तारीख : 16-04-2024श्रेणी :राजकारण
तारीख : 27-04-2025श्रेणी :राजकारण
पवनानगर (Pawnanagar) : मावळ तालुक्यासह औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात धनाड्य व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम थाटण्यात आले आहे. याची पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी (दि. २६) रोजी पवना धरण परिसराला भेट दिली. या पाहणी दौऱ्यावेळी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम आढळून आल्याने मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले.
धरणातील अतिक्रमण, पाण्याचे नियोजन, पाणी प्रदूषण नियंत्रण, धरण सुरक्षा, शासकीय जमीनीचे रक्षण, तसेच धरण क्षेत्रालगत पर्यटनवाढीच्या दृष्टीने व स्थानिकांच्या रोजगार निर्मितीसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या आराखड्यांबाबत अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत मावळचे आमदार सुनील शेळके, दौंडचे आमदार राहुल कुल यांची प्रमुख उपस्थिती होती. तर जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, सहाय्यक अभियंता सचिन गाडे, मावळ मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या सह पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
येत्या पंधरा दिवसांत अतिक्रमणे काढा - मंत्री विखे पाटील
पवना धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर धरणाच्या जागेवर धनदांडग्यांनी अतिक्रमणे करुन भलेमोठे बंगले, फार्महाऊस उभारले असून याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता धरणाच्या जागेवर अवैध कामे कशी झाली यावर अधिकारी अनुत्तरित होते. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत अतिक्रमणे काढण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करा
मावळसह पिंपरी चिंचवड भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पवनाधरणाच्या पाण्याचे नियोजन करुन भविष्यात पाणी कमी पडणार नाही, याबाबत सुनियोजन करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे.
पवना धरणाची सुरक्षा यंत्रणेला सुचना
पवना धरणाच्या पाण्यावर संपूर्ण पिंपरी चिंचवडसह मावळ भाग अवलंबून असल्याने धरणाच्या सुरेक्षेकडे काटेकोरपणे लक्ष घालून धरणाच्या मजबुतीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. पर्यटकांना पाण्यात जाताना योग्य ती काळजी घेण्याबाबत सुचना द्याव्या, अशा सूचना केल्या. यावेळी पर्यटन क्षेत्र वाढिवर भर देणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तारीख : 22-04-2025श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात सोमवारी (दि. २१) रोजी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समस्यांच्या भडीमाराने तालुकास्तरीय लोकशाही दिन 'वादळी' झाला. गेल्या पाच-सात वर्षांपासून विवादात असलेले तळे उत्खनन, बेकायदेशीर सोमाटणे टोलनाका आणि न्यायप्रविष्ट प्रकरणांमधील कामांची ठेकेदारांना अदा केलेली ज्यादा बिले यासर्व महत्वपूर्ण विषयांना जागृत नागरिकांनी हात घातला असता जबाबदार अधिकाऱ्यांनी भर उन्हाळ्यात आश्वासनांचा पाऊस पाडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार विक्रम देशमुख होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. एच दराडे, उपमुख्याधिकारी कल्याणी लाडे, लोणावळा उपअभियंता अशोक काळे, अखिल भारत ग्राहक पंचायतीच्या नयना आभाळे, पोलीस उपनिरीक्षक डी. ए. वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. आर. वाळुंज, मंडल अधिकारी एल. व्ही. सलगर, जलसंधारण अधिकारी दीपक ढवळे, तलाठी के. व्ही. मोहमारे, विशाल रिटे आदी अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते, शासकीय योजनांचे लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
प्रशासकीय राजवटीतील कामांचा दर्जा आणि त्रुटींबाबत प्रश्न
यावेळी फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानचे सचिव जयंत कदम यांनी भामा आसखेड धरणातील पिण्याचा पाण्याची योजना केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला. तळेगावातील पिण्याच्या पाण्याची योजना, रस्ते, भुयारी गटर योजना, पथदिवे, सांडपाणी वाहिन्या तसेच नगर परिषदेच्या गेल्या तीन वर्षातील प्रशासकीय राजवटीतील विकास कामांमधील कामाचा दर्जा आणि त्रुटींबाबत प्रश्न उपस्थित केले.
