तारीख : 15-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
तारीख : 17-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
पवनानगर (Pawananagar): शिवणे गावातील मंडल अधिकारी मारुती चोरमले (वय ५३) आणि खाजगी व्यक्ती जयेश बारमुख (वय ३३, रा. चांदखेड) यांना २ लाख रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी (दि. १५ जुलै) रोजी ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आरोपी न्यायालयात हजर केले असता पुणे विशेष न्यायालयाने दोन्ही आरोपींना शुक्रवार (दि. १८ जुलै) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांची बहीण यांच्यासह २२ जणांनी २०१८-१९ मध्ये १ कोटी ९० लाख रुपयांना एक विकसन करार केला होता. मात्र संबंधित बांधकाम व्यवसायिकाने त्यांची फसवणूक करून जमीन दुसऱ्याला विकली. त्यावर झालेला फेरफार रद्द करण्यासाठी चोरमले यांनी २ लाखांची मागणी केली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केल्यानंतर, १५ जुलै रोजी भोसरीतील अॅकॉर्ड हॉस्पिटलसमोर सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. चोरमले यांनी तक्रारदाराला कार्यालयीन सहायक बारमुखकडे पाठवले आणि पैसे देण्यास सांगितले होते. दोघांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करत आहेत.
तारीख : 16-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
पवनानगर (Pawananagar) : मावळ तालुक्यातील शिवणे मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला असून लेटिगेशन झालेला फेरफार रद्द करण्यासाठी तब्बल २ लाखाची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम स्वीकारताना आरोपी लोकसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. मंगळवारी (दि. १५ जुलै) रोजी ही कारवाई करण्यात आली.
मंडल अधिकारी मारुती महादेव चोरमले (वय ५३, शिवणे, ता. मावळ) आणि जयेश बाळासाहेब बारमुख (वय ३३, रा. चांदखेड, ता. मावळ) असे रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या लोकसेवक आणि खाजगी व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा : तब्बल १७ वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदी मार्गे देहूत परतणार
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ लोकांनी मिळून सन २०१८ व २०१९ मध्ये एका बिल्डरला १ कोटी ९० लाख रुपये देऊन त्याच्याकडून कुसगाव प.मा. येथील गट नंबर २०९ मधील ३८ गुंठ्याचे क्षेत्र विकसन करारनामा करून घेतले. परंतु या क्षेत्राचा विकसन करारनामा झाला असताना सुद्धा बिल्डरने त्या २२ लोकांची फसवणूक करून ते क्षेत्र दुसऱ्या व्यक्तीला खरेदीखत करून देऊन विकले. त्या ३८ गुंठ्याचे खरेदीखत केल्यानंतर त्याची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी त्या व्यक्तीने तलाठ्याकडे अर्ज केला. त्या अर्जावर संबंधित तलाठयाने फेरफार नोंद करून तो फेरफार मंजुरीसाठी आरोपी मंडल अधिकारी मारुती चोरमले यांच्याकडे पाठवला.
त्यावेळी तक्रारदाराची बहीण व इतर २१ लोकांनी तो फेरफार मंजूर न होण्यासाठी हरकत घेतली. त्याप्रमाणे आरोपी चोरमले यांनी हरकतीच्या अर्जावर सुनावणी चालू केली. त्यादरम्यान तक्रारदाराची बहीण व इतर २१ लोकांनी तक्रारदाराला अधिकारपत्र देऊन त्यांच्या नावे पॉवर ऑफ ऍटर्नी लिहून दिली. त्याप्रमाणे तक्रारदार हे चोरमले यांच्याकडे दाखल हरकतीच्या प्रत्येक सुनावणीच्या वेळी हजर राहू लागले.
त्यानंतर नवीन झालेला फेरफार रद्द करण्यासाठी तसेच ते ३८ गुंठ्याचे वादग्रस्त क्षेत्र तक्रारदाराची बहीण व इतर २१ लोकांच्या नावावर होण्यास मदत करण्यासाठी मंडल अधिकारी चोरमले यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून पुढील कामासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारा जयेश बारमुख याला भेटण्यास सांगितले. त्याने सुद्धा तक्रारदाराकडे चोरमले यांच्यासाठी २ लाख रुपये व त्याच्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी दि. १४/०७/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली होती.
त्यानुसार तपास करत असताना आरोपींनी तक्रादार यांच्याकडे २ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी (दि. १५ जुलै) रोजी सापळा रचून ऍकॉर्ड हास्पीटलच्या समोर, स्वाईन रोड, भोसरी, पुणे येथे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांवर भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर हे करत आहेत.
