तारीख : 22-06-2021श्रेणी :गुन्हेगारी
तारीख : 04-04-2023श्रेणी :गुन्हेगारी
शिरगाव (Shirgaon) : शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे खून प्रकरणातील मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. शनिवारी (दि. १) रात्री ९.३० च्या सुमारास शिरगाव चौकात, साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर तीन ते चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत गोपाळे यांचा निर्घृणपणे खून केला होता. यापूर्वी पोलिसांनी चौघांना अटक केली होती. आता मुख्य आरोपींना आज मंगळवारी (दि. ४) पहाटे अटक करण्यात आली आहे. त्यांना सोमवार (दि. १०) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशाल ऊर्फ किरण सुनिल गायकवाड (वय २५), संदिप ऊर्फ अण्णा छगन गोपाळे (वय ३१), ऋतिक शिवाजी गोपाळे (वय २२, सर्व रा. शिरगाव, ता. मावळ, जि पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सरपंच प्रवीण गोपाळे यांचे बंधू रवींद्र गोपाळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. मात्र अद्याप खुनाचे नेमके कारण समोर आलेले नाही.
आरोपींनी असा केला खून
पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरगाव (ता. मावळ) चौकात, साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सरंपच प्रविण साहेबराव गोपाळे हे मंदिरासमोर मोटार सायकलवर बसलेले होते. यावेळी गाडीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर धारधार कोयत्याने वार करुन निघृण खून केला व घटनास्थळावरून पलायन केले. त्या अनुषंगाने शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यात भादवी ३०२, १२० (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींचा मागमूस काढण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान
स्थानिक लोकप्रतिनिधींची भर चौकात हत्या झाल्याने ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर आरोपी गजाआड करेपर्यंत ठिय्या पुकारला होता. यामुळे येथे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर गोपाळे यांच्या कुटुंबीयांनी देखील आरोपी अटक करेपर्यंत अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची भर चौकात हत्या होऊ लागल्याने मोगलाई लागली काय ?? असे म्हणत राज्य शासनाच्या गृहविभागाला चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे लवकरात लवकर पलायन केलेल्या आरोपींचा मागमूस काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले होते.
शिरगाव पोलिसांच्या विशेष पथकाकडून सापळा रचत आरोपींना अटक
त्यानुसार कौशल्यपूर्वक तपासचक्रे फिरवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांच्या मार्गदर्शानाखाली विशेष पथक नेमून आरोपींचा शोध सुरु असताना गुप्त बातमीदारामार्फत या गुन्हयातील आरोपी हे हिंजवडी-कासारसाई रस्त्यावर डोंगराच्या बाजुला थांबलेले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गाडीलकर, पो.हवा. साबळे, पो.ना. घाडगे, पो.ना. नागरगोजे, पोलीस अंमलदार समाधान फडतरे व पो.अंमलदार राठोड यांनीतेथे जाऊन सापळा रचत मोठ्या शिताफीने वर नमूद तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या घटनेचा पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहिया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, देहुरोड विभाग सहा. पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ या करत आहेत.
प्रजावार्ता न्यूज नेटवर्क : अभिषेक बोडके (८६००००६८९३)
तारीख : 29-12-2022श्रेणी :गुन्हेगारी
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : हिंदवी स्वराज्याची साक्ष म्हणुन लोहगड दुर्ग पुन्हा डौलाने उभा रहावा यासाठी लोहगड दुर्ग अतिक्रमणाच्या विळख्यातून सोडवा, अशी बजरंग दलाच्या वतीने निवेदनाद्वारे केंद्रीय पुरातत्व विभागाला आर्त साद घालण्यात आली आहे. तसेच यावर्षी कुठल्याही परिस्थितीत लोहगडावर होणारा अनधिकृत उरुस होऊ देणार नाही. यासाठी मोठे आंदोलन / मोर्चा उभारण्याची तयारी आहे. तरी पुरातत्त्व विभागाने हा उरुस होऊ देऊ नये व अनधिकृत बांधकाम (मजारी) त्वरित काढावे ही मागणी जोर धरत आहे.
