whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Lonavala Pune Local : लोणावळा–पुणे लोकलच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांचा त्रास वाढला; रेल्वेकडे अर्ध्या तासाला लोकल सुरू करण्याची मागणी

तारीख : 27-05-2026श्रेणी :महाराष्ट्र

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : लोणावळा ते पुणे या मार्गावर दररोज उद्योग, नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक प्रवास करत असताना लोकलच्या मर्यादित फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता लोणावळा–पुणे लोकलच्या फेऱ्या तातडीने वाढवाव्यात, अशी मागणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


१७ स्थानकांवरील प्रवाशांचा प्रश्न ऐरणीवर


लोणावळा ते पुणे या लोकल मार्गावर सुमारे १७ स्थानके असून मावळ, तळेगाव, आकुर्डी, चिंचवड, दापोडी, खडकी आणि शिवाजीनगर परिसरातील हजारो प्रवासी या सेवेवर अवलंबून आहेत. मात्र लोकलच्या कमी फेऱ्यांमुळे अनेक नागरिकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


खासगी वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि इंधनाचा वाढता वापर


लोकलची सुविधा पुरेशी नसल्याने अनेक नागरिक चारचाकी वाहनातून प्रवास करत आहेत. त्यामुळे पुणे–लोणावळा महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनत असल्याचे सांगण्यात आले. दररोज लाखो नागरिक या मार्गावर खासगी वाहनांचा वापर करत असल्याने इंधनाचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.


अर्ध्या तासाला लोकल’ची मागणी


लोणावळा–पुणे मार्गावर अर्ध्या तासाच्या अंतराने लोकल सेवा उपलब्ध झाली, तर हजारो नागरिक रेल्वेकडे वळतील आणि रस्त्यावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा दावा सुरेश चौधरी यांनी केला आहे. यामुळे पर्यावरण संरक्षणासह इंधन बचतीलाही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.


विद्यार्थी, कामगार आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार


या मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, कामगार आणि नोकरदार वर्गाला वाढीव लोकल फेऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले. वेळेची बचत, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास तसेच वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळण्यासाठी लोकल सेवा वाढवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


रेल्वे सुधारणा घोषणेची करून दिली आठवण


राज्याच्या अर्थसंकल्पात लोणावळा ते पुणे रेल्वेमार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या सुधारणा आणि रेल्वे सेवा वाढविण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या घोषणेची आठवण करून देत संबंधित कामांना गती द्यावी आणि प्रवाशांच्या दैनंदिन समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

whatsapp

Vadgaon News : वडगावात शासन आपल्या दारी उपक्रम! एका शिबिरात १५ पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध

तारीख : 16-05-2026श्रेणी :महाराष्ट्र

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी आणि कमी वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी तहसील कार्यालय मावळ आणि वडगाव नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृह येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच नागरिकांनी शिबिरात मोठी गर्दी करत विविध सेवांचा लाभ घेतला.


महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राज्यभर मंडळ स्तरावर हे विशेष शिबिर राबविण्यात येत असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन महसुली प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यावर भर देण्यात येत आहे.


शिबिरामध्ये जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, झोन दाखले, मालमत्ता कर उतारा, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ उताऱ्यातील नाव दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उतारे, उत्पन्न दाखले, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगी, ई-मोजणी अर्ज, पीएम किसान नोंदणी, सामाजिक अर्थसहाय्य योजना, विद्यार्थ्यांसाठी दाखले वितरण अशा १५ पेक्षा अधिक सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या.


तसेच घरांसाठी पट्टे वाटप, भूसंपादन आणि अकृषिक प्रकरणातील ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याचे कामही शिबिरात करण्यात आले. रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि आधार कार्ड संदर्भातील विविध कामकाजासाठीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.


या शिबिरास तहसीलदार विक्रम देशमुख, नगराध्यक्षा अबोली ढोरे आणि मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.


शिबिरात वडगाव शहरातील आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, पत्रकार, महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असून प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

whatsapp

Pune News : मतदार यादीत मोठे बदल होणार? पुण्यात १९ मे रोजी सर्व पक्षांची महत्त्वाची बैठक

तारीख : 16-05-2026श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पुणे (Pune) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR 2026) मोहिमेच्या तयारीला आता वेग आला आहे. महाराष्ट्रासह देशातील १९ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असून पुणे जिल्ह्यात यासंदर्भात १९ मे रोजी सर्व राजकीय पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.


महाराष्ट्रात ही विशेष पुनरिक्षण मोहीम २० जून २०२६ पासून सुरू होणार असून मतदार याद्यांमधील नावे, पत्ते, मृत मतदारांची नोंद, नवीन मतदारांची भर आणि दुबार नावे हटविण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे.


या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आवश्यक तयारी, जनजागृती आणि प्रशासकीय नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.


ही बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, १९ मे रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात पार पडणार आहे.


बैठकीत विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचे वेळापत्रक, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे कामकाज, मतदारांमध्ये जनजागृती कशी वाढवायची, तसेच राजकीय पक्षांच्या सहभागातून प्रक्रिया अधिक पारदर्शक कशी करता येईल यावर चर्चा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.


उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


निवडणूक आयोगाच्या या मोहिमेमुळे आगामी निवडणुकांपूर्वी मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे स्पष्ट होत आहे.

whatsapp

CET Exam : एका वर्षात दोन संधी! महाराष्ट्रातील CET पद्धतीत मोठा बदल

तारीख : 16-05-2026श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पुणे (Pune) : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षा आता पारंपरिक वेळापत्रकापेक्षा तब्बल चार महिने आधी घेतली जाणार आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी तसेच एमबीए प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षा पुढील शैक्षणिक वर्षापासून १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


केंद्रीय पातळीवरील जेईई (JEE) परीक्षेच्या धर्तीवर हा बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यामागे परीक्षेचा ताण कमी करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.


आतापर्यंत एमएचटी-सीईटी परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होत होती. मात्र, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक बदलणार आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये पहिला टप्पा पार पडणार असल्याने विद्यार्थ्यांना स्वतःच्या तयारीचे मूल्यमापन लवकर करता येणार आहे.


राज्य सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रयत्नात अपेक्षित गुण न मिळाल्यास विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी होऊन स्पर्धात्मक परीक्षांसाठी अधिक नियोजनबद्ध तयारी करता येईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.


दरम्यान, शिक्षणशास्त्राशी संबंधित अभ्यासक्रमांसाठीही मोठा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत बीएड, बीपीएड आणि बीएड-एमएड (एकात्मिक) अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जात होती. मात्र पुढील वर्षापासून या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी एकच सामायिक सीईटी परीक्षा होणार आहे.


यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, परीक्षा शुल्क आणि तयारीवरील अतिरिक्त ताण कमी होणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.


राज्यातील स्पर्धा परीक्षा पद्धतीत होत असलेल्या या बदलामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी नव्या वेळापत्रकानुसार अभ्यासाचे नियोजन करण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर उभे राहणार आहे.

whatsapp

Maharashtra : महाराष्ट्रातील ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा; मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिम

तारीख : 15-05-2026श्रेणी :महाराष्ट्र

feature image

प्रजावार्ता : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या मोहिमेद्वारे राज्यातील तब्बल ९ कोटी ८६ लाखांहून अधिक मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार असून निवडणूक यंत्रणा थेट नागरिकांच्या घरी पोहोचणार आहे.


देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.


या प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन नाव, पत्ता, कुटुंबीयांची माहिती आणि इतर तपशीलांची खातरजमा करणार आहेत. राज्यातील एकूण ९,८६,४४,४१३ मतदारांची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.


विशेष म्हणजे, या मोहिमेत राजकीय पक्षांचाही सहभाग असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षांकडून नियुक्त केलेले बूथ लेव्हल एजंट (BLA) या प्रक्रियेत सहकार्य करतील. त्यामुळे मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे किंवा चुकीच्या नोंदी शोधून त्यामध्ये दुरुस्ती करण्यास मदत होणार आहे.


सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाशी समन्वय साधून या मोहिमेचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. जून महिन्यापासून सुरू होणारी ही प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे.


महाराष्ट्रातील महत्त्वाचे वेळापत्रक :
    •    २० ते २९ जून २०२६ : बीएलओ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि पूर्वतयारी
    •    ३० जून ते २९ जुलै २०२६ : घरोघरी जाऊन माहिती संकलन व पडताळणी
    •    ५ ऑगस्ट २०२६ : मसुदा मतदार यादी प्रसिद्ध
    •    ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ : दावे व हरकती नोंदविण्याची मुदत
    •    ७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी जाहीर


निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम एजंट नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. नव्या पात्र मतदारांची नोंदणी, स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणे आणि चुकीच्या नोंदी हटवणे या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.


लोकशाही प्रक्रियेत अचूक मतदार यादी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे नागरिकांनीही घरपोच येणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

whatsapp