तारीख : 25-08-2024श्रेणी :राजकारण
तारीख : 02-08-2025श्रेणी :राजकारण
देहूरोड (Dehuroad) : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून स्वतंत्र नगरपरिषद स्थापण्यात यावी, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी व उद्यानासाठी विशेष निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत निवेदन देण्यात आले आहे.
शेलार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येणाऱ्या शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून शासनाकडून मिळणारे संपूर्ण गणवेशासाठीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळेत पूर्ण गणवेशात येणे कठीण झाले आहे. हे अनुदान त्वरित मंजूर करून विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवावे, अशीही मागणी शेलार यांनी केली.
तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि देहू नगरपंचायत हद्दीत विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेला निधी लवकरात लवकर मंजूर करावा, अशी विनंती देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
“कॅन्टोन्मेंट प्रशासनाचा कारभार अपारदर्शक असून, सामान्य जनतेला न्याय मिळत नाही. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वतंत्र नगरपरिषद ही काळाची गरज आहे,” असे शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
तारीख : 29-07-2025श्रेणी :राजकारण
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव कातवीतील नागरिकांसाठी दि. २० ऑक्टोंबर २०२५ रोजी पर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया या सेवाभावी आरोग्यदायी उपक्रमाचा उदघाटन शुभारंभ मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, मा नगराध्यक्ष मयूर ढोरे, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. विकास जाधावर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस २० ऑक्टोबर रोजी असून दरवर्षी प्रमाणे यंदाही मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समोजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. यात रोजगार प्रशिक्षण, आरोग्य शिबीर, क्रीडा स्पर्धा, महिला वर्गासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, लहान मुलांसाठी प्रोत्साहन स्पर्धा, वृक्षलागवड, किल्ले सफर यांसह विविध भरगच्च कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येत आहे.
आजपासून सुरू झालेल्या या शिबिरास वडगाव शहरातील नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत तपासणी केली. शिबिरादरम्यान एकूण ९३ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान २५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोरया वैद्यकीय सेवा कक्षाच्या माध्यमातून २७ ऑगस्ट रोजी पर्यंत टप्प्याटप्प्याने यां रूग्णांवर पिंपरी चिंचवड येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून या रुग्णांना विनामूल्य चष्मे ही देण्यात येणार आहे.
२० ऑक्टोबर रोजी आमदार सुनील आण्णांचा वाढदिवस असल्याने हे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर महिन्यातून दोनदा असे सलग तीन महिने हा सेवाभावी उपक्रम राबवण्यात येणार आहे. तरी वडगाव शहरातील ज्या नागरिकांना डोळ्यासंदर्भात तक्रारी असतील त्यांनी या शिबिराचा विनामूल्य लाभ घ्यावा असे मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्षा अबोली ढोरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
याप्रसंगी विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉक्टर विकास जाधवर, दिव्यदृष्टी व चाकणे आय ट्रस्ट चे अनुज शहा, मा.नगरसेविका पुनम जाधव, उपाध्यक्ष चेतना ढोरे, यशवंत शिंदे तसेच मोरया महिला प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, संचालिका, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तारीख : 28-07-2025श्रेणी :राजकारण
पवनानगर (Pawananagar) : मावळातील ऐतिहासिक तिकोना किल्ला पुन्हा एकदा शिवप्रेम, स्वच्छतेची जाणीव आणि गडसंवर्धनासाठी हजारो मावळ्यांनी गाजवला. खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून आणि ‘आपला मावळा’ व नीलेश लंके प्रतिष्ठान यांच्या पुढाकारातून ही भव्य मोहिम पावसातही उत्साहात पार पडली.
या मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती होती. मोहिमेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून शिवप्रेमींची मोठी उपस्थिती लक्षणीय ठरली.
‘दर महिन्याला एक गड’ उपक्रमांतर्गत तिकोना किल्ला पाचव्या मोहिमेचा साक्षीदार
खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या ‘दर महिन्याला एक गड’ उपक्रमाचा हा पाचवा टप्पा होता. पुणे, मुंबई, नगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यातून आलेल्या विद्यार्थी, तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत गडावर स्वच्छता, वृक्षारोपण, डस्टबिन्स लावणे, सूचना फलक व्यवस्था अशा उपक्रमात भाग घेतला.
मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करून मोहिमेची भव्य सुरुवात
शनिवारी रात्रीच नीलेश लंके व सुमारे ४०० मावळे गडाच्या पायथ्याशी मुक्कामी पोहोचले. येथील शिवप्रसाद मंगल कार्यालयाच्या दालनात निलेश लंके स्वतः आपल्या सवंगड्यांसोबत मुक्कामी होते. ना कुठला बंदोबस्त, अन ना कुठला प्रोटोकॉल, हे सर्व बाजूला ठेऊन ते मोहिमेत सक्रिय सहभागी झाल्याने त्यांच्या साध्या राहणीची मात्र मावळवासीयांनी नोंद घेतली. शिवप्रतिज्ञा व जिजाऊ वंदनेने मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मुसळधार पावसातही मावळ्यांनी गड स्वच्छतेचे कार्य निर्धाराने पार पाडले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनेच खा. नीलेश लंके हे संपूर्ण महाराष्ट्रात गडसंवर्धनाचे काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले आठरा पगड जातींना बरोबर घेऊन जाणारे खरं हिंदुत्व ते कृतीतून जनतेसमोर मांडत आहेत.
- आ. जयंत पाटील (मा. प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी)
तिकोना गडावर येणं हे भाग्य आहे. दिल्लीश्वरांना ही हिंमत झाली नाही. गडकिल्ले वाचविण्यासाठी शासनाची मदत मिळाली नाही तरी खा. नीलेश लंके हे लोकसहभागातून गडसंवर्धन करत आहेत. या गडाच्या संवर्धनाचा १० कोटींचा प्रस्ताव प्रलंबित आहे. वनविभागाच्या हद्दीतील पायऱ्यांच्या दुरूस्तीसाठी ४० लाखांच्या प्रस्तावासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
- शशीकांत शिंदे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
या मोहिमेत कोणताही पक्ष वा पद नाही. सर्व जाती, धर्माचे तरूण या मोहिमेत सहभागी होत आहे. मुस्लीम समाजाचे १०० हून अधिक मावळे या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गड ही आपली प्रेरणास्थानं आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी सरकारपेक्षा आपणही पावले उचलायला हवीत. या मोहिमेद्वारे गड किल्ल्यांचे महत्व, त्यांचे ऐतिहासिक स्थान, आणि शिवकालीन वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- खासदार नीलेश लंके (लोकसभा सदस्य)
पुढील मोहिम प्रतापगडावर!
या मोहिमेच्या यशानंतर शशिकांत शिंदे यांनी पुढील मोहिम प्रतापगडावर भवानी मातेच्या आशीर्वादाने राबवावी, असे आवाहन खासदार लंके व जयंत पाटील यांना केले.
तारीख : 27-07-2025श्रेणी :राजकारण
हिंजवडी (Hinjewadi) : राजीव गांधी आयटी पार्क (हिंजवडी) परिसरासह माण, म्हाळुंगे, सूस आणि आजूबाजूच्या भागांतील भीषण वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
पुण्यातील आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले की, वाहतूक समस्येचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण, अतिक्रमण हटवणे, मेट्रो प्रकल्पास गती देणे आणि नागरिकांना विश्वासात घेऊन सर्व कामे राबवावी.
या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनायक चौबे, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आणि विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “वाहतूक कोंडी ही केवळ अडचण नाही, तर लोकांच्या रोजच्या जीवनातील एक गंभीर प्रश्न बनली आहे. त्यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण त्वरित हटवावे, खड्डे बुजवावेत, आणि भूसंपादनाची कामे जलद गतीने पूर्ण करावीत.” तसेच नाले, ओढ्यांवरील अतिक्रमण, राडारोडा आणि नैसर्गिक प्रवाह अडवणारे अडथळे तातडीने काढण्याचे आदेशही त्यांनी दिले.