बजरंग दलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोहगड हा केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाचा साक्षीदार असुन सर्व शिव भक्तांच शक्तिस्तान व स्फूर्तीस्थान आहे. मागील काळात या किल्ल्यावर अनधिकृत बांधकाम निदर्शनास आले आहे. यामध्ये मजार व थडगी आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सद्या दुर्गावर ६ मजारी आहेत. ज्यांचा इतिहासाशी कोणताही संदर्भ नाही. अश्या या मजारी लवकरात लवकर हटवाव्या यासाठी शिवभक्तांच्या वतीने अनेक वर्ष लढा सुरु आहे. या लढ्याचे नेतृत्व विश्व हिंदु परिषद, बजरंग दल करीत आहे. असेच आंदोलन बजरंग दलाने प्रताप गडावरील अतिक्रमण हटविण्या साठी सातत्याने केले होते. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व विभाग व वन विभाग व राज्य सरकारने प्रतागडावरील अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त केले आहे. त्याचप्रमाणे लोहगड दुर्गावरील अनधिकृत बांधकाम उखडून टाकावे व हे दुर्ग पुन्हा हिंदवी स्वराज्याची साक्ष म्हणुन पुन्हा डौलाने उभे राहावे, अशी बजरंग दलाने निवेदनाद्वारे केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे मागणी केली आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षात या दुर्गावर उरुस भरवण्याचा प्रकार सुरू आहे. ज्यांचा इतिहासाशी काडीमात्र संबंध नाही. अगदी भारत स्वातंत्र्य होईपर्यंत याची कुठलीही नोंद नाही. ही बांधकामे अधिकृत करण्यासाठी उर्साचा वापर केला जात आहे. या उर्साच्या निमित्ताने दुर्गावर जनावरांचा बळी दिला जातो. मोठ्या प्रमाणावर घाण केली जाते. हे सर्व प्रकार बंद व्हावे म्हणून बजरंग दल मावळ मैदानात उतरून गेली अनेक वर्षे कायदेशीर लढा देत आहे.
तारीख : 02-10-2022श्रेणी :गुन्हेगारी
देहूरोड : महिलेवर लैंगिक अत्याचार करत मावळातील पवनानगर येथील जमीन जबरदस्तीने खरेदी करायला लावत तब्बल ६६ लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १० जुलै २०२१ ते ६ जून २०२२ या कालावधीत घडला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
महिलेवर लैंगिक अत्याचार करणारा प्रदिप फक्कड कोळी (वय ३० रा. तळेगाव दाभाडे) व जमिनीच्या व्यवहारात समाविष्ट असलेला देवा विलास सोनवणे (वय ३२ रा. पवनानगर, ता. मावळ) अशी अटक आरोपींची नावे असून व्यवहारात समाविष्ट असलेला अंकुश सोनवणे याच्या विरोधातही देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. २९) देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी कोळी याने पवनानगर येथील जमीन चांगली आहे ती तुझी एफडी मोडून घे, तसेच तुझ्यात माझ्यात जे झाले ते कोणाला सांगू नको, नाही तर तुला व तुझ्या मुलीला पुढे-मागे कोणी नाही एकेदिवशी गायब करेन अशी धमकी दिली. त्यावरून जानेवारी २०२२ मध्ये शेवटच्या आठवड्यात फिर्यादी या अंकुश सोनवणे याच्या घरी गेल्या व त्यांना विचारले की मला एक जमीन दाखवली व दिली दुसरी असे का, तर हे सारे व्यवहार कोळी बघत असल्याचे सांगीतले.
या कारणावरून कोळी सतत फिर्यादीच्या घरी येऊ लागला. त्याने फिर्यादीला लग्नाची मागणी घालून जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. दरम्यान जमिनीच्या व्यवहाराचा बहाणा करून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी सुमारे ६६ लाख रुपये उकळले व फिर्यादी यांना जमिन न देता त्यांची फसवणूक केली. शारीरिक अत्याचार व आर्थिक फसवणूक यामुळे फिर्यादी यांना धक्का बसला होता. त्यातून मानसीक स्थिती सावरल्यानंतर त्यांनी गुरुवारी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.
तारीख : 21-09-2022श्रेणी :गुन्हेगारी
जुन्नर : दिनांक १७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या तरुण शेतकऱ्याने त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. माननीय पंतप्रधानांना 'तुमच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या करत आहे' असा स्पष्ट उल्लेख या चिठ्ठीमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केदारी कुटुंबाची विचारपूस करून सांत्वन केले आणि महाराष्ट्र शासनाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे सूचना केल्या आहेत.
आपल्या निवेदनात त्यांनी महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे होत असलेले दुर्लक्ष त्याचबरोबर गेली अनेक वर्ष राज्यात नापिकी, दुष्काळ, शेतीमालाला हमीभाव न मिळणे, त्याचबरोबर शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दिवसेंदिवस बुडण्याचे प्रमाण वाढणे या आणि अशा अनेक कारणांमुळे मानसिकरित्या खचून जाऊन शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यापुढे म्हणतात, केंद्र सरकारची कृषी विषयक धोरणे आणि निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे होत नाहीत याबद्दल पुरेसे मत स्पष्ट करणारी ही घटना आहे.
