whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

पुणे - कोलाड महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू, लवळे फाटा ते पिरंगुट दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा

तारीख : 05-04-2022श्रेणी :महाराष्ट्र

feature image
whatsapp

Mulshi News : निधन वार्ता! रिहे येथील प्रगतशील शेतकरी रमेश बोडके यांचे निधन

तारीख : 17-02-2024श्रेणी :महाराष्ट्र

feature image

रिहे (Rihe) : रिहे, बोडकेवाडी (ता. मुळशी) येथील प्रगतशील शेतकरी रमेश बोडके (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना काही आरोग्य समस्या उद्भवल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर सिंबायोसीस हॉस्पिटल लवळे, सूर्या हॉस्पिटल चाकण येथे उपचार सुरू होते. परंतु शुक्रवारी (दि. १६) त्यांची तब्बेत पुन्हा खालावल्याने त्यांना ससून रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.


बोडके यांनी आपल्या जीवनप्रवासात शेतीकामात अतिशय काबाडकष्टातून संसाराचा गाडा पुढे हाकत मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना योग्य दिशा दाखवली. त्याच्या जोरावर त्यांची दोन्ही मुले आज उत्तम व्यावसायिक आहेत. त्याचप्रमाणे घरातील मोठा मुलगा असल्याने आपल्या पाठच्या भावंडांचा सांभाळ केला. यातूनच आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या सांभाळून एक कुटुंब प्रमुख कसा असावा याचा आदर्श घालून दिला. त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी होता. 


त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आपला सहकारी गमावल्याने वारकरी संप्रदायात व पंचकृषित शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन विवाहित मुले व एक विवाहित मुलगी, दोन भाऊ, तीन बहिणी, पुतणे, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून युवा उद्योजक अतुल बोडके व रिहे ग्रामपंचायतीच्या मा. प्रभारी सरपंच सुरेखा पडळघरे यांचे ते वडील तर प्रजावार्ता न्यूजचे उपसंपादक अभिषेक बोडके यांचे चुलते होत.

whatsapp

Shivjayanti 2024 : किल्ले शिवनेरी येथे शिवजयंती महोत्सव! शिवभक्तांना सर्व सुविधा पुरविण्याची चोख व्यवस्था करा; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश

तारीख : 15-02-2024श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पुणे (Pune) : किल्ले शिवनेरी येथे आगामी शिवजयंती महोत्सव उत्साहाने साजरा करण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. शिवजयंती उत्साहात साजरी करत असतानाच येणाऱ्या शिवभक्तांना कोणत्याही असुविधांना सामोरे जावे लागू नये यासाठी आवश्यक सेवा सुविधा पुरविण्याची व्यवस्था करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

जुन्नर पंचायत समिती येथे शिवजयंती आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उप वन संरक्षक अमोल सातपुते, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, माजी आमदार शरद सोनवणे, पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार, गृहरक्षक दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे आदी उपस्थित होते.

शिवजयंती हा आनंद उत्सव असून त्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, महसूल, पोलीस विभाग, वन विभाग तसेच अन्य विभागांची यात मोठी भूमिका आहे. यासह अन्य सर्वच यंत्रणांनी या उत्सवाचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे व्हावे यासाठी समन्वयाने काम करावे. सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्यात यावी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा, मेगाफोन देण्यात येतील. हा उत्सव हरित असावा म्हणून प्लास्टिक नियंत्रण करावे तसेच कचरा जमा करण्याची व विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करा, असेही ते म्हणाले. (Make proper arrangements to provide all facilities to Shiva devotees - Collector Dr. Suhas Divse)

गर्दी नियंत्रणासाठी मुख्य सभेचे ठिकाण बदलण्याविषयक भारतीय पुरातत्व विभागासोबत (एएसआय) चर्चा सुरू आहे, असे सांगून ते म्हणाले, शिवजन्म स्थळ तसेच शिवकुंजची सजावट, रोषणाई, पायथा ते दत्त मंदिर पर्यंत पथदिव्यांसाठी वीज व्यवस्था चांगल्याप्रकारे करावी. गडावर तसेच तसेच दत्त मंदिर आणि पायथ्यासह शहरातही स्वच्छ्ता गृहे आणि इतर स्वच्छता विषयक चांगले व्यवस्थापन करावे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या दुर्गोत्सवातील बचत गट आणि अन्य स्टॉल, टेन्ट सिटी, जाणता राजा महानाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आदींबाबत माहिती, प्रसिद्धी करावी असेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यांनी पाणीपुरवठा, स्वच्छ्ता, आरोग्य व्यवस्था आदींचा आढावा घेतला. पुरेशा प्रमाणात राखीव बेड, अतिदक्षता खाटा, आरोग्य पथकांची नेमणूक, रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत. तसेच पाण्याची तपासणी व ते शुद्धीकरण करण्यात येणार आहे. पंचायत समिती तसेच जुन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून फिरते व स्थिर तात्पुरती स्वच्छ्ता गृहे उभारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

