तारीख : 07-07-2025श्रेणी :शिक्षण
तारीख : 10-07-2025श्रेणी :शिक्षण
टाकवे बुद्रुक (Takwe Budruk) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टाकवे येथील विद्यार्थ्यांनी २०२४-२५ शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश मिळवले आहे. इयत्ता पाचवीतील १९ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, त्यातील कुमारी हर्षल विकास असवले (२५८ गुण) आणि कुमारी राधिका शांताराम माळी (२४६ गुण) यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत मानाचे स्थान पटकावले आहे. या दोघींना प्रत्येकी ५ हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या यशामागे वर्गशिक्षक अतुल गायकवाड सर आणि शिक्षिका रुपाली गायकवाड मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सुट्ट्यांमध्येही त्यांनी विद्यार्थ्यांकडून सराव घेत सातत्याने मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख, मा. विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेत सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच अविनाश असवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप मालपोटे, विकास असवले, शांताराम माळी, तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
तारीख : 08-07-2025श्रेणी :शिक्षण
कामशेत (Kamshet) : पवन मावळ परिसरातील कामशेत येथील लब्धी छाजेड हिने मे २०२५ मध्ये झालेल्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अंतिम चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत यश मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. लब्धी ही पवन मावळमधील पहिली सनदी लेखापाल (CA) ठरली असून, तिच्या या यशामुळे संपूर्ण मावळ तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
शैक्षणिक वाटचाल: लहान गावातून मोठं स्वप्न
लब्धीचे प्राथमिक शिक्षण लोणावळा येथील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर तिने पुण्यातील नेस वाडिया महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. इयत्ता बारावीनंतरच तिने सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यासाला सुरुवात केली होती. तिने फाउंडेशन कोर्समध्ये २५६ गुणांनी यश मिळविले. तसेच इंटरमिजिएटच्या ग्रुप १ मध्ये २३८ आणि ग्रुप २ मध्ये ३१२ गुण मिळवत तिने पुढील टप्पा पार केला. अंतिम परीक्षेत तिने ग्रुप १ मध्ये १५९ आणि ग्रुप २ मध्ये १५८ असे एकूण ३१७ गुण मिळवत अंतिम यश संपादन केले. या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे लब्धीने शेवटी अंतिम परीक्षा यशस्वीरित्या पार करत सनदी लेखापाल होण्याचा मान मिळवला.
यशामागील बळ – कुटुंबाचा साथ
लब्धीच्या यशामागे तिच्या आई विमल छाजेड, वडील जगदीश छाजेड, आणि संपूर्ण कुटुंबाचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. लब्धीनेही आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, "कुटुंबाच्या सततच्या पाठिंब्यामुळे आणि मेहनतीच्या जोरावर हे यश शक्य झाले."
सन्मान आणि कौतुकाचा वर्षाव
लब्धीच्या या ऐतिहासिक यशाचे डॉ. नयना राठोड, डॉ. नितीन राठोड आदी मान्यवरांनी तिच्या घरी जाऊन सत्कार करत विशेष कौतुक केले. मुलींच्या शिक्षणासाठी छाजेड कुटुंबाने पवनानगरहून कामशेतला स्थलांतर केलं आणि आज त्यांचे स्वप्न साकार झाल्याचे समाधान वडील जगदीश छाजेड यांनी व्यक्त केलं.
“लब्धीने सीए व्हावं हे आमचं स्वप्न होतं. तिच्या जिद्द आणि मेहनतीने ते पूर्ण झालं. हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय आहे.”
— जगदीश छाजेड, वडील
संपूर्ण मावळसाठी अभिमानाचा क्षण!
लब्धी छाजेड ही केवळ कामशेतच नव्हे तर संपूर्ण पवन मावळ भागातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरली आहे. तिचं हे यश अनेक तरुण-तरुणींना मार्गदर्शन करणारे ठरेल.