न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्येही ठेकेदार धार्जिणी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
ईगल तळेविकास प्रकल्पात शासनाने नगर परिषदेस ठोठावलेल्या ७८ कोटी रुपयांच्या दंडाबाबत कदम यांनी प्रश्न विचारला. ही बाब न्यायप्रविष्ट असताना नगर परिषदेने याच काळात ठेकेदारांची बिले कोणाच्या सांगण्यावरून अदा केली, असा सवाल उपस्थित केला. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये लागेबांधे असून, बोगस बिल काढल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माने यांनी केली. आपल्या तक्रारींबाबत निवेदन देण्यात यावे, वरिष्ठांना याबाबत माहिती देण्यात येईल, सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिले.
३० किमीमध्ये चार टोलनाके
माजी नगरसेवक अरुण माने यांनी सोमाटणे येथील बेकायदेशीर टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी केली. सोमाटणे ते लोणावळा दरम्यान ३० किलोमीटर अंतरात चार टोलनाके असून, शासनाच्या जीआरनुसार दोन टोल नाक्यांमध्ये किमान ६० किमी अंतर असावे. शासनाच्या नियमांची अंमलबजावणी का केली जात नाही, असा सवाल माने यांनी उपस्थित केला.
३५ पैकी केवळ १७ अधिकारी हजर; जबाबदार अधिकाऱ्यांकडूनही तहसीलदारांच्या पत्राला 'दाद' नाही
दरम्यान, तालुक्यातील विविध शासकीय विभागातील ३५ अधिकाऱ्यांना तहसीलदार विक्रम देशमुख यांनी लेखी पत्राद्वारे कार्यक्रमाची माहिती दिली. मात्र केवळ १७ अधिकारीच कार्यक्रमाला हजर होते. त्यामुळे ३५ पैकी १८ अधिकाऱ्यांनी खुद्द तहसीलदार देशमुख यांच्या पत्रालाही दाद दिली नसल्याचे निदर्शनास येताच, नागरिकांनी नाराजी दर्शवली. तसेच अनुपस्थित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तारीख : 20-04-2025श्रेणी :राजकारण
पवनानगर (Pawnanagar) : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नुकताच लोहगड किल्ला व शिवस्मारक परिसराच्या विकास कामासंदर्भात आढावा घेतला. लोहगड विसापूर विकास मंच गेले पंचवीस वर्षे लोहगड किल्ला व शिवस्मारक कसे काम करतो याची माहिती संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिली. त्याचबरोबर शिवस्मारकाच्या राहिलेल्या कामाला गती देण्याची विनंती केली.
प्रथम खासदार आप्पा बारणे यांनी शिवस्मारक परिसराची पाहणी करून प्रस्तावित विकास आराखडा बारकाईने समजून घेतला. तसेच, यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. नंतर त्यांनी लोहगड किल्ला चढून जाऊन संपूर्ण किल्ल्याच्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून काही सूचना केल्या. भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी गजानन मुंढावरे यांनी त्यांना किल्ल्याच्या सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा दिला.
यावेळी मंचाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच सोनाली बैकर, गणेश धानिवले, अलका धानिवले, रमेश बैकर, सोमनाथ बैकर, महेश शेळके, सचिन भोरडे, नागेश मरगळे, अभिषेक बैकर, पंढरीनाथ विखार, ज्योतीताई धानिवले, काजल ढाकोळ, स्नेहल बैकर, स्वाती मरगळे, बाळू ढाकोळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, मार्गदर्शक संदीप गाडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, अनिकेत आंबेकर, सचिन निंबाळकर, बसप्पा भंडारी, अमोल गोरे यांनी खासदार साहेबांचे आभार मानले
त्याचबरोबर कार्यक्रमास शेखर भोसले, शरद हुलावळे, दत्तात्रय केदारी, प्रकाश गुजर, मुन्ना मोरे, सुनील हरवणे, अमित कुंभार उपस्थित होते.
लोहगडावरील सुधारणा
श्री. शिवाजी रायगड मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंचातर्फे सर्वप्रथम लोहगडला दुरुस्ती चालू झाली. गडावरील जीर्ण झालेले शिवमंदिराचा ग्रामस्थांच्या सहकार्याने जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर महाशिवरात्री यात्रा चालू झाली. पुरातत्व विभागाने गडाला नवीन गणेश दरवाजा बसवला. मंचाने पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी गडाच्या सुधारणांचा पाठपुरावा केला. पुरातत्व विभागाने चांगली साथ दिली. गडाला पायऱ्या, बुरुज, तटबंदी आदींच्या दुरुस्तीची कामे चालू झाली. त्याचवेळी विसापूर वरील शिवमंदिर जीर्ण होऊन पडल्यानंतर त्याचाही पाठपुरावा मंचाने केला व पुरातत्व विभागाने शिवमंदिराची पुनर्बांधणी केली. अशा प्रकारे लोहगड विसापूरचा कायापालट होत आहे.
तारीख : 15-04-2025श्रेणी :राजकारण
कासारसाई (Kasarsai) : येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या (बुधवार, १६ एप्रिल) पार पडणार असून कारखाना सभागृहात यासाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.
या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम ठरवण्यात आला असून, दुपारी १ ते १.३० या वेळेत नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती, १.३० ते २ या वेळेत छाननी, २ वाजता वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध, त्यानंतर २ ते २.३० या वेळेत नामनिर्देशन पत्र माघार घेता येणार आहे. दुपारी २.३० वाजता अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर लगेचच २.३० ते ३ या वेळेत मतदान आणि ३ ते ३.३० दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर तत्काळ नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात येईल.
या निवडणुकीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेलने यापूर्वी सर्व जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावेळी नव्याने बहुतांश संचालक मंडळात सहभागी झाले असून, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्याच नेतृत्वाखाली संचालक मंडळाची निवडणूक लढवली गेल्यामुळे अध्यक्षपदी त्यांचीच फेरनिवड होणारे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. आतापर्यंत कारखान्याच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे बापूसाहेब भेगडे संचालक म्हणून पुन्हा निवडून आले आहेत. त्यांनाच पुन्हा संधी मिळणार की नवीन उपाध्यक्ष निवडला जाणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
कारखान्याच्या भविष्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, नवे नेतृत्व कोणाच्या हातात येते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तारीख : 11-04-2025श्रेणी :राजकारण
कामशेत (Kamshet) : मित्र पक्षाकडून कायमच रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरले जाते. सत्तेचा वाटा योग्य प्रमाणात दिला जात नाही. अशा परिस्थितीत आपली स्वबळावर लढण्याची तयारी असायला हवी, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे राष्ट्री अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. कामशेत (ता. मावळ) येथे रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, फक्त बौद्ध समाजाच नाही तर सर्व समाजातील लोकांशी सलोख्याचे संबंध असायला हवे. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करणे ही कायमच आपल्या पक्षाची भूमिका आहे. तसेच पक्ष बांधणीत आपली योग्य भूमिका बजावली पाहिजे.
महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातून बहुसंख्य कार्यकर्ते या अभ्यास शिबिराच्या निमित्ताने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी उद्योग, व्यवसाय, समाजकारण याचबरोबर पक्ष बांधणीत आपली भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. उद्योग आणि व्यवसाय चे मार्गदर्शन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (DICCI) चे पश्चिम भारत अध्यक्ष संतोष कांबळे यांनी केले. तर पक्ष बांधणीबाबत मार्गदर्शन विजय खरे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राजाभाऊ सरवते हे होते. यावेळी राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर, मातंग आघाडी अध्यक्ष आण्णा वायदंडे, युवक अध्यक्ष पप्पू कागदे, संघटक सचिव परशुराम वाडेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, ज्येष्ठ साहित्यिक शरण कुमार लिंबाळे, ज्येष्ठ विचारवंत अँड. दिलीप काकडे, मंदार भारदे, अरुण खोरे, गणेश गायकवाड, युवक अध्यक्ष समीर जाधव, मालन बनसोडे, अशोक सरवते, विक्रम शेलार, अंकुश सोनवणे, रूपेश गायकवाड, सिद्धार्थ चौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी तर आभार पाश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड व मावळ तालुका अध्यक्ष आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव यांनी मानले.