तारीख : 20-06-2024श्रेणी :गुन्हेगारी
तारीख : 23-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : चारित्र्याच्या संशयातून थेट पत्नीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज (शुक्रवार दि. २३) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोंडीवडे (आंदर मावळ) येथे ही घटना घडली.
सोनाबाई अशोक वाघमारे (वय ३३, रा. कोंडिवडे, ता. मावळ) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी मारूती काळुराम पवार (वय ५०, रा. कोंडीवडे आ. मा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पती अशोक बारकु वाघमारे (रा. कोंडीवडे ता. मावळ) यांच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक वाघमारे हा आपल्या मयत पत्नीवर संशय घेवून नेहमीच शिवागाळ व मारहाण करत असे. आज (दि. २३ मे) रोजी आरोपी व मयत सोनाबाई हे मासेमारी करण्यासाठी जात असताना सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी कोंडीवडे (अ.मा) ता. मावळ गावच्या हद्दीतील फॉरेस्टच्या ओढयामध्ये मयत सोनाबाई हिच्या डोक्यात, कपाळावर दगडाने किंवा कशाने तरी जबर मारहाण करून तिला जिवे ठार मारलेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निराक्षक डोईजड हे करीत आहेत.
तारीख : 23-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
पुणे (Pune) : मुळशीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आजची (शुक्रवार दि. २३ मे) पहाट उजाडताच आरोपी पिता-पुत्रांच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील स्वारगेट येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आज दुपारी त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दोघांच्या कोठडीची मागणी केली. त्यानुसार कोर्टाने पोलिसांची मागणी मान्य करत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे २८ मे पर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.
वैष्णवी मृत्यू प्रकरणात आतापर्यंत १२ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. वैष्णवीला पती शशांकने पाईपने मारहाण केली होती. पोलीस तपासात हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या गुन्ह्यात ११८ (२) कलमवाढ केली आहे. पोलिसांनी ज्या पाईपने वैष्णवीला मारहाण केली होती तो पाईप जप्त केल्याची माहिती आता समोर येत आहे. याच मारहाणीचा प्रकार पोलीस तपासात स्पष्ट झाल्याने पोलिसांनी कलमवाढ केली आहे.
वैष्णवीच्या वकिलांकडून महत्त्वाची माहिती
सुनावणीनंतर वैष्णवीच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "दोन आरोपींना आणलं होतं. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज पहिलीच पीसी होती. तपास करणं बाकी आहे. पोलिसांनी फॉर्च्युनर गाडी जप्त केली पण आणखी इतर मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे. तसेच अजून कुणी कुणी मदत केली याचा देखील तपास करणं बाकी असल्याचं कारण पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणी आरोपी निषपन्न होतील का? त्या अनुषंगानेदेखील तपास सुरु आहे. त्यासाठी देखील पोलिसांनी कोठडी मागितली आहे. तपास अजून चालू आहे. तपासात माहिती समोर येईल तसे आणखी कमल वाढवले जाऊ शकतात", अशी माहिती वकिल शिवम निंबाळकर यांनी माध्यमांना दिली.
भाजपा महिला आघाडीकडून आरोपींवर टोमेटो फेकून तीव्र घोषणाबाजी
दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर करत असताना भाजप महिला आघाडीच्या नेत्या हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी कोर्ट परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास तीव्र घोषणाबाजी केली. आरोपींवर उपस्थित महिलांनी टॉमेटो फेकण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता.
तर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी आंदोलनाचे कौतुक करत, “शाब्बास माझ्या वाघीणींनो, आवाज नेहमी बुलंद ठेवा” असा संदेश दिला. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत संताप व्यक्त केला.
तारीख : 23-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : नामांकित कंपनीच्या नावाने त्यांची परवानगी न घेता फर्स्ट कॉपी कपडे तयार करून विक्री करणे दुकानदारांना चांगलेच भोवले आहे. पुमा कंपनीच्या फिल्ड ऑफिसरने केलेल्या पाहणीत आढळलेल्या तळेगावातील सहा दुकानदारांवर कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी (दि. २१ मे) रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी महेंद्र साहेन सिंग (वय ३६, फिल्ड आफिसर, इलुडिक्सन अडोकेट अॅन्ड सॉलिसीटरस फर्म न्यु दिल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ब्रँड हब दुकानाचे मालक अमर शाम चव्हाण (वय २९, रा काळोखवाडी तळेगाव दाभाडे), छत्रपती मेन्स अटायर दुकानाचे मालक प्रसाद नवनाथ कुल (वय २९, रा. डोळसनाथ कॉलनी), एच. पी. क्लॉथ स्टोअरचे मालक हितेश उदयसिंग परदेशी (वय ३२, रा. साई समर्थनगर, तळेगाव दाभाडे), आउट लुक मेन्स वेअरचे मालक सौरव रोहीदार उबाळे (वय २५, रा. इंदोरी), जयश्री एन एक्सचे मालक हरिष मोतीराम देवासी (वय २५, रा. कृष्णा आकार सोसायटी, तळेगाव दाभाडे), आणि लिमीटेड एडिशन व सेंकन्ड स्किनचे मालक शशांक दिपक जैन (वय ३०, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपींनी तळेगाव दाभाडे हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ब्रँड हब, छत्रपती मेन्स अटायर, एच. पी. क्लॉथ स्टोअर, आउट लुक मेन्स वेअर, जयश्री एन एक्स, लिमीटेड एडिशन व सेंकन्ड स्किन यांनी पुमा कंपनीचा मालकी हक्क असलेल्या प्रोडक्टचे विहीत परवान्याशिवाय उत्पादन करणे किंवा बनावटी तयार करून, त्याचा साठा करुन ते ग्राहकांना पुमा कंपनीचे मुळ उत्पादन असल्याचे भासवुन विक्री करताना मिळुन आल्याच्र फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
तारीख : 15-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
पवनानगर (Pawnanagar) : पवन मावळ परिसरामध्ये बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश करण्यात आला. वनविभागाने तिकोना गावच्या हद्दीत केलेल्या तत्परतेच्या कारवाईमध्ये शिकारीसाठी लागणारी शस्त्रास्त्रे व शिकार केलेल्या वन्यजीवांचे ५२ किलो मांस जप्त करण्यात आले. यासह आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली.
सुखमित हरमित सिंग भुतालिया (वय २६, रा. तिकोणा गाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम ९ व ५१ अंतर्गत वनगुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि १३ मे) मावळ तालुक्यातील तिकोणा गाव येथे "सिंग बंगल्यावर' वनविभागाने अचानक धाड टाकली. आरोपी भुतालिया याच्याकडून सुमारे ५२ किलो संशयित वन्यप्राण्याचे मांस, दोन शस्त्रास्त्रे, जिवंत व वापरलेली काडतुसे आणि शिकारी व सोलण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वनसंरक्षक मंगेश टाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, देवले वनपाल सीमा पलोडकर, खंडाळा वनपाल गणेश मेहत्रे, चावसर वनरक्षक संदीप अरुण आणि वनरक्षक शेळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, वनविभागाने सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, बेकायदेशीर शिकार किंवा वन्यजीव व्यापारासंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ जवळच्या वनकार्यालयात किंवा हेल्पलाइनवर माहिती द्यावी. वन्यजीव आणि जिंगलांचे संरक्षण ही आपल्या सर्वाची सामूहिक जबाबदारी आहे.
तारीख : 15-05-2025श्रेणी :गुन्हेगारी
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : धोकादायकरीत्या चाललेल्या वाहनाला थांबवण्याच्या प्रयत्नात एका पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. वडगाव फाटा (ता. मावळ) येथे मंगळवारी (दि. १३) ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर ट्रक चालकाने पोबारा केला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मदतीने वाहन चालक, क्लीनर आणि अपघातातील कंटेनर मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आला आहे.
त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी वाहन चालकाविरोधात ट्रॅफिक वॉर्डन कुंडलिक पंढरीनाथ सुतार (वय ४०, रा. आढे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी वाहन चालक रोहन इसब खान (वय २४, रा. हरियाणा) आणि क्लिनर उमर दिन मोहम्मद (वय १९, रा. मथुरा, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हेड कॉन्स्टेबल मिथुन धेंडे हे (दि. १३ मे) रोजी वडगाव फाटा येथे वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. तसेच वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत असताना अक्षय पैलेस, वडगाव कमानी जवळ त्यांना मुंबई बाजूकडून तळेगाव बाजूकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी माहिती दिली की एक कंटेनर (HR 74 B 3677) चा चालक हा अतिशय धोकाधायकरित्या वाहन चालवत असून त्याला जर तत्काळ थांबवले नाहीतर तो खूप मोठा अपघात करून निष्पाप नागरिकांचे बळी घेवू शकतो.
सदरच्या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शासकीय वाहनावरील चालक गणपत होले यांनी सदरची माहिती कॉल करून तेथून पुढे १ किमी अंतरावर वडगाव फाटा येथे वाहतूक नियमनाचे काम करत असणारे हेड कॉन्स्टेबल धेंडे यांना दिली. त्यावरून धेंडे यांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी तत्काळ त्यांच्या सोबतच्या ट्रॅफिक वार्डन व नागरिकांच्या मदतीने सदर वाहन मुंबई चाकण लेणवर पूजा हॉटेलच्या समोर थांबविले.
त्यावेळी कंटेनरचालक ‘निचे आता हू’असे बोलला. सदर वाहन थांबले असल्याने हेड कॉन्स्टेबल धेंडे हे त्या वाहनाच्या पुढे डाव्या बाजूला उभे असताना अचानक कंटेनर चालकाने अतिशय वेगाने चालवून पुढे उभे असलेले धेंडे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धडक देऊन जखमी करून चाकण बाजूकडे निघून गेला. त्यांनतर हेड कॉन्स्टेबल धेंडे यांना तत्काळ उपचारासाठी पवना हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम हे करत आहेत.