तारीख : 25-08-2025श्रेणी :राजकारण
विषय :
तारीख : 24-08-2025श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : वाढत्या लोकसंख्येमुळे ऑक्सिजनचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असताना, तळेगाव दाभाडे शहरात एक हरित संदेश देणारा उपक्रम पार पडला. माजी नगराध्यक्ष आणि समाजसेवक सुरेश धोत्रे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या प्रांगणात १२ फूट उंचीची तब्बल ६१ झाडे लावून भव्य वृक्षारोपण सोहळा साजरा करण्यात आला.
वृक्षारोपण काळाची गरज – सुरेश धोत्रे
या प्रसंगी बोलताना सुरेश धोत्रे यांनी सांगितले की, “वाढत्या लोकसंख्येला पूरक असा शाश्वत श्वासोच्छ्वासाचा स्रोत म्हणजे झाडे. वृक्षारोपण ही आजची नितांत गरज असून, त्यांचे संगोपन केल्याशिवाय मानवी जीवन समृद्ध होणार नाही.”
त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या अभंगाचा दाखला देत वृक्ष लागवडीचे महत्त्व अधोरेखित केले.
हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (शाखा तळेगाव दाभाडे, मावळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत संस्थांच्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
याप्रसंगी रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष डा. गणेश सोरटे, नाट्य परिषदेचे मुख्य कार्यवाह विश्वास देशपांडे, बालमोहन संस्थेचे विश्वस्त नंदन रेगे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुहास गरुड, इंदोरीचे माजी सरपंच प्रशांत भागवत तसेच संजय मेहता, नितीन शहा, संजय वाडेकर, राजेश बारणे आदी उपस्थित होते.
हरित सेना प्रमुख रुचिरा बासरकर, खुडे सर आणि विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाची संपूर्ण आखणी केली. संग्राम जगताप, आनंदराव रिकामे, वैशाली लगाडे, रघुनाथ कश्यप, दिनेश निळकंठ, सुधाकर मोरे आदींनीही परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान शिंदे, सूत्रसंचालन दत्तात्रय जोशी (रामभाऊ परुळेकर शाळा) यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक फोंडके सर व अध्यापिका भारती धोत्रे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. मिलिंद निकम (रोटरी सिटी व नाट्य परिषद डायरेक्टर) यांनी केले.
तारीख : 23-08-2025श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशन (TDIA) ची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत वाहतूक कोंडी, रस्ते सुधारणा, वीजपुरवठा आणि कामगार सुविधा या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेण्यात आले.
बैठकीस TDIA अध्यक्षा अनु सेठी, उपाध्यक्ष जगदीश यादव, तळेगाव MIDC पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्यासह एफ.ई.व्ही इंडिया, एलअँडटी डिफेन्स, इमर्सन, हुसको हायड्रॉलिक्स, अॅटलास कोपको, शेफ्लर इंडिया, पॉस्को, बोर्गवॉर्नर आदी नामांकित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाहतूक कोंडीसाठी निर्णायक पावले
तळेगाव MIDC परिसरात वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी ७० ते ८० ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्युंदाई कंपनीलगत सेवा रस्त्याचे रुंदीकरण तसेच प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याचा निर्णय झाला. चाकण–शिंदे वासुली व शिंदे वासुली–पॉवर हाऊस रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
कामगारांना दिलासा
कामगारांच्या सोयीसाठी PMPL बससेवा शिंदे वासुलीपर्यंत वाढविण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला. यामुळे MIDC मधील हजारो कामगारांना प्रवासात मोठी सोय होणार आहे.
वीजपुरवठ्याबाबत ठाम भूमिका
MIDC मधील वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येबाबत आमदार शेळके म्हणाले, “उद्योगांच्या प्रगतीसाठी सततचा वीजपुरवठा आवश्यक आहे. सरकार व प्रशासनाने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.”
CSR फंड स्थानिक विकासासाठी
बैठकीस उपस्थित कंपन्यांनी त्यांच्या CSR फंडातून मावळातील सामाजिक व विकासकामांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. आमदार शेळके यांनी CSR निधी स्थानिक पायाभूत सुविधा व सार्वजनिक सोयीसाठी वापरण्याचा मुद्दा ठामपणे मांडला.
उद्योगनगरीला गती देणारे निर्णय
या बैठकीत घेतलेले निर्णय तळेगाव MIDC परिसरातील वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा स्थैर्य, कामगार सुविधा आणि स्थानिक विकासकामे यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. TDIA व आमदार सुनील शेळके यांच्या सक्रिय पुढाकारामुळे मावळ तालुक्यातील उद्योगनगरीच्या प्रगतीला नवे बळ मिळणार आहे, असे सर्वांचे एकमत झाले.
तारीख : 18-08-2025श्रेणी :राजकारण
सोमाटणे (Somatane) : मावळातील सोमाटणे फाटा चौक येथे होणाऱ्या नित्याच्याच वाहतूक कोंडीमुळे येथील जीवनमान अक्षरशः ठप्प होत असून, नागरिक, शेतकरी, नोकरदार वर्ग आणि रुग्णवाहिका यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील ६५ गावांचा श्वास रोखणाऱ्या ‘सोमाटणे फाटा ट्रॅफिक’ समस्येवर येत्या आठ दिवसात कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा भाजपा आणि सर्वपक्षीयांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारू असा इशारा भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांनी दिला.
या संदर्भात तहसील कार्यालय, तळेगाव पोलीस स्टेशन आणि देहूरोड वाहतूक पोलिस चौकी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पवन मावळ भाजपा मंडलाध्यक्ष दत्तात्रय माळी, मावळ तालुका भाजपाचे उपाध्यक्ष राजेश मुर्हे, सांगवडेचे सरपंच रोहन जगताप, रामभाऊ गोपाळे, प्रदीप वाजे, नवनाथ गायकवाड, महेश भोईर, कल्पेश राक्षे, संकेत सस्ते आदी उपस्थित होते.
भाजपाच्या वतीने घोटकुले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातील महत्त्वाचा सोमाटणे फाटा चौक हा सुमारे ६५ गावांना जोडणारा मुख्य मार्ग असून, येथे दररोज भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या चौकातून शेतकरी, दुग्धव्यावसायिक, नोकरदार वर्ग, रुग्णवाहिका तसेच औद्योगिक कंपन्यांचा माल मोठ्या प्रमाणावर ये-जा करतो. परंतु, ट्रॅफिकच्या समस्येमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या ठिकाणी पवना हॉस्पिटल, पायोनियर हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल अशी महत्त्वाची रुग्णालये असतानाही, एमर्जन्सी रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडथळे येतात. शेतकरी आणि दुग्धव्यावसायिकांना आपला माल बाजारपेठेत वेळेत पोहोचविणे कठीण झाले आहे. तर नोकरदार वर्गाला रोज नोकरीवर उशीर होतो, तसेच परिसरातील उर्से व बेबडओहोळ येथील मोठ्या औद्योगिक कंपन्यांचे कच्चा माल व तयार माल वाहतुकीत अडथळा निर्माण होतो.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायमस्वरूपी ट्रॅफिक कंट्रोलिंग ऑफिसरची नेमणूक आणि चौकात सिग्नल बसविणे आवश्यक असल्याची मागणी घोटकुले यांनी केली आहे.
तारीख : 17-08-2025श्रेणी :राजकारण
पवनानगर (Pawananagar) : पवना धरण परिसरात शनिवारी (दि. १६) सकाळी जलपूजेचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या जलपूजेचे आयोजन करण्यात आले. धरण तब्बल ९५ टक्के क्षमतेपर्यंत भरले असून, यामुळे शेतकऱ्यांसह पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या ७–८ वर्षांपासून सतत गाळ काढण्याचे काम खासदार बारणे यांच्या प्रयत्नातून सुरू असून, आतापर्यंत सुमारे ८५,००० क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. या महत्त्वाच्या उपक्रमामुळे धरणाची जलसाठवण क्षमता वाढली असून, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
या कामासाठी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) व पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) यांनीही मोलाची साथ दिली. धरणातील वाढलेला जलसाठा आता अधिक काळ पाणीपुरवठ्यासाठी उपयुक्त ठरेल, तसेच शेतकरी बांधवांच्या शेतीसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव, रविकांत रसाळ, तालुका प्रमुख राजू खांडभोर, उपतालुका प्रमुख राम सावंत, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सुदर्शन देसले, तसेच इतर मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक ग्रामस्थांनी गाळ काढण्याच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करून खासदार बारणे यांचे आभार मानले. धरणातील वाढलेली जलसाठवण क्षमता आता सामाजिक-आर्थिक विकासासाठी मोलाची ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त बारणे यांनी व्यक्त केले.
तारीख : 16-08-2025श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : तळेगाव दाभाडे शहरात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्याविहार कॉलनी परिसरात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात देशभक्तीपर गीतांचा निनाद, “भारत माता की जय”च्या गर्जना आणि नागरिकांच्या टाळ्यांच्या गजरात वातावरण भारावून गेले. सुभेदार विष्णूजी पठाडे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला.
आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सभागृह व ओपन स्पेस विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न
यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सभागृह आणि ओपन स्पेसच्या विकासासाठी एक कोटी पंधरा लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी खर्चून उभारलेल्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये सभागृहाचे बांधकाम, ओपन स्पेसचे सुशोभीकरण, चेनलिंक कंपाउंड, पादचारी मार्गाची उभारणी, डेकोरेटिव्ह लाइट पोल, ओपन जिम साहित्य तसेच लहान मुलांसाठी नवीन खेळणी बसविणे व जुन्या खेळण्यांची दुरुस्ती अशा कामांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांमुळे परिसरातील नागरिकांना सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असून तळेगाव दाभाडेच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, कृष्णा कारके, सुरेश धोत्रे, विजयकुमार सरनाईक, गणेश काकडे, बजरंग जाधव, शैलजाताई काळोखे, सुदर्शन खांडगे, रामभाऊ गवारे, सुरेश गायकवाड, सुहास गरुड, संजय चव्हाण, चंद्रकांत दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. “स्थानिक नेतृत्व आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशा प्रकारची दर्जेदार कामे यशस्वीपणे घडवता येतात,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
ध्वजारोहण आणि लोकार्पणाचा दुहेरी सोहळा यशस्वीपणे पार पडल्याने परिसरात देशभक्तीची भावना आणि विकासाचा विश्वास अशा दोन्हींचा संगम अनुभवायला मिळाला. नागरिकांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताच्या सुरावटीत करण्यात आला.