तारीख : 22-05-2025श्रेणी :शिक्षण
पुणे (Pune) : आदिवासी विभागाने आश्रम शाळांमध्ये शिक्षकांच्या १७९१ मंजूर पदांची सेवा बाह्यस्रोतांद्वारे (कंत्राटी) उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी ८४ कोटी ७४ लाख ५५ हजार रुपये इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
आदिवासी विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. १६ नोव्हेंबर २०२२च्या निर्णयाद्वारे आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. या सुधारित आकृतिबंधानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांतील शिक्षकांच्या मंजूर १७९१ पदांच्या सेवा बाह्यस्रोतांद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी जीईएम संकेतस्थळावर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
बाह्यस्रोतांद्वारे उपलब्ध केल्या जाणाऱ्या शिक्षकांमध्ये २२९ उच्च माध्यमिक शिक्षक, ४५५ माध्यमिक शिक्षक, १२० पदवीधर प्राथमिक शिक्षक, १७८ प्राथमिक शिक्षा इंग्रजी, ८०९ प्राथमिक शिक्षक मराठी यांचा समावेश असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, 'राज्यात शिक्षकांच्या भरतीसाठी पवित्र संकेतस्थळामार्फत प्रक्रिया राबवण्यात येत असताना आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितील शाळांमध्ये बाह्यस्रोतांद्वारे शिक्षकांची सेवा घेण्याचा अर्थ काय,' असा सवाल माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, 'शिक्षण घेऊन पात्रता मिळवलेल्या, शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी यातून काय अर्थ घ्यायचा? २०२२मधील प्रस्ताव आता मंजूर केला जातो, म्हणजे इतकी प्रचंड पदे अद्याप भरलेली नाहीत हे आश्चर्य आहे. शिक्षण क्षेत्रात नेहमी विसंगत आदेशांचा अनुभव येत आहे.'
आश्रम शाळा किती?
आदिवासी विकास विभागांच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, अतिदुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लोकांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास जलदगतीने घडवून आणण्यासाठी १९७२-७३ पासून शासनाने निवासी आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित केलेली आहे. ही योजना मुख्यत्वे अतिदुर्गम, डोंगराळ व पाड्यातील आदिवासी मुला- मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना सुशिक्षित करणे आणि त्यायोगे त्यांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने राबविण्यात येते. शिक्षणाची गंगा दऱ्याखोऱ्यांत, दुर्गम पाड्यांत पोहोचविण्याचे काम शासकीय आश्रम शाळांमार्फत होत आहे. आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारित ४९७ शासकीय आश्रम शाळा, ५५६ अनुदानित आश्रम शाळा आहेत.
तारीख : 12-05-2025श्रेणी :शिक्षण
पुणे (Pune) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यंदा दहावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी पालकांचे निकालाच्या तारखेकडे लक्ष लागले होते.
त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (१३ मे) जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
राज्यभरातील सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कॉपीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल दीड टक्क्याने घटलाअसताना दहावीचा निकाल वाढणार की घटणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.
तारीख : 06-05-2025श्रेणी :शिक्षण
पवनानगर (Pawnanagar) : येथील लायन्स शांता माणेक पवना आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजने आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. तीनही विभागात मुलींनी बाजी मारली आहे. कॉलेजमधून १३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १३४ उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेजचा सरासरी निकाल ९७.८१ टक्के निलाल लागला असून सायन्स कॉलेजचा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल लागत असल्याची माहिती पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी दिली.
निकाल खालीलप्रमाणे (कसांत टक्केवारी)
वाणिज्य विभाग - ९८.५१ टक्के
१) तुपे दिक्षा गोपाळ - ८४.६७ टक्के
२) मोहोळ अर्पिता हरिश्चंद्र - ७९.८३ टक्के
३) सुतार श्वेता शशिकांत - ७६.६७ टक्के
कला विभाग - ९३.३३ टक्के
१) यादव श्रेया राजू - ८२.५० टक्के
२) तुपे सायली बाळू - ७०.६७ टक्के
३) अल्हाट समिक्षा भाऊ - ७० टक्के
सायन्स विभाग - १०० टक्के
१) दळवी समृद्धी बाळासाहेब - ७४.१७ टक्के
२) अहिर किशन काळूराम - ६५.१७ टक्के
३) लोहर चैतन्य विजय - ६१ टक्के
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातुन कौतुक होत आहे. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार खजिनदार राजेश म्हस्के यांनी यशस्वी विद्यार्थी व संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, शहाजी लाखे यांच्यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापक सर्वांचे अभिनंदन केले.