तारीख : 12-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
शिरगाव (Shirgaon) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवैधपणे रक्तचंदनाची वाहतूक करणारा कंटेनर पकडण्यात आला होता. यावेळी ९ कोटी रुपये किमतीचे रक्तचंदन ताब्यात घेण्यात आले होते. परंतु यातील दोन मुख्य आरोपी हे तब्बल चार महिन्यांपासून फरार होते. त्यांना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. दोघांनाही पोलीस कोठडी मिळाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून १५ जुलै २०२५ पर्यंत पुढील तपास सुरू राहणार आहे.
राजेंद्र विठ्ठल शिंदे (वय ४३, रा. वाशी, नवी मुंबई) हा मुख्य सूत्रधार गुन्हा घडल्यानंतर फरार होता. तर तौसिफ रियाज जमादार याने सुरुवातीला आपले खोटे नाव ‘कल्पेश सिंग’ असे सांगून तपासाची दिशाभूल केली होती. दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर दिनांक २ मार्च २०५ रोजी, अवैधपणे रक्तचंदनाची वाहतूक करणारा कंटेनर पकडण्यात आला होता. त्यावेळी दोन आरोपींना अटक करून सुमारे ९ कोटी रुपये किमतीचे रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. सदर प्रकरणी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. रक्त चंदनाच्या तस्करीच्या गुन्ह्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी कसून तपास केला. यामध्ये आरोपी शिंदे आणि जमादार हेच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. ते गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावण्या देत होते.
परंतु गुरुवारी (दि. १० जुलै २०२५) रोजी विशेष पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे नेरुळ (नवी मुंबई) येथून राजेंद्र शिंदे याला अटक करण्यात आली. तर शुक्रवारी (दि. ११ जुलै २०२५) रोजी राजेंद्र शिंदेच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून कौपरखैरणे (नवी मुंबई) येथून तौसिफ जमादार यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही पोलीस कोठडी मिळाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून १५ जुलै २०२५ पर्यंत पुढील तपास सुरू राहणार आहे.
ही यशस्वी कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आणि त्यांच्या पथकाने केली. या गुन्ह्यातील उर्वरित सूत्रधार, वाहतूक मार्ग, आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटचा शोध घेण्यासाठी तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.
तारीख : 03-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
लोणावळा (Lonavala) : आईवरुन शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून १८ वर्षीय तरुणाने एकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज (गुरुवार दि. ३ जुलै) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ठाकूरसाई (ता. मावळ) हद्दीतील एका बंगल्यावर हा प्रकार घडला.
दिनेश लक्ष्मण गरवड (वय ३६, रा. भाजे ता. मावळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर लक्ष्मण गरवड (वय ४०, रा. भाजे ता. माव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी प्रणव विश्वजित डेका (वय १८ रा. चव्हाण नगर, वडगाव मावळ) याला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दिनेश गरवड आणि आरोपी हे एकाच ठिकाणी बंगल्यावर माळीकाम करत होते. परंतु मयत दिनेश याने दारू पिऊन आपल्या सोबत काम करणाऱ्या प्रणव याला आईवरून शिवीगाळ केली. याचाच राग मनात धरून आरोपीने दिनेशच्या डोक्यात लोखंडी कुदळ मारून त्याला जीवे ठार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत आहेत.
तारीख : 02-07-2025श्रेणी :गुन्हेगारी
कामशेत (Kamshet) : रस्त्यावर बाईक स्लिप होऊन अपघातग्रस्त तरुणांना पाठीमागच्या पिकअपने चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला. आज (बुधवार दि. २ जुलै) रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत (ता. मावळ) गावच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला.
आकाश जयलाल चौधरी (वय १९, रा. शिवणे वारजे ता. हवेली) आणि प्रज्वल ज्ञानेश्वर सराफ (वय २३, रा. औध आयटीआय कॉलेज होस्टेल मुळ रा. हडपसर) अशी दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी ऋषभ विनोद हिवाळे (वय २३, रा. केशवनगर, वडगाव मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पिकअप चालक प्रदिप मुकुंदा पाटील (वय ४४, रा. दिघी, मुळ रा. बुलढाणा) याच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र मयत आकाश आणि प्रज्वल हे दोघे आज (बुधवार दि. २ जुलै) रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास कामशेत गावच्या हद्दीतील पुणे मुंबई जुन्या हायवेला कामशेत घाटामध्ये वळणावर त्यांच्या ताब्यातील यामाहा आरवनफाय मोटार सायकल (एम एच १२ एक्स बी ००३८) वरून लोणावळ्याकडे जात असताना त्यांची दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर पासून त्यांचा अपघात झाला. परंतु यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप (एम एच १४ एल बी ७६२८) ने अपघातग्रस्त दोघांना चिरडले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेडगे हे करत आहेत.