हिंजवडी, माण, वाघोली आणि सुस परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने पायाभूत सुविधांचा विस्तार अत्यावश्यक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वाहतूक, रुग्णालये, शाळा, प्रदूषण नियंत्रण यांसारख्या बाबींचा सखोल विचार करून शहर नियोजन आराखडा तयार करण्यात यावा, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
पुणे मेट्रो लाईन ३, विप्रो सर्कल, डोहलर कंपनी, मारुंजी रस्ता, आणि प्राधिकरण ते आकुर्डी दरम्यान सुरु असलेल्या विविध विकासकामांची पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रकल्प प्रगतीचा आढावा घेत, अधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीची माहितीही घेतली.
पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी या भागात पीएमआरडीएमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांचे PPT सादरीकरण केले. यात रस्ते विकास, पाण्याचे आरक्षण, नदी प्रदूषण नियंत्रण, मलनिस्सारण प्रकल्प यांचा समावेश होता.
अखेर, उपमुख्यमंत्री पवार यांनी नागरिकांना देखील आवाहन केले की, “प्रशासन जबाबदारीने काम करत आहे, त्यामुळे वाहतूक सुधारणा योजनांना नागरिकांनीही सहकार्य करावे.” प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय हेच या समस्येवरचे अंतिम उत्तर असल्याचे त्यांनी नमूद केले.
तारीख : 26-07-2025श्रेणी :राजकारण
पवनानगर (Pawananagar) : शिवकालीन किल्ल्यांचे वैभव पुन्हा उजळवण्याच्या दिशेने एक सशक्त पाऊल उचललं गेलय. येत्या रविवारी, २७ जुलै रोजी तिकोणा किल्ल्याची स्वच्छता व संवर्धन मोहिम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे नेतृत्व अहिल्यानगर दक्षिण लोकसभा सदस्य खासदार नीलेश लंके करणार असून, 'आपला मावळा' आणि 'नीलेश लंके प्रतिष्ठान' या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवरायांच्या किल्ल्यांच्या पुनरुज्जीवनासाठी दरमहा एक मोहिम
खा. लंके यांनी १० मार्च २०२५ रोजी आपल्या वाढदिवशी एक महत्त्वपूर्ण संकल्प केला – दर महिन्याच्या एका रविवारी ऐतिहासिक गडकोटांची स्वच्छता व संवर्धन मोहिम राबवायची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवण्यासाठी, त्यांच्या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. याअंतर्गत मार्चमध्ये शिवनेरी किल्ल्यापासून मोहिमेचा शुभारंभ झाला. एप्रिलमध्ये धर्मवीर गड (श्रीगोंदे), मे महिन्यात, रायरेश्वर गड (भोर), जूनमध्ये रामशेज किल्ला (नाशिक) आणि आता जुलै महिन्यात, मावळमधील ऐतिहासिक तिकोणा किल्ला या मोहिमेच्या केंद्रस्थानी असणार आहे.
तिकोणा किल्ला मोहिमेची रूपरेषा
तारीख: रविवार, २७ जुलै २०२५
वेळ: सकाळी ७ वाजता प्रारंभ सुविधा: नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी वाहन, जेवण-नाश्ता आणि निवासाची सोय प्रमुख पाहुणे: आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
मोहिमेचे उद्दिष्ट: केवळ स्वच्छता नाही, तर इतिहासाची पुनर्स्थापना
या मोहिमेचा उद्देश फक्त किल्ल्यांची साफसफाई करणे नाही, तर गडकोटांचे संवर्धन, पर्यावरण रक्षण, इतिहासाचे जतन आणि तरुण पिढीत शिवप्रेम आणि राष्ट्रप्रेम जागवणे हा या अभियानाचा गाभा आहे.
आ. शशिकांत शिंदेंचा सहभाग
खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमांमध्ये आजवर राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहभाग नोंदविला आहे. तिकोणा किल्ला संवर्धनाच्या मोहिमेमध्ये आता नव्याने प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले आमदार शशिकांत शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत.
तरूण पिढीला इतिहासाशी जोडण्याचा प्रयत्न
दरम्यान, शिवप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि तरुण पिढीचा सहभाग या उपक्रमांमध्ये आतापर्यंत हजारो तरुणांनी आणि शिवप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. गड संवर्धनाच्या माध्यमातून सामाजिक जाणीवा, जबाबदारी आणि पर्यावरणाचं भान तयार होत आहे. हे उपक्रम राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचं मानणाऱ्या खा. लंके यांच्या दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे.