तारीख : 05-04-2023श्रेणी :देश
तारीख : 12-01-2024श्रेणी :देश
पुणे (Pune) : स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२३ मध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात सासवडने देशात पहिले तर लोणावळा शहराने देशात तिसरे स्थान पटकावले आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुरस्कारप्राप्त नगरपरिषदा आणि महानगरपालिकांचे अभिनंदन केले आहे.
नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे झालेल्या सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज यांनी स्वीकारला. पुणे जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वीकारला.
राष्ट्रीय स्तरावरील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुरस्कारांपैकी तीन पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले असून यात सासवड नगरपालिका तसेच लोणावळा नगर परिषदांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सातत्याने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील स्वच्छते संदर्भातील प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत यावर विशेष भर दिला आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा स्वच्छता तसेच अन्य नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या पूर्ततेकडे विशेष लक्ष देत आहेत.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरांना क्रमांकांसह फाईव्ह स्टार मानांकने
याव्यतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवडमध्ये स्वच्छतेसह एसटीपी उभारणी, शहर व नदी किनारा सौंदर्यीकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटीकरण, यंत्रणांचे आधुनिकीकरण, जलव्यवस्थापन आदी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
त्याची दखल घेत पुणे महानगरपालिकेला फाईव्ह स्टार मानांकनासह स्वच्छतेत १० वा क्रमांक तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला फाईव्ह स्टार मानांकन आणि वॉटरप्लस मानांकनासह स्वच्छतेत १३ वा क्रमांक मिळाला आहे.
एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्वच्छतेच्या मानांकन प्राप्त प्रथम १० शहरांपैकी आठ शहरे महाराष्ट्रातील असून यामध्ये सासवड, लोणावळासह अन्य शहरांचा समावेश आहे.
पालकमंत्र्यांकडून नागरिकांचे अभिनंदन
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या या यशाबद्दल लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत विशेष कामगिरी केली असून त्यामुळे राज्याच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशात नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे. या कामगिरीत सातत्य ठेवले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तारीख : 28-11-2023श्रेणी :देश
लोणावळा (Lonavala) : भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु या उद्या (बुधवार दि. २९ नोव्हेंबर) लोणावळा (ता. मावळ) दौऱ्यावर असणार आहेत. लोणावळा येथील कैवल्यधाम योगा केंद्र येथे भेट देऊन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून पोलीस विभागाकडून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय शहरात कलम १४४ देखील लागू करत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
राष्ट्रपती मुर्मु या आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम योगा केंद्र येथे नियोजित कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम या मार्गावरील वाहतूक दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी आदेश पारित केला आहे.
शहर व परिसरात ड्रोन कॅमेरा किंवा तत्सम उपकरणाचा छायाचित्रासाठी वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुट्टे पेट्रोल घेऊन जाणे, स्फोटक पदार्थ घेऊन जाणे, फटाके वाजविणे या गोष्टींना प्रतिबंध घालण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी कलम १८८ प्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी आदेशात म्हटले आहे.
दरम्यानच्या काळात संपूर्ण रस्ता व त्याबाजुला असलेली अतिक्रमणे व रस्त्यावरील अडथळे हटविण्यात आले आहेत. आज दिवसभर या मार्गावर पोलीस विभागाकडून मॉकड्रिल घेण्यात आले. यासाठी काही काळ रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच परिसरात नेटवर्क जॅमर देखील लावण्यात आले होते. सुरक्षेचा मोठा प्रोटोकॉल असल्यामुळे प्रशासन हाय अलर्ट मोडवर आले आहे
वाहतूक निर्बंध लादल्यामुळे पर्यायी मार्ग -
▪️पुणे बाजुकडून एक्सप्रेस वे वरुन येणारी वाहने ही लोणावळा येथे न येता एक्सप्रेस वे ने मुंबईकडे जातील. तसेच पुण्याकडून जुन्या हायवे ने येणारी वाहने ही कुसगाव टोलनाका येथून एक्सप्रेस वे ने मुंबई बाजुकडे जातील.
▪️मुंबई बाजुकडून एक्सप्रेस वे ने येणारी वाहतूक ही खंडाळा एक्झीट येथून खाली न उतरता पुणे बाजुकडे सरळ जातील. तसेच लोणावळा एक्झीटने खाली येऊन पुणे बाजुकडे जातील.
▪️लोणावळा शहरातील वाहन धारकांनी सदर वेळेत आपली वाहने शक्यतो आणू नये.
