whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Pawna Dam : ब्रेकिंग! पवना धरणाने शंभरी गाठली, धरणातून ५७२० क्युसेकने विसर्ग सुरु

तारीख : 25-08-2024श्रेणी :महाराष्ट्र

feature image
whatsapp

Talegaon News : विजांच्या कडकडाटासह बरसला अवकाळी, तळेगावच्या आठवडे बाजारात शेतकऱ्यांचा गेला नाहक बळी

तारीख : 13-04-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे येथील रविवारच्या आठवडे बाजारात विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विजांच्या कडकडाटासह अवकाळी बरसू लागल्याने विविध भागातून शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अवकाळीने भाज्या भिजल्यामुळे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचा मात्र नाहक बळी गेल्याचे दिसून आले. 


मावळ तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या तळेगाव दाभाडे शहराचा आठवडे बाजार दर रविवारी भरतो. या आठवडे बाजारामध्ये लगतच्या पंचकृषीतील नागरिक, तसेच औद्योगिक वसाहतीतील कामगार वर्ग, मजूर व हातावर पोट भरणारे अनेकजण ताजी भाजी, फळे, तसेच जीवनावश्यक वस्तू या आठवडे बाजारात सवलतीच्या दरात मिळत असल्याने येथे नेहमीच गर्दी करत असतात.


सकाळपासून आकाश निरभ्र होते, मात्र दुपारनंतर ढग दाटून यायला सुरुवात झाली. तशी विक्रेते व खरेदीदारांची धांदल उडाली. आज अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आठवडे बाजारातील तात्पुरत्या स्वरूपात उभी केलेली सर्व दुकाने भक्षस्थानी गेली. रस्त्यावर ठेवलेला भाजीपाला हा धो- धो वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात भिजून खराब झाला. तसेच विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या या पावसामुळे आठवडे बाजाराकडे नागरिकांनी पूर्ण पाठ फिरवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला.

 

मागील दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून सुभाष मार्किट येथे होऊ घातलेल्या भाजी मंडईचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्यामुळे शेतकऱ्यांना भाजी विक्रीसाठी रस्त्यावरच बसावे लागते. परंतु जर हे काम वेळेत पूर्ण झाले असते तर आज लाखो रुपयांचा माल वाया गेला नसता. 


दरम्यान, मागील आठवड्यातच नगरपरिषद, पोलिस प्रशासन आणि व्यापारी यांनी यासंदर्भात संयुक्त बैठक घेऊन आठवडे बाजार स्थलांतरित करण्याचे व वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठीचे पर्याय अवलंबण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी आगामी दीड महिन्यातच मान्सूनला सुरुवात होत असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असून आज झालेल्या नुकसानीतून प्रशासन काय शिकणार? हे पाहणे महत्वाचे ठरत आहे.

whatsapp

Weather Update : राज्यभरात उष्णतेची लाट तीव्र; अवकाळीचंही संकट; वाचा IMD चा रिपोर्ट!

तारीख : 10-04-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

प्रजावार्ता : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. कधी अवकाळीचा मारा (unseasonal weather) तर कधी उष्णतेचा पारा (Heat) चढताना दिसत आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (१० एप्रिल) रोजी देशाच्या विविध राज्यांमध्ये हवामानाची वेगवेगळी स्थिती पाहायला मिळेल.


 

राज्यात दक्षिणेकडे भागात कमी दाबाचा पट्टा आणि तीव्र वाऱ्याचे क्षेत्र तयार होत असतानाच राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट (Heat) अधिक तीव्र होताना दिसेल. येत्या २४ तासांमध्ये दक्षिण भारतामध्ये पावसाचा इशारा जारी केला असून, मध्य आणि उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढताना (Heat) दिसेल. महाराष्ट्रात उष्णतेमुळे होणारी नागरिकांनी होरपळ अद्याप थांबलेली नाही. 


 

विदर्भात सूर्य नारायाणाचा पारा सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे नजीकच्या भागांमध्येही उष्णतेच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.


