whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Pawana Dam : पवना धरण ७६ टक्के! धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला, नागरिकांनी सावधानता बाळगावी

तारीख : 06-07-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image
whatsapp

Takwe News : अवजड वाहतूकीमुळे राजपुरी-टाकवे रस्त्याची दुरवस्था; नागरिकांची होतीये कसरत

तारीख : 07-07-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

टाकवे बुद्रुक (Takwe Budruk) : पावसाळा सुरू होताच राजपुरी बेलज टाकवेला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने नागरीकांना तसेच वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर रस्त्यावरुन विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यवसायिक यांना दररोज जावे लागत आहे. बेलज ते राजपुरी रस्त्यावर २०१७ नंतर शासनाचा कोणताही निधी पडला नसल्याचे सांगण्यात येत असुन परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतुन साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढुन चालावे लागत आहे.


टाकवे तसेच आंदर मावळातील अनेक कामगार याच रस्त्यावरुन नवलाख उंबरे या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमध्ये कामावर जाण्यासाठी ये-जा करत आहेत. सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.


रस्त्यावर वाढत चालीये अवजड वाहतूक


राजपुरी तसेज बेलज परिसरात देखील आता क्रशर-खाणीची संख्या वाढत चाली असल्याने त्याची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यामुळे देखील रस्ता अधिक प्रमाणात खचत असल्याने याठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडत आहेत. याचा छोट्या वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

 

"टाकवे राजपुरी रस्त्याकडे शासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. इतर ठिकाणी अनेकवेळा निधी उपलब्ध होतो, मग हा रस्ता करण्यासाठी शासनाकडे पैसे का नाहीत का? टाकवे तसेच तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी आम्हाला हाच मुख्य मार्ग असल्याने शासनाने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा" 
- बाजीराव ओव्हाळ (स्थानिक नागरिक, बेलज)

 

"२०१७ पासून बेलज ते राजपुरी या रस्त्यावर डागडुजीसाठी एकदा सुद्धा निधी उपलब्ध झाला नाही. अनेकवेळा आम्ही मागणी करुन देखील रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत" 
- पप्पू गायकवाड (स्थानिक नागरिक, राजपुरी)
whatsapp

Pawana Dam : अलर्ट! पवना धरण ७२ टक्के भरले, धरणाच्या सांडव्यावरून ४०० क्युसेक्सने विसर्ग सुरू

तारीख : 05-07-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पवनानगर (Pawnanagar) : पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढला आहे. धरण सध्या ७२ टक्के क्षमतेने भरलेलं असून, जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने धरणाच्या सांडव्याद्वारे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.


आज, ५ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून, धरणातून ४०० क्युसेक्स (cusecs) वेगाने पाणी सोडले जात आहे. हा विसर्ग नियंत्रित स्वरूपात असून तो १५ जुलै २०२५ पर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


पावसामुळे येव्यात वाढ – विसर्ग अजून वाढू शकतो!


सध्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण स्थिर असून, येत्या काही दिवसांत पावसात अधिक वाढ झाल्यास विसर्गाचा वेगही वाढवण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.


नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना


त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी अतिशय सावधगिरी बाळगावी. कोणीही नदीपात्रात पोहायला किंवा पाणी आणायला जाऊ नये. नदीपात्रातील पंप, शेतीसाहित्य, मोटारी, व जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना पूर्वसूचना देण्यात याव्यात आणि आवश्यक असल्यास स्थलांतराची तयारी ठेवावी. ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन, पोलीस व जलसंपदा विभागाशी संपर्कात राहून सहकार्य करावे, अशी सूचना करण्यात येत आहे. 


“सावध राहा, सहकार्य करा”


दरम्यान, पाण्याच्या विसर्गाचा अंदाज घेवून कोणतीही धोकादायक कृती टाळावी. पवना नदी काठच्या भागात कोणतीही गाफीलपणामुळे विसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

whatsapp

Pawana Dam : पवना धरण ७० टक्के भरले! धरण परिसरात मुसळधार पाऊस, गतवर्षीपेक्षा ५० टक्के अधिकचा पाणीसाठा

तारीख : 04-07-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पवनानगर (Pawnanagar) : मावळ तालुक्यातील पवना धरणात ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत (४ जुलै) केवळ ३२५ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर यंदा आतापर्यंत १०५२ मिमी पावसाची नोंद झाली. पावसात तब्बल तिपटीने वाढ झाली. त्यामुळे पाणीसाठ्यातही घसघशीत वाढ झाली आहे.


यावर्षी सध्या धरणात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ५० टक्के अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्याच्या पवना धरणावर अवलंबून असलेल्या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. पावसाचा सध्याचा जोर पाहता जुलै महिन्यातच पवना धरण १०० टक्के भरण्याची शक्यता आहे.