▪️ड्रोन, पॅराग्लायडींग तसेच एअर बलून असे लोणावळा शहर व परीसरात उड्डाणास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
तारीख : 22-11-2023श्रेणी :देश
पुणे (Pune) : आपल्या पूर्वजांनी संविधानाचा स्वीकार केला. मीही संविधानाचा स्वीकार करतो. पण त्याच संविधानात आतापर्यंत १२५ वेळा घटनादुरुस्ती झाली. त्यामुळे आणखी एकदा हिंदूराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती झाली तर त्यात वाईट काय?. पण सगळ्यात आधी आम्हाला लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन करायचं आहे. लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन झालं की मग संविधानातही हिंदूराष्ट्र होईल, असे वक्तव्य बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी केले. सोमवारी (२० नोव्हेंबर) पुणे येथे आयोजित सत्संग आणि दरबार कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी घटनादुरुस्तीची मागणी केली.
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग आणि दरबार कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात बुधवारपर्यंत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पुण्यातील विविध पुरोगामी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. धीरेंद्र शास्त्री हे सत्संग आणि दरबारच्या माध्यमातून अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनात्मक तरतुदींविरोधी भाष्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी वक्तव्ये, कृती आणि दावे करत असतात, असा दावा अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केला आहे. अंनिसने याप्रकरणी कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत हिंदूराष्ट्राची स्थापना झाल्यास देशातील मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचं? असा प्रश्न विचारला असता धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “त्यांना कुठे पळण्याची गरज नाही. रामराज्यात सर्व धर्माचे लोक राहत होते. रामराज्याच्या स्थापनेनंतर मुस्लीम किंवा ख्रिश्चनांना कुठेही पळून जाण्याची गरज नाही. हेच आम्हाला लोकांना समजावून सांगायचं आहे. रामराज्याचा अर्थ सामाजिक समरसता आहे.
हिंदूराष्ट्र म्हणजे सगळ्यांमध्ये एकता… हिंदूराष्ट्र म्हणजे तुम्ही आमच्या प्रभू श्रीरामाच्या यात्रेवर दगड फेकायचा नाही… हिंदूराष्ट्र म्हणजे पालघरमध्ये संतांबरोबर जे घडलं ते तुम्ही पुन्हा करणार नाही. कुणालाही पळून जाण्याची आवश्यकता नाही. पण तुमच्या मनात काही पाप असेल, तुम्ही पालघर हत्याकांडातील मारेकरी असाल, तुम्ही राम यात्रेवर दगड फेकणारे असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल.”
तारीख : 15-11-2023श्रेणी :देश
प्रजावार्ता : सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७५ वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. 'सहारा' प्रमुख सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांचे पार्थिव लखनौमधील सहारा शहरात आणले जाईल, जिथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. सुब्रत रॉय यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. भारतीय कॉर्पोरेट जगतात त्यांनी आपली वेगळी छाप सोडली होती.
सुब्रत रॉय यांचा जन्म बिहारमधील अररिया येथे एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणी ते नेहमीच हुशार विद्यार्थी म्हणून गणले जात होते. त्यांनी गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केला. सहारा समूहाची स्थापना करण्यापूर्वी, त्यांना रिअल इस्टेट व्यवसायात १८ वर्षे काम केले. त्याशिवाय, बिझनेस डेव्हलपमेंटचा ३२ वर्षांचा अनुभव होता. त्यांनी स्वप्ना रॉयशी लग्न केले आहे. त्यांना २ मुले आहेत, सुशांतो रॉय जे कंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सीमंतो रॉय हे कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत.
सुब्रत रॉय सहारा यांचा जन्म १० जून १९४८ रोजी झाला. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात 'सहरश्री' म्हणूनही ओळखले जात होते. समाजवादी पक्षाने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून श्री सुब्रत रॉय यांच्या निधनाने दु:ख झाल्याचे म्हटले आहे. अतिशय दु: खी. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. भावपूर्ण श्रद्धांजली.