डॉ. पंकज देशमुख म्हणाले, शिवभक्तांना कार्यक्रम सुरू असताना दर्शनासाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागू नये प्रयत्न सुरू आहेत. फक्त मुख्य कार्यक्रमाच्या वेळी थोड्याच कालावधीसाठी गर्दीला थांबविण्यात येणार असून नागरिकांना हत्ती दरवाजा, मीना दरवाजा, कुलूप दरवाजा या ठिकाणी तसेच अन्य ठिकाणीही कार्यक्रम पाहण्यासाठी एलईडी स्क्रीन बसविण्यात येतील. दत्त मंदिर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून आवश्यक तेथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पुरविण्यात येईल. शिवजन्म उत्सव साजरा करत असताना त्याप्रसंगी गर्दी नियंत्रणाच्यादृष्टीने अत्यंत मर्यादित स्वरूपात प्रवेश पासेस देण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरुपी वीज उपलब्ध होण्याच्यादृष्टीने सौर पॅनेल बसविता येतील का हे महाऊर्जाकडून तांत्रिक व व्यवहार्यता तपासणी करुन घ्यावी. परिवहन मंडळाने अधिकच्या बसेसची व्यवस्था करावी. पर्यटन विभागाने गडावरील कार्यक्रमात सहभाग घेण्याच्या दृष्टीने पुढील काळात पुढाकार घ्यावा, ड्रोनद्वारे गर्दीची पाहणी व नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापनसाठी पथकांची नेमणूक आदी विषयांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली. बैठकीस मराठा महासंघाचे पदाधिकारी, विविध कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

गडावरील सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

तत्पूर्वी पहाटे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण आणि पोलीस अधीक्षक देशमुख, उप वन संरक्षक अमोल सातपुते यांनी शिवनेरी गडावर भेट देऊन तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

whatsapp

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ उद्या 'पिंपरी चिंचवड' व 'मावळ बंद'ची हाक

तारीख : 13-02-2024श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पिंपरी (Pimpri) : राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याच्या अध्यादेशाचे सगेसोयऱ्यांच्या व्याखेसह कायद्यात रूपांतर करावे, यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे. या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या या उपोषणाच्या व मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ उद्या (बुधवार दि. १४) 'पिंपरी चिंचवड' व 'मावळ बंद'ची हाक देण्यात आली आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य दुचाकी व चारचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.


मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील विविध आंदोलने करत आहेत. जानेवारीत लाखो मराठा समाज बांधवांसह जरांगे मुंबईच्या दिशेने धडकले होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामुळे जरांगे यांनी आंदोलन स्थगित केले होते. मसुद्याचे सगेसोय-यांच्या व्याखेसह कायद्यात रूपांतर करणे, अंतरवली सराटीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, मराठा समाजास दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी जरांगे हे गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून‌ १४ फेब्रुवारी बंदची हाक दिली आहे. यावेळी कडकडीत बंद पाळून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने केले आहे.


पिंपरी-चिंचवड शहरातील रॅलीचा मार्ग


या रॅलीची सुरुवात सकाळी नऊ वाजता डांगे चौक थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. तेथून काळेवाडी फाटा, जगताप डेअरी, रहाटणी, पिंपरी गाव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे जाणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर रॅली चिंचवड स्टेशन, आकुर्डी, भक्ती-शक्ती समूह शिल्प निगडीकडे जाणार आहे. तेथून रॅली तळेगाव दाभाडे मार्गे वडगावच्या दिशेने जाऊन छत्रपती संभाजी महाराज चौक वडगाव फाटा येथे समारोप होईल.


मावळ तालुक्यातील रॅलीचा मार्ग


या रॅलीची सुरुवात सकाळी नऊ वाजता खंडाळा येथून होऊन लोणावळा, वाकसई, कार्ला, शिलाटणे, कामशेत (पवन मावळ - नाणे मावळ), कान्हे फाटा (आंदर मावळ), वडगाव मावळ मार्गे जाऊन छत्रपती संभाजी महाराज चौक वडगाव फाटा येथे समारोप होईल.

whatsapp

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी पुन्हा 'वाहतूक ब्लॉक'

तारीख : 12-02-2024श्रेणी :महाराष्ट्र

feature image

प्रजावार्ता : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मंगळवारी (दि. १३ फेब्रुवारी) गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेणार आहे. मुंबई वाहिनीवर (कि.मी १५.७५०) येथे दुपारी १२ ते २ या वेळेत हे काम होणार असल्याने या कालावधीत सदर मार्गिकेवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग!

द्रुतगती मार्गावरून पुणे-मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किमी ५५ वरून वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुना पुणे- मुंबई मार्गावरून मार्गस्थ होतील. द्रुतगती मार्गावरून पुणे-मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट (कि.मी ३९.८००) येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुना पुणे- मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेंडूग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ होतील. तरी वाहनचालकांनी याची नोंद घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

whatsapp

Takwe News : टाकवे येथे विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक

तारीख : 11-02-2024श्रेणी :महाराष्ट्र

feature image

टाकवे बुद्रुक (Takwe Budruk) : येथील विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठासोहळ्या निमित्त मुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मरीमाता मंदिर ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर मार्गे घोडे, उंट व ढोल लेझीमच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.


याप्रसंगी डोक्यावर कलक्ष घेऊन महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. टाळ मृदुंग वाजवत संपूर्ण गावातून मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

whatsapp