सदर शेतकऱ्याच्या कुटुंबीयांशी याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना या कुटुंबीयांना शक्य तेवढी अधिकाधिक मदत मिळवून देण्याबाबत सूचना केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी लवकरच बैठक घेऊन बैठकीचे आश्वासन दिले आहे. पोलीस अधिक्षक, पुणे यांच्याशीही नीलम गोऱ्हे यांनी बोलुन माहिती घेतली असता पोलीस अहवाल सादर केल्याचे सांगितले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केदारी परिवाराशी संवाद साधला तेंव्हा शिवसेना पदाधिकारी माऊली खंडागळे, प्रसन्ना डोके, संभाजी तांबे, ज्योत्स्नाताई महांबरे उपस्थित होते. राज्य सरकारच्या माध्यमातून या कुटुंबीयांना शक्य तितकी मदत देण्यात यावी, अशी अपेक्षा नीलम गोर्हे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर त्या शिवसेनेच्या माध्यमातून केदारी परिवारास आर्थिक मदत देखील पाठवणार आहेत.
कृषी क्षेत्रासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे. या शेतकर्याने जिल्हा बँक आणि इतर सरकारी संस्थामधून शेतीसाठी लागणार्या कर्जाच्या अटी जाचक असल्याकारणाने खाजगी ठिकाणाहून कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. याच जाचाला कंटाळून केदारी यांनी आत्महत्या केली असल्याचे दिसून आले आहे.
या निवेदनात त्यांनी पुढील मुद्द्यांवर भर दिला
१. शेतकरी आणि एकंदर कृषि विभागाच्या कार्य पद्धतीवर आणखी प्रभावी स्वरूपाचे धोरण आखण्याची आवश्यकता आहे.
२. शेतीमालाला योग्य भाव मिळणे यासाठी बाजार समित्यांची कार्यपद्धतीमध्ये सुधारणा आणणे
३. कृषि क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून शेतकर्यांना उत्पादन आणि उत्पन्न या दोन्हीमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने धोरणे आखण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
४. याबाबत आपल्या स्तरावरून कृषि विभाग, शेतकरी संघटना, शेतकरी संस्था यांची एक बैठक आयोजित करण्यात यावी.
तसेच राज्याच्या कृषी धोरणात सुधारणा करण्यासाठी त्यांच्या सूचना विचारात घेण्यात याव्यात, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हे सर्व मुद्दे निवेदनात मांडत त्यावर भर दिला आहे.
तारीख : 19-01-2022श्रेणी :गुन्हेगारी
पुणे : आठवडाभरापासून सोशल मीडियावर येथील बालेवाडीतून अपहरण करण्यात आलेल्या स्वर्णव चव्हाण या चार वर्षाच्या मुलाच्या शोधमोहीमेसाठीची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. डॉ. सतिश चव्हाण यांच्या मुलाचे अपहरण झाल्यानंतर पुणे पोलिसांना आरोपीचा शोध घेणे खूप कठीण होऊन बसले होते.परंतू ८ दिवसांनी लहानग्या स्वर्णवचा (डुग्गुचा) शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.११ जानेवारीला त्याचे बालेवाडीतून अपहरण झाले होते. पुणे पोलिसांची मोठी फौज या मुलाला शोधत होती. त्याच्या शोधावेळी अत्यंत गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास ३०० ते साडेतीनशेच्या वर पोलिस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले.
बालेवाडी हाय स्ट्रीटवरून अपहरण झालेला लहान मुलगा सापडला आहे. त्यांची तब्येत चांगली आहे.
— PUNE POLICE (@PuneCityPolice) January 19, 2022
The little boy kidnapped from Balewadi High Street has been found. He is in good health. #Pune
स्वर्णवचे अपहण कोणी का केले असेल याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती स्वर्णवला दुचाकीवरुन घेऊन जाताना दिसत होता. परंतू डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांना कठीण जात होते. डॉ. सतिश चव्हाण यांनीही सोशल मीडियावर अपहरणकर्त्या आरोपीला विनंती करत आपल्याजवळील जे काही आहे ते तुला देतो पण माझ्या मुलाला सोड अशी विनंती केली होती. अखेरीस पुणे पोलिसांच्या या शोधमोहीमेला यश आले आहे.दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध सुरु आहे.