तारीख : 19-07-2023श्रेणी :गुन्हेगारी
तारीख : 27-09-2023श्रेणी :गुन्हेगारी
पवनानगर (Pavananagar) : आकर्षण निर्माण होने नैसर्गिक आहे. मात्र काय चांगले व काय वाईट याचे भान राखावे. भावनेच्या आहारी जाऊ नये. मुलींनी सतर्क रहा, सजग रहा, जपून रहा, असा सल्ला साहित्यिक, लेखिका व कवियत्री प्रा. विजया मारोतकर यांनी पवनानगर येथे दिला.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्या संकल्पनेतून मावळ तालुक्यातील पवनानगर, कार्ला, इंदोरी, कान्हे व तळेगाव दाभाडे येथील १० विविध शाळांमध्ये हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. २६) पवना विद्या मंदिर येथील सभागृहात 'पोरी जरा जपून' या प्रबोधनात्क व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी मारोतकर बोलत होत्या.
मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार व आजच्या तरुण पीढीत वाढलेला मोबाइल इन्टरनेटचा गैरवापर या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुलींनी स्वतःच्या सुरक्षेकरीता कोणकोणत्या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे, समाजातील आपले स्थान व पावित्र्य कसे अबाधित ठेवता येइल, याविषयी माहिती या कार्यक्रमातून प्रा. मारोतकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष राहुल खळदे होते. यावेळी रोटरीचे आंतोष मालपोटे, संदिप मगर, ज्ञानेश्वर दुर्गुडे, काले पोलीस पाटील सिमा यादव, वारु पोलीस पाटील निता शिंदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रा. मारोतकर पुढे म्हणाल्या, समाजात असामाजिक तत्व वाढलेले आहेत. मुली, महिलांवरील होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या बातम्या रोज वाचायला, ऐकायला मिळतात. म्हणून सतर्क रहा, सजग रहा, जपून रहा, असा सल्ला त्यांनी दिला. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे व श्री. डोळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी या विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी हा उपक्रम राबविला आहे. कार्यक्रमाला हजारावर ८ वी १२ वीच्या विद्यार्थ्यांनी व माता, महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, सुत्रसंचालन रोशनी मराडे यांनी केले. वैशाली वराडे यांनी प्रा.मारोतकर परिचय करून दिला. तर आभार संकुलाच्या पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांनी मानले.
व्याख्यानाचे नियोजन खालीलप्रमाणे
▪️ २६/९/२४ - पवना विद्या मंदिर, पवनानगर व प्रगती विद्या मंदिर इंदोरी
▪️ २७/९/२३ - नवीन समर्थ विद्यालय
▪️ मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल सकाळी - १० वाजता
▪️ ॲड. पु वा परांजपे विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे
▪️ स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल - दुपारी १.३० वाजता
▪️ २९/९/२३ - एकविरा विद्या मंदिर, कार्ला सकाळी १० वाजता
▪️ श्री. छत्रपती शिवाजी विद्या मंदिर, कान्हे दुपारी - १.३० वाजता
तारीख : 24-06-2023श्रेणी :गुन्हेगारी
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : शालेय वस्तूंची ठराविक दुकानातून खरेदी करण्यासाठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेचे मावळ तालुका प्रमुख विशाल हुलावळे यांच्या वतीने गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
युवा सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शालेय वस्तूंची ठराविक दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी. तालुक्यातील काही शाळा ठराविक दुकानातूनच शालेय साहित्य व गणवेश खरेदी करण्याची सक्ती करत आहेत. शाळा ज्या दुकांनाकडून साहित्य खरेदी करण्याची सक्ती करत आहे ते दुकानदार आव्वाच्या सव्वा साहित्य व गणवेशाचे दर आकारत असल्याची तक्रार पालक करत आहेत. पालक आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून शाळेने ज्या दुकानातून साहित्य खरेदी करण्यास सांगितले आहे, त्याच दुकानातून आव्वाच्या सव्वा दरात शालेय साहित्य खरेदी करतात. परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा गांभीर्याने विचार करून ज्या शाळा अशी सक्ती करतात त्या शाळांची चौकशी करून कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
तारीख : 29-09-2022श्रेणी :गुन्हेगारी
कामशेत : कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयाबाहेर मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या रोडरोमियोंना खाकीचा हिसका दाखवण्यासाठी कामशेत पोलिसांनी गस्त घातली. पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विद्यालयापर्यंत कामशेत पोलिसांची जणू तटबंदीच होती. शाळा परिसरात पोलीस फौज तैनात करण्यात आली होती.
कामशेत (ता. मावळ) येथील पंडित नेहरू विद्यालय व ज्यु. काॅलेज येथे दुपारी काॅलेज सुटल्यावर काॅलेजचे विद्यार्थी घोळका करून मुलींची छेडछाड करणे, आपापसात भांडणे करणे, मारामारी, वादविवाद तसेच विनापरवाना ट्रीपल सीट बाईकस्वार विद्यार्थी व त्यात त्यांची कट मारण्याची स्टाइल या भर रस्त्यात घडणाऱ्या घटनांचे प्रमाण वाढले होते.
