तारीख : 12-07-2025श्रेणी :राजकारण
तारीख : 12-07-2025श्रेणी :राजकारण
प्रजावार्ता : राज्यातील २२ महापालिकांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली असून, निवडणुका तीन टप्प्यांत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मतमोजणीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक तयारीसाठी विभागीय बैठका
राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षतेखाली विविध महापालिकांच्या आयुक्तांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये निवडणुकीसाठी यंत्रणा, मतदान केंद्र, मतदारसंख्या, मनुष्यबळ यावर आढावा घेण्यात आला.
वाघमारे म्हणाले, "मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी वेळीच झाली पाहिजे. त्यामुळे निवडणूक मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात पार पडू शकेल."
निवडणूक आयोगाला लागणार ६.५ लाख EVM मशिन्स
एकूण १६६ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रतीक्षेत असून, सर्व निवडणुका एकत्र घेण्याची योजना आहे. यासाठी आयोगाला सुमारे ६.५ लाख ईव्हीएम यंत्रांची गरज भासणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडे मशीन उपलब्धतेसाठी मागणी करण्यात आली आहे.
सप्टेंबरमध्ये होणार अंतिम प्रभाग रचना जाहीर
२२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह अन्य महापालिकांच्या प्रभाव क्षेत्राचे अंतिम आराखडे जाहीर होतील. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचना पूर्ण होऊन निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
तारीख : 10-07-2025श्रेणी :राजकारण
प्रजावार्ता : PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर १५ दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरआढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने शेळके यांच्या प्रयत्नांना अखेर यश लाभले आहे.
नियम डावलून देण्यात येत आहेत पूर्णत्वाचे दाखले
PMRDA कडून काही मोठ्या गृहप्रकल्पांना कोणतीही शहानिशा न करता, नियमनाचे उल्लंघन करत पूर्णत्वाचे दाखले दिले जात असल्याच्या तक्रारी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत मांडल्या होत्या. त्यावरून १९ जून २०२५ रोजी झालेल्या बैठकीत संबंधित प्रकल्पांची यादी, कारवाईचा तपशील व विकासकांविरोधातील लेखी तक्रारी याबाबत आठ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
दूषित पाणी व सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
आज झालेल्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या अहवालात मावळ तालुक्यातील काही प्रकल्पांमधून दूषित व पिण्यायोग्य नसलेले पाणी पुरवले जात असल्याचे स्पष्ट झाले. अनेक प्रकल्पांमधून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये सोडले जात असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अपुऱ्या नागरी सुविधांमुळे रहिवासी त्रस्त आहेत, तर विकासकांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.
१५ दिवसांत कठोर कारवाईचे आदेश
विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना पुढील १५ दिवसांत ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले. "नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही," असे ते म्हणाले.
या फेरआढावा बैठकीस संबंधित वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. योगेश म्हसे (महानगर आयुक्त, पीएमआरडीए), शेखर सिंह – (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका) सुरेंद्र नवले (उपविभागीय अधिकारी, मावळ), विक्रम देशमुख (तहसीलदार, मावळ) आदींचा समावेश होता.
या निर्णयामुळे मावळ, मुळशी आणि PMRDA क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित पाणी, योग्य सुविधा, पर्यावरण रक्षण आणि कायदेशीर आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा विषय निर्णायक वळणावर पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.
तारीख : 10-07-2025श्रेणी :राजकारण
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : मावळ तालुक्यातील महिला संचलित तनिष्का नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत संस्थेच्या संस्थापिका अर्चना संदीप घारे यांची अध्यक्षपदी फेरनिवड, तसेच उपाध्यक्षपदी ज्योती विठ्ठल बधाले, सचिवपदी शबनम आमिन खान, आणि खजिनदारपदी सारिका गणेश विनोदे यांची निवड करण्यात आली.
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, वडगाव मावळ यांच्याच्या मान्यतेने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. जरे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यावेळी सर्वानुमते नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाची निवड जाहीर करून नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
संस्थापक अध्यक्षा अर्चना घारे म्हणाल्या, ही महिला संचलित असलेली तालुक्यातील एकमेव सर्वसाधारण पतसंस्था असून संपूर्ण संचालक मंडळ महिला व कर्मचारीही महिला आहेत. पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज सुरू असल्याने संस्थेच्या कामकाजाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. संस्थेमार्फत लवकरच सोनेतारण कर्ज योजना सुरू करण्यात येणार असून, सभासदांना अल्पदराने सोप्या अटींवर त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस घारे यांनी व्यक्त केला.
संस्थेची आर्थिक प्रगती झपाट्याने
सभासद संख्या: ३,५५७
कर्जवाटप: ₹६.१९ कोटी
ठेवी: ₹७.९८ कोटी
वार्षिक उलाढाल: ₹१० कोटींच्या आसपास
या वर्षीचा नफा: ₹९.८० लाख
वार्षिक अहवाल व लाभांश वितरण लवकरच जाहीर होणार
नूतन संचालक मंडळ यादी (२०२५–३०):
अध्यक्ष: अर्चना संदीप घारे
उपाध्यक्ष: ज्योती विठ्ठल बधाले
सचिव: शबनम आमिन खान
खजिनदार: सारिका गणेश विनोदे
संचालक: शुभांगी कारके, कमल गराडे, वैशाली ढोरे, मनिषा आंबेकर, सुमित्रा दौंडकर, सुवर्णा गाडे, मनिषा वाघोले, ललिता कोतूळकर, स्वाती भेगडे, कल्पना काजळे, सीमा बालगुडे, पुष्पा घोजगे, सुवर्णा राऊत, सुप्रिया बडवे
व्यवस्थापक: मोनाली चंद्रकांत केंजळे
तारीख : 03-07-2025श्रेणी :राजकारण
प्रजावार्ता : शिवसेना (ठाकरे गट)चे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार सुनील शेळके यांच्यावर गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. राऊतांचा दावा आहे की, मावळचे आमदार शेळके यांनी खाण उत्खनन क्षेत्रात हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी सरकारपासून लपवून मोठ्या प्रमाणावर शासनाची फसवणूक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेळके हे राऊतांच्या सॉफ्ट टार्गेट'वर आहेत. परंतु आता मात्र राऊतांनी सुनील शेळकेंची चांगलीच कोंडी केली आहे.
राऊत यांनी पत्राद्वारे फडणवीस यांना कारवाईची मागणी करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्राची लुट सुरू असून, सरकारचे समर्थन करणारे काही आमदार त्यामागे आहेत. सुनील शेळके यांनी एमआयडीसीच्या जमिनीवर बेकायदेशीर खाण व्यवसाय सुरू करून सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे मी फडणवीसांना पाठवले आहेत.”
राऊत यांचा आरोप आहे की, त्यांनी आतापर्यंत मंत्रिमंडळातील २१ मंत्र्यांवरील भ्रष्टाचारासंबंधी पुरावे फडणवीसांना दिले, परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही, की त्यांच्या पत्रांना प्रतिसादही मिळालेला नाही.
सुनील शेळके यांचे प्रत्युत्तर: “पुरावे नसताना आरोप अनाठायी”
या आरोपांवर आमदार सुनील शेळके यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, “संजय राऊत यांनी कोणतेही ठोस पुरावे न देता केवळ राजकीय हेतूने माझ्यावर आरोप केले आहेत. जर त्यांच्याकडे खरच काही पुरावे असतील, किंवा माझ्यावर शासकीय चौकशी सुरू असेल तर ते पुरावे लोकांसमोर मांडावेत. तोपर्यंत मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.”
तारीख : 01-07-2025श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव भेगडे हे मावळ तालुक्यातलं, पुणे जिल्ह्यातलं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं होतं. त्यांच्या निधनानं शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेलं, मावळच्या, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं आहे, अशा भावनिक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला.
दोनच आठवड्यापूर्वी १७ जून रोजी पवना हॉस्पिटलमध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांना बोलताना त्रास होत होता, परंतु ते बोटांच्या खुणांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. ती आमची शेवटची भेट ठरेल, असं कधीच वाटलं नाही. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला.
भेगडे यांच्या आठवणींना उजाळा देत पवार म्हणाले, कृष्णराव भेगडे साहेब सुरुवातीच्या काळात मावळचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर मावळचे नगराध्यक्ष झाले. १९७२ ला जनसंघाच्या तिकिटावर पहिल्यांदा मावळचे आमदार झाले. १९७७ ला काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर १९७८ ला पून्हा आमदार झाले. विधान परिषदेवरही दोन टर्म निवडून गेले.
नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, इंद्रायणी विद्या मंदिरसारख्या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्याचं काम त्यांनी केलं. पुण्याच्या औद्योगिक, आर्थिक विकासात महत्वाचं योगदान देणाऱ्या तळेगाव एमआयडीसीच्या उभारणीत त्यांचं महत्वाचं योगदान होतं. मावळभूषण, शिक्षणमहर्षींसारख्या अनेक पदव्या, पुरस्कारांनी सन्मानित कृष्णराव भेगडे यांचं संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी समर्पित होतं. त्यांचं निधन ही मावळ तालुक्याची, पुणे जिल्ह्याची, महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या चळवळीची मोठी हानी आहे.