तारीख : 03-06-2025श्रेणी :गुन्हेगारी
तारीख : 03-06-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : मावळ तालुक्यात जमीन व्यवहारात झालेली फसवणूक ही काय नवीन घटना नाही. अनेकवेळा जमीन व्यवहारात अडकलेल्या आरोपींचे न्यान्यालयाने जामीनही फेटाळले आहेत. आता अशाच एका जमीन व्यवहारात मावळातील एक बडा नेता चांगलाच अडकल्याची बातमी समोर आली आहे. मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाचे तालुकाध्यक्ष यांच्यावर जमीन व्यवहाराबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
यशवंत रावजी मोहोळ (रा. तिकोना, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या तालुकाध्यक्षाचे नाव आहे. याप्रकरणी सुनील दिनदयाल गुप्ता (वय ५३, रा. भांगरवाडी, लोणावळा) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुकाध्यक्ष मोहोळ यांनी फिर्यादीची फसवणुक करण्याच्या उद्देशाने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या स्वतःच्या नावावर असलेली जमीन न दाखवता ठक्कर नावाच्या व्यक्तीच्या मालकीची पवना डॅम व्हीव व रस्त्यालगत असलेली जमीन दाखवली. व्यवहार करून फिर्यादीला दिलेल्या जमिनीच्या खरेदीखतात दाखवलेल्या चर्तुः सिमा व नकाशाप्रमाणे जमीन दिल्याचे भासवले. प्रत्यक्षात मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन दाखवून त्यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणुक केली. तसेच खरेदीखतात दिलेली जागा ही देखील फिर्यादीच्या आधी नथु केदारी (रा. अजिवली, ता. मावळ) यांना विसार पावतीद्वारे विकण्याचा प्रयत्न केला.
याबाबत फिर्यादी हे मोहोळ यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून ते राजकीय पक्षाचे नेते असल्याचे सांगून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे करत आहेत.
तारीख : 31-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : लोणावळा शहराजवळील वलवन धरणात बुडून एका सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सदर मुलाचा मृतदेह शिवदुर्ग मित्र, लोणावळा रेस्क्यू पथकाच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
निलेश शिंदे (वय अंदाजे १७, रा. कासारवाडी, पुणे) पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. आपल्या १२ मित्रांबरोबर तो लोणावळा परिसर फिरण्यासाठी आला होता. त्यासाठी ते वरसोली येथून वलवण धरणाच्या मागील बाजूला गेले. आणि पोहण्याचा मोह अनावर झाल्याने ते पाण्यात उतरले परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने निलेश याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.
घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथक सर्व साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाणबुडीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवत मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील वैभव दुर्गे, योगेश दळवी, मयूर दळवी, सागर दळवी, कपिल दळवी, आकाश मोरे, रोहित मोरे, महेश मसने, कुणाल कडू, महादेव भवर, पिंटू मानकर, सतीश सगर, सुनील गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
तारीख : 31-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
कामशेत (Kamshet) : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पिकअपची पंक्चर काढणाऱ्या दोघांना भरधाव मिक्सरने चिरडल्याची घटना घडली. आज (शनिवार दि. ३१) रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास किमी ६७/७०० ताजे (ता. मावळ) गावच्या हद्दीत हा अपघात घडला. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून मिक्सर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय कन्हैयालाल यादव (वय २५, वर्षे रा. मुंबई, कुर्ला गार्डन) आणि अफजल मुर्तुजा खान (वय ३९, रा. बजुरामपुर उत्तरप्रदेश) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पिकअपचालक राकेशकुमार नेतप्रसाद यादव (वय ३१, कुर्ला गार्डन मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक लेलंड कंपनीचा मिक्सर (MH 46 BS 5697) वरील चालक राजेश यादव (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांची ताब्यातील पिकअप टेम्पो (MH 01 DR 7567) हा ताजे (ता. मावळ) गावच्या हद्दीत पंक्चर झाला. फिर्यादीने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा करून त्यांचे दोन सहायक अजय व अफजल पंक्चर काढत होते तर फिर्यादी हे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना दूर राहण्यासाठी इशारा करत होते. मात्र यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अशोक लेलंड (सिमेंट काँक्रीट मिक्सर) टेम्पोवरील चालकाने फिर्यादीच्या चेतावणी इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून फिर्यादीच्या पिकअपला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात पिकअपच्या उजव्या बाजुला चाक खोलत असलेल्या अजय कन्हैयालाला यादव आणि अफजल मुर्तुजा खान या दोघांना ट्रकने चाकाखाली फरफटत चिरडत घेऊन गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातास, दोघांच्या मृत्यूस तसेच फिर्यादीचा पिकअप टेम्पो व त्यातील बॉयलर कोंबड्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी मिक्सर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.
तारीख : 30-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
कामशेत (Kamshet) : मावळातून पावणे तीन लाखांचे ज्वलनशील केमिकल व पांढऱ्या रॉकेलचा साठा जप्त करण्यात आला. बुधवारी (दि. २९) रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंढावरे (ता. मावळ) गावच्या हद्दीतील इंद्रायणी ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंढावरे गावात इंद्रायणी ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत केमीकलचा व पांढऱ्या रॉकेलचा अवैध साठा केल्याची गोपनीय माहीती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि. २९) रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी पोलीस पथक, पंच व पुरवठा निरीक्षक तनपुरे यांच्या पथकाने छापा टाकला. तेथे २८ बैरैलमध्ये २ लाख ८८ हजार ६०० रुपये किमतीचे अंदाजे ४ हजार ८१० लीटर ज्वलनशिल केमीकल सदुष्य द्रव्य तसेच पांढरे रॉकेल सदृश्य पदार्थ असे बेकायदेशीररित्या साठा करून ठेवल्याचे आढळले. सदरचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला असून आरोपी महेंद्र काळुराम चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील हे करत आहेत.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील तसेच सहा. पोलीस निरीक्षक सतिष पाटील, सहा. फौजदार नितेंद्र कदम, पोलीस हवालदार समिर करे, गणेश तावरे, पो. कॉ. प्रतिक काळे, गणेश ठाकुर, पोकॉ निशा लालगुडे यांच्या पथकाने केली.
तारीख : 29-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाचा खून करण्यात आला आहे. रविवारी (दि. २५) रोजी सायंकाळच्या सुमारास लोणावळा शहरानजीकच्या दहिवली गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली. या हाणामारीत दोनजण जखमी झाले असून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५, रा. गुहागर, रत्नागिरी) असे खून झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. मनोज मधुकर वरवटकर (वय ४२) आणि प्रज्वल उदय मेहता (वय २६) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मनोज वरवटकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निकेश कांबिरे (रा. कर्जत, रायगड), प्रतीक देशमुख, यश कैलास पडवळ (दोघे रा. वेहेरगाव, मावळ), गौरव संजय पट्टाधारी (रा. तुंगार्ली, लोणावळा) आणि त्यांचे चार ते पाच साथीदार यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कमलेश व त्यांचे काही मित्र लोणावळ्यात आलेले होते. सायंकाळी कार्ला फाटा परिसरातील दहिवली गावाजवळ वाहन वळविण्यावरून पर्यटक व स्थानिक तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. वादातून हाणामारी झाली. स्थानिकांनी लोखंडी गज, दांडके, कारच्या वायपरनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात कमलेश धोपावकर यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोघे पर्यटक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत आवारे हे करत आहेत.