 

राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे करण्यात आली असून, येथे तापमानाचा पारा ४४.१ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आला आहे. राज्यात एकिकडे उष्णता रौद्र रूप धारण करत असतानाच दुसरीकडे मात्र बाष्पीभवन प्रक्रियेला वेग येत आहे. त्यामुळे वादळी पावसाला आवश्यक अशी वातावरणनिर्मिती तयार होताना दिसत आहे. त्यामुळे विदर्भात येत्या २४ तासांसाठी अवकाळी पावसाचा (unseasonal rain) अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.


 

शेतकऱ्यांना सल्ला


 

मळणी केलेल्या रब्बी ज्वारी व गहू पिकाच्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.


 

काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या हळद पिकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.

whatsapp

Maval News : विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी जंगलात विखूरलेल्या प्राचीन बजरंग बली मंदिराला पुनर्जीवन

तारीख : 16-03-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : विसापूर गडाच्या पायथ्याशी,  मालेवाडीशेजारी झाडाझुडपात विखूरलेल्या बजरंगबलीच्या प्राचीन मंदिराला "सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान" कडून पुनर्जीवन मिळून अखेर नूतन मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला.


शुक्रवारी (ता. ७) रोजी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. शनिवारी (ता. ८) रोजी मशाल महोत्सव, शिवपूजा जलाभिषेक, सामुदायिक हरिजागर, रविवारी (ता. ९) रोजी सत्यनारायण महापूजा होऊन पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर येथील स्थानिक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि बजरंग बलीच्या मूर्तीची नेहमी पूजा करणारे बबन बैकर यांच्या हस्ते मंदिराचे उदघाट्न करण्यात आले.


त्यानंतर हरिजागार होऊन इतिहास संशोधक प्रमोद बोऱ्हाडे यांनी विसापूर म्हणजेच संबळगडाच्या इतिहासाची तंतोतंत माहिती अतिशय उत्तमप्रकारे दिली. उपस्थित असंख्य नागरिक विसापूर गडाचा इतिहास ऐकण्यात हरवून गेले होते. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. शेवटी भोजनाची व्यवस्था असल्याने कार्यक्रमाला उपस्थिती दाखवलेल्या नागरिकांना एकप्रकारे वनभोजनाचा आनंद घेता आला.


याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील शेळके उपस्थित होते. त्याबरोबरच सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिन शेडगे, इतिहास अभ्यासक प्रमोद बोऱ्हाडे, वन्यजीव रक्षक निलेश गराडे, अनिल आंद्रे, रामनिवास गुप्ता, विनायकराव जाधव, अनिल काकडे, अमोल थोरवे, किरण हुलावळे, राम केदारी, अनिल साबळे, सोमनाथ शिंदे, विश्वनाथ पुट्टूल, ललित धुमाळ उपस्थित होते.


यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले, "विसापूर किल्ल्याच्या संवर्धनासाठी तसेच मावळातील इतर प्रत्येक किल्ल्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध आहे. मंदिराच्या आवारात सोलर दिवे व मंदिरासमोर दीपमाळ लावून देण्यात येईल. अतिशय खडतर परिस्थितीत व दोन वर्षांच्या अविरत मेहनतीने संबळगडाच्या पायथ्याला बजरंग बलीचे मंदीर साकाराल्याने त्यांनी 'सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान'च्या मावळ्यांचे कौतुक केले. पुढे दुर्गसंवर्धनाच्या कार्यात मी निधी उपलब्ध करुन देणार आहोत आणि सर्वोत्तम काम करुन घ्यायची जबाबदारी तुमची असेल असेल" असे त्यांनी मत व्यक्त केले.


नूतन मंदिराला फुलांचा साज


पूर्वी एक बजरंग बलीची मूर्ती व आजूबाजूला प्राचीन मंदिराचा झाडाझुडपातील भग्नावस्थेतील चौथरा अशी स्थिती त्याठिकाणी होती. "सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान" ने दोन वर्षे केलेल्या मेहनतीमुळे अखेर मंदिराचे रूप पालटले आहे. दगडांचे बांधकाम त्यात मंदिराला विशिष्ट प्रकारचा रंग देण्यात आला आहे. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी मंदिर सजविण्यात आले होते. मंदिरासमोर बजरंगबलीची सुंदर प्रकारची रांगोळी भाविकांचे तसेच उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यामुळे विसापूर गडाच्या भोवतीच्या गर्द झाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले होते.