त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना काॅलेजमध्ये येणे अवघड वाटत होते. शिवाय ग्रामीण भागातील पालकांनीही मुलींना काॅलेजला पाठवणे बंद केले होते. याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे यासंबंधी शाळेने पोलीस प्रशासनास कळविले व पोलीस प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेत शाळा परिसरात पोलीसांची फौज तैनात केली. यावेळी पोलीस निरीक्षक जगताप व काॅलेजचे प्राचार्य एस. आर. धावडे यांच्यामध्ये चर्चा झाली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक जगताप यांनी स्वतः उपस्थित राहत तैनात केलेला पोलीस बंदोबस्त पाहता शाळा, काॅलेज सुटल्यावर परिसरातील रोडरोमियोंनी काढता पाय घेतला. परिसरात कुठल्याही प्रकारची गर्दी व गोंधळ नव्हता. वातावरण एकदम शांत होते. त्यामुळे ही कारवाई तात्पुरती असता कामा नये, तसेच या कारवाईमध्ये सातत्य असावे जेणेकरून रोडरोमियोंना कायमस्वरूपीचा चाप बसेल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस नाईक अनिल हिप्परकर, पोलीस कॉन्स्टेबल रविद्र राऊळ, होमगार्ड किसन बोंबले, प्रशांत कटके आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
तारीख : 19-09-2022श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा : लोणावळा शहर पोलीसांनी शालेय भागात भरारी पथक नेमून गस्त घालावी. दोन दिवसांपुर्वी व्ही.पी.एस. विद्यालय येथे शालेय आवारात झालेली विद्यार्थ्यांची हाणामारी ही निंदनीय असून यामुळे शाळेचे नाव होत आहे. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी पोलीसांनी शालेय भागात गस्त घालावी, अशी मागणी भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ व भाजपा युवा मोर्चा लोणावळा शहरच्या वतीने आज सोमवार (दि.१९) रोजी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सीताराम दुबल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, लोणावळा शहरातीत व्ही.पी.एस. विद्यालय येथे दोन दिवसांपुर्वी शालेय आवारात मुलांची हाणामारीचा प्रकार घडला होता, हा घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून अशा प्रकारामुळे शाळेचे नाव बदनाम होत आहे. व्हि.पी.एस. विद्यालय ही संस्था आतिशय नामांकित असून या शाळेतुन दर्जेदार शिक्षण प्रणालीमुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर व प्रतिष्ठित नागरिक घडवले आहेत.
त्यामुळे सदर, गैरप्रकारामुळे शाळेचे होणारी अवहेलना थांबावी व पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी लोणावळा शहर पोलीस ठाण्यामार्फत शालेय भागात भरारी पथक नेमून गस्त घालावी, अशी मागणी भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ व भाजपा युवा मोर्चा लोणावळा शहरच्या वतीने लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सीताराम दुबल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
तारीख : 10-08-2022श्रेणी :गुन्हेगारी
पवनानगर : कोथुर्णे येथील निर्भयाच्या न्यायालयीन लढ्यासाठी मावळ तालुक्यातील शिक्षकांच्या एक हात मदतीचा देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघ व सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने निर्भयाच्या पालकांना न्यायालयीन लढयाला बळ मिळण्यासाठी मदत नव्हे तर कर्तव्य समजून १ लाख ७१ हजार ५५६ रुपयांचा धनादेश देण्यात आला. एक सामाजिक बांधिलकीतून शिक्षकांनी निधी उभारून एका कुटुंबाला न्यायालयीन लढ्यासाठी मदत म्हणून जे योगदान दिले, त्यातून मावळ तालुक्यातील शिक्षकांचे एक वेगळे रूप या निमित्ताने पहावयास मिळत आहे.
कोथुर्णे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या ७ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण खून करण्यात आला. या दुर्दैवी घटनेनंतर मावळ तालुक्यासह पुणे जिल्हा हदरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर या घटनेतील त्या नराधम आरोपीला फाशी व्हावी यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी निषेध मोर्चे, कँडल मार्च काढण्यात आले. आरोपीला फाशीच व्हावी अशी मावळच्या जनतेची मागणी आहे आणि म्हणूनच या लढ्यात तिच्या पालकांना आर्थिक मदतीची गरज आहे.
त्यामुळे मदत नव्हे तर कर्तव्य या भावनेतून मावळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघ व सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने निर्भयाच्या पालकांना न्यायालयीन लढयाला बळ मिळण्यासाठी १ लाख ७१ हजार ५५६ रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी स्वराला तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात आली. तसेच पुन्हा असा दुर्दैवी प्रकार घडू नये अशा प्रकारची अपेक्षा यावेळी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी सुहास विटे, राजेश राऊत, राजू भेगडे, गणेश कदम, हरिभाऊ आडकर, ज्ञानेश्वर शिवणेकर, नीतीन वाघमारे, संतोष भारती, अजित मोरे, संजय ठुले, योगेश ठोसर, संदीप आडकर, विलास मोरे, नारायण गायकवाड, संतोष राणे, सुनिल शेडगे, गोरख जांभूळकर, मधुकर दळवी, नवनाथ दळवी, धोंडीबा घारे, भाग्यश्री विटे, वंदना भालेराव आदी शिक्षक बंधू भगिनी या दुख:द प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.