अनेक व्यवसायात आघाडीचा ब्रॅण्ड, ११ लाख लोकांना रोजगार
सुब्रत रॉय यांच्या नेतृत्वातील सहारा समुहाने विविध उद्योग-व्यवसायात हात आजमावला. सहारा समुहाकडे आयपीएलची पुणे फ्रँचायझी होती आणि फॉर्म्युला वन रेसिंग टीम फोर्स इंडियामध्ये त्यांचा महत्त्वाचा हिस्सा होता. ९० हजार कोटी रुपयांच्या नियोजित गुंतवणुकीसह देशभरात ६० हून अधिक आलिशान टाउनशिप विकसित करण्याची समूहाची योजना होती. अनेक टाउनशिपसाठी भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास संपली होती. या समूहाने सुमारे ११ लाख लोकांना रोजगार दिला आणि रिअल इस्टेट, वित्तीय सेवा, विमा, मीडिया आणि मनोरंजन, क्रीडा आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांची उपस्थिती होती. बॉलीवूड तारे आणि प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्व सहाराच्या बहुतेक कार्यक्रमांना नियमित उपस्थित होते.
राजकीय संबंधांची चर्चा
सुब्रत रॉय यांचे समाजवादी पक्षाचे अमर सिंह आणि मुलायमसिंह यादव यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. त्यांच्याशी असलेल्या संबंधाने सुब्रत रॉय यांना फायदा होत असल्याच्या चर्चा होत असे. मात्र, रॉय यांचे जवळपास सर्वच राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंध होते. भारतीय कॉर्पोरेट जगतात त्यांनी आपली वेगळी छाप सोडली होती.
सेबीची कारवाई आणि सहाराला ग्रहण
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सोबत दीर्घ कायदेशीर लढाईनंतर गुंतवणूकदारांविरुद्ध कथित फसवणूक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहारा प्रमुखांना त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांसह तुरुंगात टाकण्यात आले. ४ मार्च २०१४ रोजी त्याची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. रॉय हे पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आले होते. सुब्रत रॉय यांना व्याजासह गुंतवणूकदारांना २० हजार कोटी रुपये परत करण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडे भारतात आणि परदेशात अनेक स्थावर मालमत्ता आहेत.
सुब्रत रॉय यांच्यावर त्यांच्या गुंतवणूकदारांनी दिलेले पैसे परत न केल्याचा आरोप होता. यामुळे SEBI ने त्याच्यावर कारवाई केली आणि २० दशलक्ष डॉलर्सचा परतावा हा त्यांच्यासमोर अडचणीचा ठरला. यानंतर रॉय कुटुंबासाठी अनेक संकटांची मालिका सुरू झाली. रॉय यांना तुरुंगात जावे लागले आणि त्यांच्या व्यवसायालाही फटका बसला.
तारीख : 13-11-2023श्रेणी :देश
प्रजावार्ता : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाची जेजुरी भंडाऱ्यानं न्हाऊन निघाली आहे. आज जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा असून, यळकोट यळकोटचा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक खंडेरायाच्या जेजुरीत दाखल झाले आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. कऱ्हा नदीवर देवाचा पालखी सोहळा स्नानासाठी आल्यानंतर भाविकांसाठी पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच महाप्रसादाचे नियोजन देखील करण्यात आलं आहे. राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.
जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा आज १३ नोव्हेंबरला भरली आहे. सकाळी ७ च्या सुमारास खंडोबा गडावरुन हा पालखी सोहळा सुरू झाला आहे. दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तीचं कर्हा नदीवर स्नान सोहळा संपन्न होणार आहे. या यात्रेसाठी राज्यभरातून जेजुरी गडावर अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजनाही करण्यात आलेल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी सोमवती यात्रेच्या नियोजनाबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खांदेकरांना विशिष्ट ड्रेसकोड देण्यात आला आहे. तसेच, पालखी सोहळ्यातील भाविकांना चहा, पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवती यात्रेनिमित्त वाहतुकीतही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
जेजुरीत सोमवती यात्रेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल
खंडेरायाच्या सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीत वाहतुकीत अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत. यासंदर्भात पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून ट्वीट करत माहिती देण्यात आलेली आहे. ट्वीटमध्ये म्हटलंय की, "जेजुरीत श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त (दि. १३) वाहतूक बदल करण्यात आला आहे. वाहन चालकांनी १३ नोव्हेंबर पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करावा." असं आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलानं ट्वीटमध्ये सांगितल्यानुसार, "बारामती आणि निरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. संबंधित वाहनं मोरगाव-सुपा- केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गवरून पुणे मार्गे वळविण्यात येणार आहे." तसेच, "पुणे बाजुकडून जेजुरी मार्गे फलटण- सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद केली जाणार आहे. संबंधित वाहतूक सासवड- नारायणपुर- कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड- वीर फाटा-परींचे वीर-वाठार मार्गे लोणंद मागे वळविण्यात येणार आहे."