The ancient Bajrang Bali temple, which was scattered in the forest at the foot of Visapur Fort, has been revived

whatsapp

Pawnanagar News : जागतिक महिला दिन! पवनानगरमध्ये महिलांना फुल शेतीविषयी मार्गदर्शन

तारीख : 09-03-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पवनानगर (Pawnanagar) : जगभरात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना प्रामुख्याने सन्मानित करण्यात येते. अनेकठिकाणी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध शिबिरे तसेच महिला स्वबळावर उभ्या राहून नारीशक्ती ही सशक्त होईल यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

 

याच पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील पवना संस्कृती फार्मर प्रोड्यूसर कंपनी, इंडिया एक्झिम बँक (भारत सरकार) आणि भा.कृ अनु संस्था (आयसीइआर)च्या संयुक्त विद्यमाने आज (शनिवार दि. ८ मार्च) रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारीशक्ती सशक्त करण्यासाठी परिसरातील महिलांना अत्याधुनिक शेती तसेच फुलशेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. उपस्थित महिलांनी आपल्याला अत्याधुनिक शेतीमध्ये येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा केली. त्यावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडिया एक्झिम बँकच्या उपव्यवस्थापकीय संचालिका दिपाली अग्रवाल, जनरल मॅनेजर धर्मेंद्र सचन, मुख्य व्यवस्थापक कौशल गिरी, भा.कृ.अनु.प.पुष्प विज्ञान अनुसंधान निर्देशालयचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रभा, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गणेश कदम, एनएचबी तांत्रिक सल्लागार हेमंत कापसे, माजी सभापती निकिता घोटकूले, पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकर, साई रोझेस कंपनीचे एमडी प्रदीप ठाकर, भाजपा सहकार आघाडी अध्यक्ष ज्ञानेश्वर आडकर, माजी सरपंच सीमा ठाकर, माजी उपसरपंच नवनाथ ठाकर, माजी उपसरपंच तानाजी शेंडगे, दिलीप काळे आदी मान्यवरांसह शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

मावळ तालुक्यातील हवामान हे फुल शेतीसाठी पोषक असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे आपला कल वाढवला असून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. विशेष म्हणजे याच फुलशेती (पॉलिहाउस)मध्ये जवळपास ७० ते ७५ टक्के काम हे महिला वर्गच करत आहे. त्यामुळे जसा आपण आपल्या घरातील किंवा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या  महिलांचा सन्मान करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या फुल शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांचा ही सन्मान केला पाहिजे याच उद्देशाने पवन मावळातील शेतकऱ्यांसाठी भविष्यातील संधी, आर्थिक पाठबळ, विविध सरकारी योजना तसेच फुल शेतीविषयी पाठशाळेचे आयोजन  करण्यात आल्याचे पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकूंद ठाकर यांनी सांगितले.

 

कंपनीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक प्रदिप ठाकर यांनी पवना संस्कृती फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापनेपासून ते भविष्यातील वाढीबाबतचे नियोजन यावर माहीती देत असताना गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले.

 

कार्यक्रमादरम्यान इंडिया एक्झिम बँकेच्या उपव्यवस्थापकीय संचालिका दीपाली अग्रवाल यांनी महिलांचे कौतुक करताना सांगितले की, "महाराष्ट्र फुलशेतीत आघाडीवर असून, राज्यातून ७० ते ७५ टक्के फुले निर्यात केली जातात. या निर्यातीला अधिक चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महिला शेतकरी आणि कामगार ज्या तळमळीने फुलशेती करतात, ते कौतुकास्पद आहे. त्यांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांना आवश्यक पाठबळ देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या ज्या महिला भगिनी फुलाला अगदी आपल्या मुलाप्रमाणे जपतात त्यांचा मला अभिमान वाटतो.

 

दरम्यान, या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना फुलशेतीतील संधी, शासकीय योजनांचा लाभ आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. महिलांचा सन्मान आणि प्रबोधन या दृष्टीने हा कार्यक्रम फलदायी ठरला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयसिंग हुलावळे यांनी केले. तर आभार तानाजी शेंडगे यांनी मानले. 

whatsapp

Maval News : सहा जणांवर हल्ला, नागरिकांची धावाधाव; अन् बिबट्या सुरक्षितरित्या जेरबंद

तारीख : 07-03-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पवनानगर (Pawnanagar) : मावळातील लोणावळानजीकचे थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटनस्थळांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पवना धरण परिसरात आजची सकाळ उजडली ती बिबट्याच्या थराराने, शुक्रवारी (दि. ७ मार्च) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आंबेगाव येथील पवना कॅम्पिंग साईटवर बिबट्याचे दर्शन घडले अन् सर्वत्र धावाधाव सुरु झाली.


यावेळी बिबट्याने सहा जणांवर हल्ला केल्याची माहिती मिळत असून जखमींवर जिल्हा रुग्णालय औंध येथे उपचार सुरु आहेत. त्यामध्ये बाळू राधु शिंदे (वय ४२, शिंदगाव, ता. मावळ, जि. पुणे), गफूर पापा शेख (वय ६५, रा. आंबेगाव), ज्ञानेश्वर श्रीपती राजिवडे (वय ६०, रा. आंबेगाव, ता. मावळ), प्रवीण रामभाऊ राजिवडे (वय ३४, रा. आंबेगाव), भक्तिश्वर ज्ञानेश्वर राजिवडे (वय ३०, रा. आंबेगाव) आणि बिबट्याला रेस्क्यू करताना वन्यजीव रक्षक संस्थेचे शत्रुघ्न रासनकर यांचा समावेश आहे.


नेमकी घटना काय? सुरुवातीपासून काय घडलं? 


शिंदगाव येथील ग्रामपंचायत शिपाई बाळू शिंदे हे सकाळी पाण्याची मोटर चालू करण्यासाठी पवना धरणाकाठी गेले असता त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला चढवला. भयभीत झालेल्या शिंदे यांनी तात्काळ आरडाओरडा केल्याने आसपासच्या नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. बघतात तर काय बिबट्याचा सुरु असलेला मुक्त संचार. आरडाओरडा करून नागरिक बिबट्याला पळवून लावण्यासाठी प्रयत्न करत होते. पण बिबट्या त्याचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होता. तो जवळच्याच एका कॅम्पिंग साईटकडे गेला. तिथेही ग्राहक आणि स्थानिकांची वर्दळ असल्याने त्याने तिथेच उंच असलेल्या उंबराच्या झाडावर चढून आपला जीव सुरक्षित केला.


त्यानंतर बिबट्या एका ठिकाणी स्थिर झाल्यानंतर वनविभाग आणि वन्यजीव रक्षक संस्थेच्या धाडसी सदस्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला युक्ती लावून पकडले. दरम्यानच्या काळात बिबट्या नागरिकांच्या भीतीने तर नागरिक बिबट्याच्या भीतीने मिळेल ती वाट पकडून धावत होते. मात्र या सर्व घटनेत बिबट्याने एकूण सहा जणांना चावा घेतला. बिबट्याला समोर पाहून आणि त्याने धारण केलेले रौद्र रूप पाहून स्थनिकांचा मात्र थरकाप उडाला होता. बिबट्याला पकडून रेस्क्यू सेंटरकडे पाठवण्यात आल्याची माहिती वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी दिली. तर स्थानिकांनी भीतीपोटी केलेल्या गरज नसलेल्या हालचालींमुळे बिबट्या जखमी झाल्याची माहिती मिळाल्याबाबत विचारले असता शिंदे यांनी तशी कुठली घटना न घडल्याचे सांगितले. 

whatsapp