तळे उत्खनन, बेकायदेशीर सोमाटणे टोलनाका आणि न्यायप्रविष्ट प्रकरणांमधील कामांची ठेकेदारांना अदा केलेली ज्यादा बिले यासर्व महत्वपूर्ण विषयांना जागृत नागरिकांनी हात घातला असता जबाबदार अधिकाऱ्यांनी भर उन्हाळ्यात आश्वासनांचा पाऊस पाडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार विक्रम देशमुख होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. एच दराडे, उपमुख्याधिकारी कल्याणी लाडे, लोणावळा उपअभियंता अशोक काळे, अखिल भारत ग्राहक पंचायतीच्या नयना आभाळे, पोलीस उपनिरीक्षक डी. ए. वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. आर. वाळुंज, मंडल अधिकारी एल. व्ही. सलगर, जलसंधारण अधिकारी दीपक ढवळे, तलाठी के. व्ही. मोहमारे, विशाल रिटे आदी अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते, शासकीय योजनांचे लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
प्रशासकीय राजवटीतील कामांचा दर्जा आणि त्रुटींबाबत प्रश्न
यावेळी फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानचे सचिव जयंत कदम यांनी भामा आसखेड धरणातील पिण्याचा पाण्याची योजना केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला. तळेगावातील पिण्याच्या पाण्याची योजना, रस्ते, भुयारी गटर योजना, पथदिवे, सांडपाणी वाहिन्या तसेच नगर परिषदेच्या गेल्या तीन वर्षातील प्रशासकीय राजवटीतील विकास कामांमधील कामाचा दर्जा आणि त्रुटींबाबत प्रश्न उपस्थित केले.
न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्येही ठेकेदार धार्जिणी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
ईगल तळेविकास प्रकल्पात शासनाने नगर परिषदेस ठोठावलेल्या ७८ कोटी रुपयांच्या दंडाबाबत कदम यांनी प्रश्न विचारला. ही बाब न्यायप्रविष्ट असताना नगर परिषदेने याच काळात ठेकेदारांची बिले कोणाच्या सांगण्यावरून अदा केली, असा सवाल उपस्थित केला. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये लागेबांधे असून, बोगस बिल काढल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माने यांनी केली. आपल्या तक्रारींबाबत निवेदन देण्यात यावे, वरिष्ठांना याबाबत माहिती देण्यात येईल, सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिले.
३० किमीमध्ये चार टोलनाके
माजी नगरसेवक अरुण माने यांनी सोमाटणे येथील बेकायदेशीर टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी केली. सोमाटणे ते लोणावळा दरम्यान ३० किलोमीटर अंतरात चार टोलनाके असून, शासनाच्या जीआरनुसार दोन टोल नाक्यांमध्ये किमान ६० किमी अंतर असावे. शासनाच्या नियमांची अंमलबजावणी का केली जात नाही, असा सवाल माने यांनी उपस्थित केला.
३५ पैकी केवळ १७ अधिकारी हजर; जबाबदार अधिकाऱ्यांकडूनही तहसीलदारांच्या पत्राला 'दाद' नाही
दरम्यान, तालुक्यातील विविध शासकीय विभागातील ३५ अधिकाऱ्यांना तहसीलदार विक्रम देशमुख यांनी लेखी पत्राद्वारे कार्यक्रमाची माहिती दिली. मात्र केवळ १७ अधिकारीच कार्यक्रमाला हजर होते. त्यामुळे ३५ पैकी १८ अधिकाऱ्यांनी खुद्द तहसीलदार देशमुख यांच्या पत्रालाही दाद दिली नसल्याचे निदर्शनास येताच, नागरिकांनी नाराजी दर्शवली. तसेच अनुपस्थित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तारीख : 15-04-2025श्रेणी :राजकारण
कासारसाई (Kasarsai) : येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या (बुधवार, १६ एप्रिल) पार पडणार असून कारखाना सभागृहात यासाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.
या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम ठरवण्यात आला असून, दुपारी १ ते १.३० या वेळेत नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती, १.३० ते २ या वेळेत छाननी, २ वाजता वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध, त्यानंतर २ ते २.३० या वेळेत नामनिर्देशन पत्र माघार घेता येणार आहे. दुपारी २.३० वाजता अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर लगेचच २.३० ते ३ या वेळेत मतदान आणि ३ ते ३.३० दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर तत्काळ नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात येईल.
या निवडणुकीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेलने यापूर्वी सर्व जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावेळी नव्याने बहुतांश संचालक मंडळात सहभागी झाले असून, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्याच नेतृत्वाखाली संचालक मंडळाची निवडणूक लढवली गेल्यामुळे अध्यक्षपदी त्यांचीच फेरनिवड होणारे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. आतापर्यंत कारखान्याच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे बापूसाहेब भेगडे संचालक म्हणून पुन्हा निवडून आले आहेत. त्यांनाच पुन्हा संधी मिळणार की नवीन उपाध्यक्ष निवडला जाणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
कारखान्याच्या भविष्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, नवे नेतृत्व कोणाच्या हातात येते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तारीख : 11-04-2025श्रेणी :राजकारण
कामशेत (Kamshet) : मित्र पक्षाकडून कायमच रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरले जाते. सत्तेचा वाटा योग्य प्रमाणात दिला जात नाही. अशा परिस्थितीत आपली स्वबळावर लढण्याची तयारी असायला हवी, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे राष्ट्री अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. कामशेत (ता. मावळ) येथे रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, फक्त बौद्ध समाजाच नाही तर सर्व समाजातील लोकांशी सलोख्याचे संबंध असायला हवे. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करणे ही कायमच आपल्या पक्षाची भूमिका आहे. तसेच पक्ष बांधणीत आपली योग्य भूमिका बजावली पाहिजे.
महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातून बहुसंख्य कार्यकर्ते या अभ्यास शिबिराच्या निमित्ताने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी उद्योग, व्यवसाय, समाजकारण याचबरोबर पक्ष बांधणीत आपली भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. उद्योग आणि व्यवसाय चे मार्गदर्शन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (DICCI) चे पश्चिम भारत अध्यक्ष संतोष कांबळे यांनी केले. तर पक्ष बांधणीबाबत मार्गदर्शन विजय खरे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राजाभाऊ सरवते हे होते. यावेळी राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर, मातंग आघाडी अध्यक्ष आण्णा वायदंडे, युवक अध्यक्ष पप्पू कागदे, संघटक सचिव परशुराम वाडेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, ज्येष्ठ साहित्यिक शरण कुमार लिंबाळे, ज्येष्ठ विचारवंत अँड. दिलीप काकडे, मंदार भारदे, अरुण खोरे, गणेश गायकवाड, युवक अध्यक्ष समीर जाधव, मालन बनसोडे, अशोक सरवते, विक्रम शेलार, अंकुश सोनवणे, रूपेश गायकवाड, सिद्धार्थ चौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी तर आभार पाश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड व मावळ तालुका अध्यक्ष आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव यांनी मानले.
तारीख : 08-04-2025श्रेणी :राजकारण
पवनानगर (Pawnanagar) : पवना कृषक सेवा सहकारी संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली. सुरुवातीपासूनच अनेक मोठमोठ्या राजकीय उलथापालथींनी या निवडणुकीत रंगत आणली होती. मतदानाच्या काहीकाळ आधी ही निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र असताना ऐनवेळी झालेल्या लॉबिंगमुळे निवडणूक लागली आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत चळवळी लक्षात घेता निवडणूकीचा खेळखंडोबा होताना दिसताच भाजप पुरस्कृत पॅनलने डाव साधला. १३ पैकी ९ जागांवर दणदणीत विजय मिळवत १९९० पासून सत्ता टिकवलेला गड पुन्हा एकदा राखला. तर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले.
पवना कृषक सेवा सहकारी संस्था ही चाळीस गावांचे कार्यक्षेत्र असलेली मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी संस्था आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देऊन चांगल्या प्रकारे कारभार करणारी १९८०-१९९० च्या दशकातील ही एक नावारूपाला आलेली संस्था होती. परंतु १९९० नंतर विविध विकास सेवा संस्थेची स्थापना झाल्यानंतर पवना कृषक संस्थेला अवकळा लागली. अनेक वर्षे या संस्थेवर भाजपाचे वर्चस्व होते. यामुळे या निवडणुकीत भाजपने आपला पुरस्कृत पॅनल उभा केला होता.
मात्र निवडणूकीच्या दोन दिवस अगोदर दोन्ही पॅनलमध्ये समझोता होऊन तेरा उमेदवार बिनविरोध निवड करण्याचे ठरले. यात भाजपा पुरस्कृत पॅनल ला ७ जागा व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला ६ जागा असा फॉर्म्युला विद्यमान आमदार सुनील शेळके आणि अँड नामदेव दाभाडे यांच्या मध्यस्थीने ठरविण्यात आला.
मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया ही नियमानुसार होणार हे घोषीत केल्याने निवडणूक होत असताना राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोधसाठी एकमत होत नव्हते. दुपारी तीन वाजेपर्यंत एकही मतदाराने मतदान न केल्याने दोन्ही गटाकडून ५० मतदान करून निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे ठरले. मात्र अचानक काही मतदारांनी येऊन आपला हक्क बजावला आणि दोन्ही पक्षांची एकच धावपळ उडाली. मतदानाला अवघा एक तास बाकी असताना मोठ्या प्रमाणात मतदार येथे आले. त्यांनी हक्क बजावला. यात भाजप मित्र पक्ष पक्षाला ९ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला केवळ चार देत भाजपाने गड राखला.
दरम्यान, या निवडणुकीमुळे भाजपाला नवसंजीवनी मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे -
सर्वसाधारण - भाऊ संतू सावंत, अर्जुन बबन दहिभाते, गोविंद गणपत घारे, अंकुश तातेराम पडवळ, किसन विष्णू घरदाळे (भाजपा)
महिला - लक्ष्मीबाई किसन आडकर (भाजपा)
अनुसूचित जाती जमाती - अंकुश ज्ञानदेव सोनवणे (भाजपा)
इतर मागास प्रवर्ग - शेखर मारुती दळवी (भाजपा)
भटक्या विमुक्त जाती जमाती - बाळू चिंधू आखाडे (भाजपा)
राष्ट्रवादी आमदार गट
सर्वसाधारण - अनिल भागू तुपे, धोंडू शिवराम कालेकर, राम बारकु नढे, महिला - सुशिला रामदास घरदाळे
तारीख : 08-04-2025श्रेणी :राजकारण
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : मावळ तालुक्यातील साते येथील यशवंत ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजयराव उभे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी चेअरमन नामदेवराव गाभणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी संस्थेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यामध्ये विजयराव उभे यांचा चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संस्थापक भाऊसाहेब आगळमे, माजी चेअरमन नामदेव गाभणे, संचालक सचिन आवटे, विजय शिंदे, प्रकाश आगळमे, मारुती आगळमे, लक्ष्मीबाई आगळमे, भरत आगळमे, संस्थापिका सुलभा गावडे, रोखपाल संतोष शिंदे व सर्व संचालक मंडळ शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
दरम्यान, निवडीनंतर बोलताना विजय उभे यांनी संस्थेच्या योजनांचा सभासदांना लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. निवडीनंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल भंडाऱ्याची उधळण करत आनंदोस्तव साजरा केला.