तारीख : 23-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
तारीख : 28-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : गेल्या चार वर्षांपासून लोणावळ्यातील सुप्रसिद्ध डॉ. खंडेलवाल यांच्या घरावर सातत्याने दरोड्याची घटना घडत असून याहीवर्षी चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याला लक्ष केले. मंगळवारी (दि. २७) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकून तब्बल साडेअकरा लाखांचा मुद्देमाल चोरून नेला.
चौथ्यांदा त्यांच्या बंगल्यात चोरट्यांनी हातसफाई केल्यामुळे कुटुंबियांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे सहिसलामत पसार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून सुप्रसिद्ध ज्येष्ठ डॉ. हिरालाल खंडेलवाल हे प्रधान पार्क येथील त्यांच्या ॐ श्री बंगल्यावर वास्तव्यास आहे. मंगळवारी (दि. २७) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी लोखंडी ग्रीलसह जवळपास पाच ते सहा दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. बंगल्याच्या वॉचमन आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून दोरीने बांधले. त्यानंतर डॉ. खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीला हातपाय बांधून, तलवार, कुकरी, दांडके दाखवून जीवे मारण्याची धमकी देत घरातील सोन्याचे, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ११.५० लाख रुपयांचा ऐवज लुटला.
दरम्यान, हा दरोडा सुरू असताना, डॉ. खंडेलवाल यांच्या पुतण्याने लोणावळा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी बंगल्यातून बाहेर पडलेले दरोडेखोर आणि पोलिसांची गाडी यांच्यात फक्त ५ ते १० फुटांचे अंतर होते. पोलिसांनी काही अंतर दरोडेखोरांचा पाठलागही केला, परंतु एकही दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागला नाही. उपस्थित पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे सहिसलामत पसार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तारीख : 28-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : दोन दिवसांपूर्वी फोनवर झालेल्या वादातून विधिसंघर्षित बालकांकडून दोघांवर धारदार शस्त्रांचे वार करत दगडफेक करण्यात आली. रविवारी (दि. २७ मे) रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील इंद्रायणी हॉटेल समोर, तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे ही घटना घडली.
याप्रकरणी विधीसंघर्षीत बालक (रा. शिंदे वस्ती सोमाटणे फाटा, ता. मावळ) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विधीसंघर्षीत बालक व त्याचे ३ मित्र सर्वांचे वय (अंदाजे १६ ते १७ वर्ष) यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व विधीसंघर्षीत बालके यांच्यात दोन दिवसांपूर्वी फोनवर वाद झाला. त्याच वादाच्या रागातून आरोपी हर्षल व त्याचे ३ मित्र सर्वांचे वय (अंदाजे १६ ते १७) यांनी इंद्रायणी हॉटेल समोर येऊन फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु फिर्यादीने डोक्याजवळ हात अडवा केल्याने फिर्यादीच्या हाताला दुखापत झाली. तसेच फिर्यादी व त्याचा मित्र आदित्य अमर कोळी याच्यावर देखील धारदार शस्त्राने वार करून त्याला जखमी केले. तसेच आरोपीसोबतच्या तिघांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला हाताने मारहाण करून शिवीगाळ करून तसेच दगड फेकुन जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
तारीख : 23-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : चारित्र्याच्या संशयातून थेट पत्नीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज (शुक्रवार दि. २३) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोंडीवडे (आंदर मावळ) येथे ही घटना घडली.
सोनाबाई अशोक वाघमारे (वय ३३, रा. कोंडिवडे, ता. मावळ) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी मारूती काळुराम पवार (वय ५०, रा. कोंडीवडे आ. मा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पती अशोक बारकु वाघमारे (रा. कोंडीवडे ता. मावळ) यांच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक वाघमारे हा आपल्या मयत पत्नीवर संशय घेवून नेहमीच शिवागाळ व मारहाण करत असे. आज (दि. २३ मे) रोजी आरोपी व मयत सोनाबाई हे मासेमारी करण्यासाठी जात असताना सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी कोंडीवडे (अ.मा) ता. मावळ गावच्या हद्दीतील फॉरेस्टच्या ओढयामध्ये मयत सोनाबाई हिच्या डोक्यात, कपाळावर दगडाने किंवा कशाने तरी जबर मारहाण करून तिला जिवे ठार मारलेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निराक्षक डोईजड हे करीत आहेत.