दरम्यान, लोणावळा व मावळ परिसरात मागील महिनाभरापासून मुसळधार पावसाचा सिलसिला सुरू असून मावळ तालुक्यातील बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या अंतिम टप्प्यावर आहेत. ही स्थिती सकारात्मक असली, तरी आगामी काळातील अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

whatsapp

Weather Update : कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरी, पुणे, सातारा घाट परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’

तारीख : 30-06-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

प्रजावार्ता : राज्यात सध्या काही भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाट परिसरात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला असला तरी ठराविक भाग वगळता इतर भागात मुसळधार पाऊस झालेला नाही. राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे काही भागात तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. तर, कोकण, घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज रत्नागिरीबरोबरच पुणे आणि सातारा घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


तसेच रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली , जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस आधीच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे.


कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता


पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मोसमी वाऱ्यांचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूर, सोनीपत, आयोध्या, गया, पुरुलिया, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरील कमी दाबाचे केंद्र ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांपासून कमी दाब क्षेत्रापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.


मुंबईत हलक्या सरींचा अंदाज


मुंबईत आज हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मुसळधार पाऊस शक्यतो पडणार नाही असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


पावसाचा अंदाज कुठे


▪️ अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
रत्नागिरी, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर

▪️ मुसळधार पावसाचा अंदाज सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट)
रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, नागपूर, भंडारा, नांदेड, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली

▪️ वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज (येलो अलर्ट)
जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड,अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा

whatsapp

Maval News : मावळात प्रथमच ‘मराठी पत्रकार संघा’ची स्थापना; अध्यक्षपदी गिरमे, कार्याध्यक्षपदी विकारी तर सचिव पदी रामदास वाडेकर यांची निवड

तारीख : 30-06-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : मावळ तालुक्याच्या पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वतंत्र आणि सर्वसमावेशक अशा ‘मावळ तालुका मराठी पत्रकार संघा’ची स्थापना करण्यात आली आहे. या नव्या संघटनेच्या अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्षपदी विशाल विकारी, तर सचिवपदी रामदास वाडेकर यांची एकमताने निवड झाली आहे. या संघाची स्थापना व पदग्रहण सोहळा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत वडगाव येथे संपन्न झाला.


कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी, सचिव शिबू नायर, पुणे शहराध्यक्ष पंकज बिबवे, लोकमतचे उपसंपादक योगेश माडगूळकर, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, बबनराव भसे, ज्ञानेश्वर वाघमारे, विलास भेगडे, निखिल कवीश्वर, अतुल पवार, रेश्मा फडतरे, विशाल पाडळे, चेतन वाघमारे यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.


या नव्याने स्थापन झालेल्या संघात लोणावळा, कामशेत, मावळ ग्रामीण, तळेगाव, तळेगाव प्रेस फाउंडेशन व देहूरोड पत्रकार संघाचे सर्व सदस्य समाविष्ट करण्यात आले आहेत. मावळ तालुक्याच्या इतिहासात प्रथमच तालुका पातळीवर सर्वव्यापी अशी संघटना उभी राहत असून पत्रकारांच्या विविध मागण्या व समस्यांबाबत सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. 


राज्य अध्यक्ष किरण जोशी यांनी संघाची उद्दिष्टे, उपक्रम यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा संघ पुणे-मुंबई शहराच्या धरतीवर कार्यरत राहणार असून पत्रकारांसाठी निवास, आरोग्य सेवा, शैक्षणिक उपक्रम यांचा देखील समावेश केला जाणार आहे.


नवीन संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी पत्रकार संघाला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. उपसंपादक योगेश माडगूळकर यांनी मावळातील सकारात्मक पत्रकारितेचे कौतुक केले. ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, निखिल कवीश्वर यांनी पत्रकार संघाच्या गरजांवर भाष्य केले. ही संघटना मावळ तालुक्यातील पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देईल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.


कार्यक्रमाचे स्वागत विशाल विकारी यांनी केले. प्रास्ताविक गणेश विनोदे यांनी तर सूत्रसंचालन रामदास वाडेकर यांनी केले. अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 


कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :


सल्लागार : सोनबा गोपाळे, बबनराव भसे, विलास भेगडे, ज्ञानेश्वर वाघमारे, निखिल कवीश्वर


मुख्य पदाधिकारी


अध्यक्ष : सुदेश गिरमे
कार्याध्यक्ष : विशाल विकारी
उपाध्यक्ष : अमीन आफताब खान व भारत काळे
सचिव : रामदास वाडेकर
खजिनदार : संकेत जगताप
प्रकल्प प्रमुख : गणेश विनोदे
कायदेशीर सल्लागार : ॲड. किशोर ढोरे
सदस्य : सचिन शिंदे, चैत्राली राजापुरकर, सचिन ठाकर, मुकुंद परंडवाल.


पदसिद्ध सदस्य


विशाल पाडाळे (अध्यक्ष लोणावळा)
अतुल पवार (अध्यक्ष तळेगाव)
रेश्मा फडतरे (अध्यक्ष तळेगाव प्रेस)
चेतन वाघमारे (अध्यक्ष कामशेत)

whatsapp