तारीख : 23-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : नामांकित कंपनीच्या नावाने त्यांची परवानगी न घेता फर्स्ट कॉपी कपडे तयार करून विक्री करणे दुकानदारांना चांगलेच भोवले आहे. पुमा कंपनीच्या फिल्ड ऑफिसरने केलेल्या पाहणीत आढळलेल्या तळेगावातील सहा दुकानदारांवर कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी (दि. २१ मे) रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी महेंद्र साहेन सिंग (वय ३६, फिल्ड आफिसर, इलुडिक्सन अडोकेट अॅन्ड सॉलिसीटरस फर्म न्यु दिल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ब्रँड हब दुकानाचे मालक अमर शाम चव्हाण (वय २९, रा काळोखवाडी तळेगाव दाभाडे), छत्रपती मेन्स अटायर दुकानाचे मालक प्रसाद नवनाथ कुल (वय २९, रा. डोळसनाथ कॉलनी), एच. पी. क्लॉथ स्टोअरचे मालक हितेश उदयसिंग परदेशी (वय ३२, रा. साई समर्थनगर, तळेगाव दाभाडे), आउट लुक मेन्स वेअरचे मालक सौरव रोहीदार उबाळे (वय २५, रा. इंदोरी), जयश्री एन एक्सचे मालक हरिष मोतीराम देवासी (वय २५, रा. कृष्णा आकार सोसायटी, तळेगाव दाभाडे), आणि लिमीटेड एडिशन व सेंकन्ड स्किनचे मालक शशांक दिपक जैन (वय ३०, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपींनी तळेगाव दाभाडे हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ब्रँड हब, छत्रपती मेन्स अटायर, एच. पी. क्लॉथ स्टोअर, आउट लुक मेन्स वेअर, जयश्री एन एक्स, लिमीटेड एडिशन व सेंकन्ड स्किन यांनी पुमा कंपनीचा मालकी हक्क असलेल्या प्रोडक्टचे विहीत परवान्याशिवाय उत्पादन करणे किंवा बनावटी तयार करून, त्याचा साठा करुन ते ग्राहकांना पुमा कंपनीचे मुळ उत्पादन असल्याचे भासवुन विक्री करताना मिळुन आल्याच्र फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
तारीख : 15-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
पवनानगर (Pawnanagar) : पवन मावळ परिसरामध्ये बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश करण्यात आला. वनविभागाने तिकोना गावच्या हद्दीत केलेल्या तत्परतेच्या कारवाईमध्ये शिकारीसाठी लागणारी शस्त्रास्त्रे व शिकार केलेल्या वन्यजीवांचे ५२ किलो मांस जप्त करण्यात आले. यासह आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली.
सुखमित हरमित सिंग भुतालिया (वय २६, रा. तिकोणा गाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम ९ व ५१ अंतर्गत वनगुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि १३ मे) मावळ तालुक्यातील तिकोणा गाव येथे "सिंग बंगल्यावर' वनविभागाने अचानक धाड टाकली. आरोपी भुतालिया याच्याकडून सुमारे ५२ किलो संशयित वन्यप्राण्याचे मांस, दोन शस्त्रास्त्रे, जिवंत व वापरलेली काडतुसे आणि शिकारी व सोलण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वनसंरक्षक मंगेश टाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, देवले वनपाल सीमा पलोडकर, खंडाळा वनपाल गणेश मेहत्रे, चावसर वनरक्षक संदीप अरुण आणि वनरक्षक शेळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, वनविभागाने सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, बेकायदेशीर शिकार किंवा वन्यजीव व्यापारासंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ जवळच्या वनकार्यालयात किंवा हेल्पलाइनवर माहिती द्यावी. वन्यजीव आणि जिंगलांचे संरक्षण ही आपल्या सर्वाची सामूहिक जबाबदारी आहे.